ब्रेकिंग न्यूज़

विल्सन गुदिन्होच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

मेरशी येथील माजी सरपंच, पंच सदस्य प्रकाश नाईक यांच्या मृत्युप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विल्सन गुदिन्हो याने अटकपूर्व जामिनासाठी येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज काल सादर केला आहे. या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मंगळवार दि. २१ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

माजी सरपंच प्रकाश याचा गेल्या शुक्रवार १७ जानेवारीला राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला. प्रकाश याने मृत्यूपूर्वी व्हॉट्‌अप ग्रुपवर पाठविलेल्या संदेशात विल्सन गुदिन्हो आणि ताहीर यांच्या सतावणुकीमुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. मयत प्रकाश याच्या कुंटुबियांनी जुने गोवा पोलीस स्थानकावर दोघांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर जुना गोवा पोलिसांनी विल्सन आणि ताहीर यांच्याविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश नाईक मृत्युप्रकरणी अटक होण्याची शक्यता असल्याने विल्सन याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणातील संशयित विल्सन हा राज्याचे पंचायत व वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांचा बंधू आहे. जुना गोवा पोलिसांनी या प्रकरणातील दुसरा संशयित ताहीर याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.

दरम्यान, मयत प्रकाश नाईक याच्या पार्थिवावर मेरशी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार काल करण्यात आले. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकांबरोबरच स्थानिक नागरिकांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. तसेच कुटुंबीयाचे सांत्वन केले.