विधानसभा वृत्त

पंतप्रधान मोदींवर  अभिनंदनाचा वर्षाव

विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, माविन गुदिन्हो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन करणारे भाषण केले. पण काही आमदारांना ते रुचले नाही. त्यांचा कडवटपणा यावेळी दिसून आला, असे सांगून संपूर्ण गोमंतकीयांच्या वतीने आपण मोदी यांचे अभिनंदन करीत असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काल गोवा विधानसभेत अभिनंदन करण्यात आले. मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव आमदार प्रमोद सावंत व लवू मामलेदार यांनी मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
दोन वर्षांपूर्वी जी गोव्याची स्थिती होती, तीच स्थिती देशाचीही करून ठेवली होती. ती सुधारण्यासाठी वेळ लागेल. परंतु मोदींच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करेल असा विश्‍वास श्री. पर्रीकर यांनी यावेळी व्यक्त केला.
मोदींचे कौतुक
यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था बळकट करून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बळ येवो अशी आपण देवाकडे प्रार्थना करत आहे. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यास सार्क देशातील नेत्यांना बोलावण्याच्या त्यांच्या निर्णयाचे राणे यांनी कौतुक केले.
भारत या सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशातील जनतेने मागील निवडणुकीत मोठा चमत्कार घडवून आणला मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमत असलेले सरकार स्थापन केले. मोदी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील अशी अपेक्षा बाळगत माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत यांनी मोदींचे अभिनंदन केले.
मोदींच्या नेतृत्वाखाली भारत एक महासत्ता बनेल असा विश्‍वास आमदार विष्णू वाघ यांनी व्यक्त केला. मोदींना मिळालेले यश हे व्यक्तीगत नसून गोळवलकर गुरूजी, दीनदयाळ उपाध्याय अशा विचारवंतांच्या तपश्‍चर्येचे ते फळ असल्याचे श्री. वाघ म्हणाले.
या ठरावावर उद्योगमंत्री महादेव नाईक, वनमंत्री एलिना साल्ढाणा, उपसभापती अनंत शेट, कार्लुस आल्मेदा, आमदार राजन नाईक, लवू मामलेदार, रोहन खंवटे, लक्ष्मीकांत पार्सेकर, माविन गुदिन्हो, ग्लेन टिकलो, मायकल लोबो आदींची यावेळी भाषणे झाली. सर्व आमदारांनी यावेळी नरेंद्र मोदी यांचे कौतुक व अभिनंदन करताना ज्या पद्धतीने त्यांनी भाजपला विजय व बहुमत मिळवून दिले त्याविषयी ते अभिनंदनास पात्र असल्याचे सांगितले.
कॉंग्रेस आमदार गुदिन्हो यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना मोदी हे अथक परिश्रमामुळे पंतप्रधान बनल्याचे सांगितले. ते दिवसभरात १८ पेक्षा जास्त तास काम करीत असतात. ते एक कणखर नेते असून वेगळ्या पद्धतीने काम करण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे ते लोकप्रिय नेते ठरले असल्याचे गुदिन्हो यांनी यावेळी सांगितले.
श्री. पार्सेकर म्हणाले की, मोदी हे तरूणांनाही आवडत असतात. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तरूणांनी हिरीरिने भाग घेतला व भाजपच्या पारड्यात मते टाकली. प्रमोद सावंत, रोहन खंवटे, ग्लेन टिकलो आदींनीही यावेळी मोदी यांचे कौतुक केले व प्रधानमंत्री बनल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
भारत हिंदू राष्ट्र होईल :  दीपक
मोदींच्या रुपाने देशाला धडाडीचे नेतृत्व मिळाले असून २० वर्षानंतर आम्हांला स्थिर प्रशासन मिळाले आहे. पुढील काळात भारत देश हा एक हिंदू राष्ट्र म्हणून नावारुपास येईल, अशी अपेक्षा सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांनी व्यक्त केली. विधानसभेत नरेंद्र मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावावर श्री. ढवळीकर बोलत होते.
बेकायदा खनिज काढलेल्यांकडून सरकारने वसुली करावी : माविन
बेकायदा खनिज काढून गोव्याला लुटणार्‍यांकडून वसुली करा व संपूर्ण प्रकरण चौकसीसाठी सीबीआयकडे सोपवण्याची मागणी दाबोळीचे आमदार मावीन गुदिन्हो यांनी अर्थसंकल्पावर बोलताना केली. शहा आयोगाने लुटारुंची नावेही दिली आहे. सरकार स्थापन होऊन अडीज वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र अजूनही त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल श्री. गुदिन्हो यांनी केला.
शर्यती लावणार्‍यांवर कारवाई करा : लोबो
मोटारसायकलच्या शर्यती लावून काही युवक रस्त्यांवरून प्रवास करणार्‍या लोकांचा जीव धोक्यात घालत असतात. अशा युवकांवर आरटीओंनी कारवाई करावी, अशी मागणी काल आमदार मायकल लोबो यांनी शून्य तासाला विधानसभेत केली. मीरामार, ताळगाव, कळंगुट, दोनापावला आदी कित्येक ठिकाणी असे प्रकार चालू असल्याचे लोबो यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. यावर बोलताना वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, आम्हांला या प्रकाराची कल्पना आहे. या युवकांवर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.
विद्यालयांबाहेर पहारा ठेवण्याची मागणी
राज्यातील काही विद्यालयांचे वर्ग संपण्याच्या वेळी काही गुंड विद्यालयांबाहेर येऊन राहत असल्याच्या तक्रारी आहेत. हे गुंड विद्यार्थिनींची छेड काढीत असतात, असे काल शून्य तासाला मायकल लोबो यांनी विधानसभेत सांगितले व अशा गुंडांवर कारवाई करण्याची मागणी लोबो यांनी केली. अशा विद्यालयांबाहेर पोलीस पहारा ठेवण्याची सोयही करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कळंगुट येथील सेंट तेरेझा हायस्कुलबाहेर अशाच पद्धतीने गुंड येऊन राहत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले.

Leave a Reply