विराटपेक्षा बाबर सरस ः रशीद

वर्तमान फॉर्मचा विचार केल्यास मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम हा भारताच्या विराट कोहलीपेक्षा नक्कीच सरस आहे, असे इंग्लंडचा लेगस्पिनर आदिल रशीद याने काल शुक्रवारी ‘क्रीझ टीव्ही’ शी संवाद साधताना सांगितले. रशीदने आपल्या आवडत्या वर्ल्ड इलेव्हनची घोषणा करताना मात्र बाबर व विराट या दोघांना संघात स्थान दिले आहे. विराट व बाबर यांची तुलना करणे कठीण असून केवळ फॉर्मच्या आधारेच बाबर पुढे असल्याचा पुनरुच्चार रशीदने केला.

इंग्लंडचा पहिला वर्ल्डकप विजेता कर्णधार ऑईन मॉर्गनला रशीदने कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. याशिवाय त्याने भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरची यांची सलामी जोडी म्हणून निवड केली आहे. या संघात रशीदने भारतीय कर्णधार विराट, बाबर आणि मॉर्गनला मधल्या फळीत ठेवले आहे. रशीदने आपला सहकारी जोस बटलरला संघात यष्टिरक्षक म्हणून निवडले आहे. रशीदने या इलेव्हनमध्ये फक्त दोन भारतीय खेळाडूंची निवड केली. अष्टपैलू म्हणून त्याने बेन स्टोक्सला पसंती दिली आहे.

रशीदने आपल्या संघात तीन वेगवान गोलंदाजांची निवड केली, ज्यात आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांचा समावेश आहे. याशिवाय संघात त्याने फक्त एक फिरकीपटू इम्रान ताहीरला निवडले आहे.