ब्रेकिंग न्यूज़

विल्सन गुदिन्होचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

>> प्रकाश नाईक मृत्युप्रकरण

मेरशी येथील माजी सरपंच प्रकाश नाईक यांच्या अनैसर्गिक मृत्युप्रकरणातील एक संशयित आरोपी विल्सन गुदिन्हो याचा अटकपूर्व जामीन अर्ज उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने काल फेटाळला. त्यामुळे जुना गोवा पोलिसांना संशयित विल्सन याला अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जुना गोवा पोलिसांनी मयत प्रकाश नाईक यांच्या अनैसर्गिक मृत्युप्रकरणी मंत्री मावीन गुदिन्हो यांचे बंधू विल्सन गुदिन्हो आणि ताहीर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी अटक होण्याची शक्यता असल्याने संशयित विल्सन गुदिन्हो याने अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. मयत प्रकाश नाईक याने मृत्यूपूर्वी वॉट्‌अप ग्रुपवर पाठविलेल्या एका संदेशात विल्सन गुदिन्हो आणि ताहीर यांच्या सतावणुकीमुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी मयत प्रकाश याच्या कुटुंबीयांकडून जुना गोवा पोलीस स्थानकावर तक्रार दाखल करण्यात आली होती.

प्रकाश नाईक यांच्या मृत्युप्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विल्सन याला अटक करून चौकशी करण्याची गरज आहे, असा दावा पोलीस सूत्रांनी केला. अटकपूर्व जामीन अर्जाच्या निवाड्याच्या वेळी संशयित विल्सन गुदिन्हो न्यायालयात हजर नव्हता. या प्रकरणाला सात दिवस पूर्ण झाले तरी दोघा संशयितांपैकी एकालाही अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले नाही. दरम्यान, जिल्हा न्यायालयाच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले जाणार आहे, अशी माहिती वकील रोहीत डिसा यांनी दिली.