विरोधकांचे राज्यपालांना निवेदन

गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी कोविड चर्चेसंबंधीचा स्थगन प्रस्ताव फेटाळल्याने नाराज बनलेल्या विरोधी गटातील नऊ आमदारांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले. एकदिवसीय अधिवेशनात संमत करण्यात आलेल्या कामकाजाला मान्यता देऊ नये, अशी मागणी केली आहे.

सरकारने योग्य चर्चा न करता सभागृहाच्या कामकाजाचे नियम स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा निवेदनात केला. सरकारने कोविडवर चर्चेस नकार आणि अंदाजपत्रक चर्चा न करता संमत करून लोकशाहीचा खून केला आहे. सरकार कोविड या विषयावर असंवेदनशील आहे, असा आरोप विरोधी आमदारांनी केला. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी राज्यपालांकडे निवेदन सादर केले. यावेळी कॉँग्रेस, गोवा फ़ॉरवर्ड, मगोप आणि अपक्ष आमदार उपस्थित होते.

विधानसभेत आमदारांनासुद्धा आपले मत मांडण्याची संधी दिली जात नाही. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती राजवटीची नितांत गरज असल्याचे विजय सरदेसाई यांनी सांगितले.