विधानसभांच्या कामकाजासाठी समान नियम प्रक्रियेला सुरुवात

>> ओम बिर्ला यांची माहिती

देशातील विधानसभां, विधान परिषदांच्या सुनियोजित कामकाजासाठी एकसमान नियम तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. नवीन एकसमान नियमावली तयार करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांचा समावेश असलेल्या तीन समित्यांची नियुक्ती करण्यात आली असून नोव्हेंबर २०१९ अखेरपर्यत या समित्यांकडून अहवाल अपेक्षित आहे, अशी माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल दिली.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी पर्वरी येथील विधानसभा भवनाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. देशातील काही विधानसभांचे वार्षिक कामकाज निर्धारित केलेले दिवस पूर्ण करीत नाहीत, हा चिंतेचा विषय आहे. विधानसभांचे कामकाज वार्षिक किमान ६० दिवस झाले पाहिजे, असेही सभापती बिर्ला यांनी सांगितले.
एकसमान नियमावली तयार करण्यासाठी नियुक्त समित्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्व विधानसभा, विधान परिषदांच्या अध्यक्षांची बैठक घेऊन अहवालावर चर्चा केली जाणार आहे. विधानसभांच्या कामकाजात माहिती तंत्रज्ञान, नियम प्रक्रिया यांच्यावर जास्त भर दिला जाणार आहे. सर्व विधानसभा अध्यक्षांची एकसमान नियमावलीला मान्यता मिळाल्यानंतर त्याला लोकसभेकडून मंजुरी घेतली जाणार आहे, असेही बिर्ला यांनी सांगितले. दरम्यान, बिर्ला यांनी विधानसभा भवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यातील आमदार, माजी आमदारांना एका कार्यक्रमात मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, उपसभापती इजिदोर फर्नांडीस, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मनोहर आजगांवकर, दिगंबर कामत उपस्थिती होते.