ब्रेकिंग न्यूज़

विद्यार्थ्यांनो… खिंड लढवा…

– प्रा. विद्या प्रभुदेसाई

 

आनंदी राहून आपण प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेवून सकारात्मक वृत्तीने परीक्षा दिली पाहिजे. आपण केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन आपणच करावे. आत्मविश्वास ढळू न देता परीक्षेची खिंड लढवा… जय आपलाच होईल.. अशी आशा ठेवा. मोठ्यांचे आशीर्वाद आणि समवयीनांच्या शुभेच्छा आपल्या मागे आहेतच. ईश्वर समस्त विद्यार्थी वर्गाला परीक्षेबरोबरच भावी आयुष्यातही यशस्वी करो ही सदिच्छा!

सामान्यपणे मूल दोन वर्षांचे झाले म्हणजे पालकांना आपल्या पाल्याच्या शैक्षणिक जबाबदारीची जाणीव होऊ लागते आणि मग उत्तम शाळेचा शोध सुरू होतो. शाळेच्या साधन (शिक्षक) सुविधांवर फार मोठे संशोधन सुरू होते, विविध अनुभवी लोकांपाशी विचारपूस केली जाते, अनेकवेळा पायी चालण्याच्या अंतरावर असलेल्या शाळेकडे पाठ फिरवून संस्था तीच असली तरी दूर असलेल्या शहरातील शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी विनाकारण कोण खटाटोप सुरू होतो आणि एकदा का हा प्रवेश मिळाला, म्हणजे मग शर्यतीत उतरलेल्या या घोड्यांची खडतर तपश्चर्या सुरू होते.

वेळ कुणाला आहे..?

शर्यतीचा पहिला टप्पा दहावीची बोर्ड परीक्षा, दुसरा टप्पा बारावीची बोर्ड परीक्षा आणि तिसरा शैक्षणिक पातळीवरील ज्याला अंतिम म्हणता येईल असा स्पर्धा परीक्षांचा टप्पा. जवळ जवळ मुलाच्या बारावीच्या बोर्ड परीक्षेपासून ते सर्व राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धापरीक्षा देऊन कोणत्या ना कोणत्या मळलेल्या वाटेवरून गेलेल्या व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश मिळेपर्यंत पालक आणि काही प्रमाणात पाल्य फार मोठ्या दबावाखाली असतात. एकदा हा प्रवेश मिळाला म्हणजे हातात पदवी येणार, हातात आलेली पदवी मान आणि आर्थिक स्थैर्य देणार… अशी आजच्या काळातही पालकांची समजूत असते. आजच्या अर्थकेंद्रित समाजव्यवस्थेत आर्थिक स्थैर्याबरोबर येणार्‍या कौटुंबिक स्थैर्याची अपेक्षा केली जाते आणि दुर्दैवाने अपेक्षाभंग झाला तर त्याचा सामना कसा करावा याचा विचार करायला परीक्षांच्या गर्तेत अडकलेल्या पाल्याला आणि पालकांना यापूर्वी कधी वेळही मिळालेला नसतो. त्यामुळे यातून येणार्‍या नैराश्याचा झटका केलेल्या सर्व कष्टांचं खोबरं करून टाकतो. आज अशा बालक पालकांकडे पाहिले म्हणजे बालपणातील वाटाणा-फुटाणा-शेंगदाणा या कवितेतील वाटेत भेटणार्‍या तीळाच्या कणाप्रमाणे ‘थांबायला वेळ नाही क्षणभर, काम आहे मोठं, मला नाही सवड’ अशा अवस्थेत असलेल्यांची अक्षरशः दया येते.

शिक्षणाच्या प्रक्रियेत केंद्रस्थानी असणे आवश्यक असलेला हा विद्यार्थी अनेकवेळा गृहित धरला जातो. अर्थकेंद्रित समाजव्यवस्थेचा तो बळी ठरतो आहे की काय अशी आज भीती वाटू लागली आहे. अडीच वर्षांवर एकदा विद्यार्थी म्हणून शाळेत प्रवेश घेतलेले मूल औपचारिक शिक्षणाच्या चक्रात पुरते अडकते. यात त्याला शिकण्याचा आनंद मिळतो की नाही हा वादाचा मुद्दा असला, तरी या बारा वर्षांच्या तपश्चर्येतून त्याला जे काही मिळते त्यामुळे ते मूल आणि त्याचे पालक तरी किमान समाधानी व्हावेत अशी अपेक्षा असते. या स्पर्धात्मक जगात आपले मूल मागे पडू नये असे पालकांना वाटल्यामुळेच अनेकवेळा पालक आपल्या पाल्याच्या इतके मागेमागे असतात की आपल्या अपेक्षेनुसार पाल्याला योग्य शाखेत प्रवेश मिळाला म्हणजे त्यांना हायसे वाटते, नव्हे ते सुटकेचा निःश्वास टाकतात.

