ब्रेकिंग न्यूज़
विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करणार

विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करणार

>> विजय सरदेसाई-संजय राऊत चर्चा

गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री व गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी शुक्रवारी सकाळी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन गोव्यात विरोधी पक्षांची एक आघाडी स्थापन करण्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, गोवा फॉरवर्ड व मगो पक्ष अशा पाच विरोधी पक्षांना एकत्र आणून गोव्यात एक आघाडी करणे शक्य असल्याबद्दल यावेळी वरील दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

विजय सरदेसाई यांच्याबरोबर झालेल्या या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, गोव्यात लवकरच एक राजकीय भूकंप होऊ शकतो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख आणि गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई हे आपल्या अन्य दोघा आमदारांसह महाराष्ट्रात आहेत. तसेच सरकारला पाठिंबा देणारे इतर काही आमदारही आमच्या संपर्कात असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. मगो पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याशीही आपली बोलणी झाली आहेत. गोव्यातील सरकार हे अनैतिकतेच्या पायावर उभे आहे. लवकरच गोव्यात फार मोठी हालचाल झालेली दिसेल, असेही राऊत यांनी पत्रकारांना सांगितले. गोव्यातच नव्हे तर संपूर्ण भारतभर बिगर भाजप आघाडी उभारण्यासाठी शिवसेना पुढाकार घेणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, आम्ही कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर महाराष्ट्रात सरकार स्थापन केले म्हणून आम्हाला बोट दाखवण्याचा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना अधिकार नाही. गोव्यात त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांबरोबर सरकार बनवले आहे व ते गोव्यातील लोकांना बिलकूल आवडलेले नाही. त्यामुळेच गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री व गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई शिवसेनेसोबत आले आहेत. आम्ही त्यांच्या व अन्य विरोधी पक्षांबरोबर एक आघाडी स्थापन करीत असून त्यामुळे लवकरच गोव्यात चमत्कार पहायला मिळणार असल्याचे राऊत म्हणाले.

यावेळी बोलताना सरदेसाई पत्रकारांना म्हणाले की, जे महाराष्ट्रात झाले तेच ते गोव्यामध्येही करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ‘गोवा फॉरवर्ड’ हा गोव्यातील प्रादेशिक पक्ष असून तो गोव्याच्या भल्यासाठी लढतो आहे. जे महाराष्ट्रात झाले ते संपूर्ण देशात व्हायला हवे, असे आमचे मत आहे. आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत काम करू आणि गोव्यात एक चांगली आघाडी निर्माण करू. आघाडीसाठी पाया रचला जावा यासाठी प्रयत्न करण्यास आम्ही आलो आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.

भाजपचे १८ आमदार
फुटावे लागतील ः गिरीश
गोव्यात विरोधकांचे सरकार सत्तेवर येण्यासाठी भाजपचे १८ आमदार फुटावे लागतील आणि जर तसे झाले तर कॉंग्रेस पक्षाकडे ५ आमदार असल्याने कॉंग्रेस सरकार स्थापन करू शकेल. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाला अन्य कुणाच्या पाठिंब्याची गरज भासणार नसल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राज्यात होऊ घातलेल्या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या पार्श्‍वभूमीवर बोलताना सांगितले.
ज्या पक्षांनी गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर आणले होते तेच पक्ष जर आता भाजप सरकार पाडणार असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे, अशी टिप्पणीही चोडणकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केली.