ब्रेकिंग न्यूज़

विल्सन, ताहीरविरोधात गुन्हा दाखल

>> प्रकाश नाईक मृत्युप्रकरणी पोलिसांची कारवाई

जुना गोवा पोलिसांनी मेरशी पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य प्रकाश नाईक मृत्युप्रकरणी विल्सन गुदिन्हो आणि ताहीर या दोघांच्याविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी काल गुन्हा दाखल केला.
जुना गोवा पोलीस स्थानकावर प्रकाश नाईक यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने विल्सन आणि ताहीर यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या शुक्रवार १७ जानेवारीला सकाळी ११ च्या सुमारास प्रकाश नाईक राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आले होते. प्रकाश नाईक यांनी मृत्यूपूर्वी १०.४० वाजता एक संदेश व्हॉट्‌अप ग्रुपवर पाठविला आहे. त्यात विल्सन गुदिन्हो आणि ताहीर यांच्याकडून होणार्‍या सतावणुकीमुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते.
मयत प्रकाश नाईक यांनी व्हॉट्‌अप ग्रुपवर संदेश पाठविलेल्या संदेशाच्या आधारे कुटुंबीयांनी संदेशात नाव घेतलेल्या विल्सन गुदिन्हो आणि ताहीर यांना अटक करण्याची मागणी केली होती. जोपर्यंत दोघा संशयितांना अटक केली जात नाही. तोपर्यंत प्रकाश यांचा मृतदेह न स्वीकारण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे. या प्रकरणातील एक संशयित विल्सन गुदिन्हो हा राज्याचे पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांचा बंधू आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडून योग्य न्याय मिळू शकणार नसल्याचा दावा करून या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
प्रकाश मृत्युप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांना चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहेत, अशी माहिती जुना गोवा पोलिसांनी दिली.
दरम्यान, रविवार १९ जानेवारीला सकाळी मयत प्रकाश नाईक यांच्या कुटुंबीयांसोबत त्यांच्या अनेक समर्थकांनी जुना गोवा पोलीस स्थानकावर जाऊन मृत्यू प्रकरणातील दोघाही संशयितांना पोलीस स्थानकावर आणून चौकशीच्या कामाला गती देण्याची मागणी केली. मयत प्रकाश यांच्या कुंटुबियांनी शवचिकित्सा अहवाल देण्याची विनंती पोलिसांना केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकाश नाईक मृत्यू प्रकरणाच्या चौकशीला गती देण्याचे जाहीर केलेले असले तरी पोलीस चौकशीबाबत प्रकाश यांचे कुटुंबीय समाधानी नाहीत. राजकीय व्यक्तीच्या दडपणाखाली पोलीस यंत्रणा वावरत असल्याचा कुटुंबीयांना संशय आहे.

आज अंत्यसंस्कार
प्रकाश नाईक यांच्या पार्थिवावर आज सोमवार दि. २० जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांचे बंधू विनय नाईक यांनी काल दिली. प्रकाश यांची आत्महत्या नव्हे तर खूनच करण्यात आला आहे. त्या दृष्टीने तपास करावा, अशी मागणी विनय यांनी केली. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दबावामुळे कारवाई संथ गतीने सुरू आहे. जोपर्यंत या प्रकरणातील संशयितांना अटक केली जात नाही. तोपर्यंत बंधू प्रकाश यांचा मृतदेह स्वीकारणार नाही, असे जाहीर केले होते.