पालकांच्या अवाजवी अपेक्षा…

अनेकवेळा आपली अपुरी इच्छा मुलाच्या माध्यमातून पूर्ण करून घेण्याची त्यांची धडपड असते. बोर्ड अथवा तत्सम स्पर्धा-परीक्षा हेच त्यांच्या जीवनाचे अंतिम उद्दीष्ट असल्याचे पालक त्यांच्या मनावर बालपणापासून ठसवत असतात. यासाठी पाण्यासारखा पैसा ओतून कोचिंग क्लासमध्ये भरती करतात आणि मग त्या अनुषंगाने विविध पूरक गोष्टी निर्माण केल्या जातात. सकाळी पाच किंवा सहा पासून ते रात्री नऊ – दहापर्यंत आपला पाल्य घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमणे अभ्यासात बुडून गेला आहे याची जाणीव झाल्यामुळे अनेकवेळा पालक त्याच्या बाबतीत अधिक हळवे होत असले तरी सतत अप्रत्यक्षपणे त्याच्यावर परिक्षेचा दबाव आणत असतात. एकूणच या असामान्य वागणुकीचा विपरित परिणाम तर आपल्या पाल्यावर होणार नाही ना याचा विचार पालकांनी केला पाहिजे. बर्‍याचवेळा समाज आणि पालकांच्या अपेक्षांचा बालपणापासूनच मुलाच्या मनावर इतका दबाव असतो की, सतत दुसर्‍याशी तुलना करण्याची मानसिकता या वातावरणात मुलांना घाबरवणारा दहावी-बारावीच्या परीक्षांचा बागुलबुवा मुलांच्या मनातून जात नाही. या परीक्षा म्हणजे आयुष्यातील ‘अंतिम आशा’ असे त्यांना वाटते. त्यातून मग निकालात अपेक्षापूर्ती झाली नाही तर हे मूल कधीकधी टोकाची भूमिकाही घेते. ‘अनुभवात्मक ज्ञान म्हणजे शिक्षण’ ही शिक्षणाची सामान्य व्याख्याच शिक्षणातील अनुभवाचे महत्त्व अधोरेखित करते. वास्तविक असे शिक्षण ही आनंदाची प्रक्रिया असून आनंद घेत शिकणारा कधीही अपयशी होत नसतो. परीक्षांमधील गुणांवर आपल्या जीवनातील यश पूर्णांशाने अवलंबून नसते. जीवनातील गुणात्मक यश आणि परीक्षेतील गुणांचे यश या दोन भिन्न गोष्टी आहेत हे विद्यार्थ्यांनी कधीही विसरू नये. जीवनातील गुणवत्ता माणसाला ताठ कण्याने उभे रहायला शिकवते. जीवनातील गुणवत्तेशिवाय परीक्षेत मिळविलेले गुण तसे जीवन जगताना उपयोगी पडत नसतात. प्रामाणिकपणाने अभ्यास करून आपण शिकलेल्या ज्ञानाचे(?माहितीचे) मूल्यमापन करण्यासाठी परीक्षा असते, परीक्षेत गुण मिळविण्यासाठी ज्ञान(?माहिती) मिळवू नये. विशिष्ट गुण मिळाले तरच विशिष्ट अभ्यासक्षेत्रात प्रवेश मिळेल आणि विशिष्ट अभ्यासक्रमच आपल्याला जीवनात स्थैर्य देईल या जुन्या विचारांपासून विद्यार्थ्यांनी दूर रहावे. आज व्यवसाय क्षेत्रात इतक्या नवनवीन संधी विद्यार्थ्यांना खुणावत आहेत. अमुकच एखादे क्षेत्र आयुष्यात यश मिळवून देते अशी असलेली समाजाची मानसिकता आता हळूहळू बदलू लागली आहे याची जाणीव सुजाण पालकांनी ठेवावी. अनेकवेळा शाखा निवडीमघ्ये पाल्याचा हट्ट असल्याचे पालक सांगतात पण माझ्या मते हा हट्ट त्यांना करावासा वाटण्यामागे बर्‍याच अंशी, समाज पर्यायाने आपणही जबाबदार असतो. कोणत्याही क्षेत्रात आंत शिरण्यापुरतेच महत्त्व परीक्षा प्रमाणपत्रांना असते. आपल्या अंगचे गुण आणि हुषारी हेच खरे आपले भवितव्य घडवित असतात हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

आता परीक्षा तोंडावर…

आता परीक्षा तोंडावर आल्या आहेत. दिवसाचे वेळापत्रक करुन त्यानुसार अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी त्या वेळापत्रकात विश्रांती आणि मनोरंजनालाही वेळ ठेवावा. या काळात त्याची अत्यंत गरज असते. मनाची चलबिचल होऊ न देता रोज झोपताना मनन करून दिवसभरात केलेल्या अभ्यासाची उजळणी करावी. रोज एक तास वाचलेले लिहून काढण्यासाठी ठेवावा. वर्षभर प्रामाणिकपणे केलेल्या अभ्यासाला तीन तासांत सादर करताना विद्यार्थ्यांची अनेकदा तारांबळ उडते. मुळातच असलेले परीक्षेचे दडपण अशावेळी विद्यार्थ्यांना अधिक हतबल करते. म्हणूनच कोणत्याही दडपणाशिवाय परीक्षागृहात प्रवेश करणे गरजेचे असते. आनंदी राहून आपण प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांवर पूर्ण विश्वास ठेऊन सकारात्मक वृत्तीने परीक्षा दिली पाहिजे. आपण केलेल्या अभ्यासाचे मूल्यमापन आपणच करावे. आत्मविश्वास ढळू न देता परीक्षेची खिंड लढवा… जय आपलाच होईल.. अशी आशा ठेवा. मोठ्यांचे आशीर्वाद आणि समवयीनांच्या शुभेच्छा आपल्या मागे आहेतच. ईश्वर समस्त विद्यार्थी वर्गाला परीक्षेबरोबरच भावी आयुष्यातही यशस्वी करो ही सदिच्छा!