विठ्ठलवाडीतील टोपले कुटुंबीय शिक्षणाची गंगोत्री

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

पोर्तुगीज अमदानीत समाजपरिवर्तनाचे ध्येय उराशी बाळगून शिक्षणदानाचे धनुष्य कै. अ. र. टोपले यांनी उचलले होते. ते पेलण्याचे कार्य त्यांच्या पुढील दोन पिढ्यांनी केले आहे, आज त्यांची तिसरी पिढीदेखील शिक्षणक्षेत्रात आपले योगदान देत आहे.

 

म्हापसानगरीतील सात वाड्यांपैकी एक वाडा असलेल्या ‘अन्साभाट’ परिसरातील ‘विठ्ठलवाडी’त ज्या ठिकाणी श्री देव विठ्ठल-रखुमाई देवस्थानचे सुबक व सुंदर मंदिर आहे, त्या मंदिराजवळच टोपले कुटुंबीयांचे एक बैठे घर आहे. म्हापशातील काही नावाजत्या वैश्य समाजातील कुटुंबीयांपैकी हे एक कुटुंब आहे. बालपणापासून मला आठवत असलेले या कुटुंबातील दोन कर्ते पुरुष म्हणजे कै. अनंत रघुनाथ टोपले आणि कै. पुरुषोत्तम टोपले.

कै. अनंत टोपले यांना मी बालपणी पाहिले होते. धोतर, शर्ट, त्यावर कोट, पायांत वहाणा आणि डोक्यावर टोपी असा त्यांचा पेहराव होता. निमगोरा चेहरा, घारे डोळे, धारदार नाक, गाल थोडेसे आत गेलेले. पोर्तुगीज काळातही मराठी प्राथमिक शिक्षक म्हणून ते वावरत होते. एक नाट्यलेखक म्हणूनही त्यांची नामना होती. त्यावेळी काही गोमंतकीय नाट्यलेखक हौशी रंगभूमीसाठी नाट्यसंहिता लिहीत असत, त्यांत कै. सीताराम गणपती मणेरकर, कै. शंकर पांडुरंग नार्वेकर, कै. अच्युत म्हाडेश्री यांच्याबरोबर कै. अनंत टोपले व त्यांचे पुत्र कै. रघुनाथ अनंत टोपले उपाख्य ‘बाप्पा’ यांचाही समावेश करावा लागेल.

पोर्तुगीज अमदानीत समाजपरिवर्तनाचे ध्येय उराशी बाळगून शिक्षणदानाचे धनुष्य कै. अ. र. टोपले यांनी उचलले होते. ते पेलण्याचे कार्य त्यांच्या पुढील दोन पिढ्यांनी केले आहे, याचा याठिकाणी मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो. आज त्यांची तिसरी पिढीदेखील शिक्षणक्षेत्रात आपले योगदान देत आहे. त्यांचे पुत्र व म्हापशातील ‘जनता एज्युकेशन सोसायटी’ या शिक्षण संस्थेचे संस्थापक व जनता हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा व्यवस्थापक माजी आमदार कै. रघुनाथ टोपले (बाप्पा), त्यांच्या सुविद्य पत्नी व माजी मुख्याध्यापिका तथा सध्या या हायस्कूलच्या व्यवस्थापिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती सरोज रघुनाथ टोपले, त्यांच्या नाती निवृत्त शिक्षिका सुधा नेवगी, जनता हायस्कूलच्या सहमुख्याध्यापिका भोगटे, कु. मंजिरी हनुमंत टोपले, पणतू कु. शिवानी भोगटे आदी कुटुंबीय आजही शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहेत.

कै. रघुनाथ टोपले उपाख्य ‘बाप्पा’ हे सर्वपरिचित होते. त्यांचा जन्म म्हापसा येथे २२ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. पोर्तुगीज अमदानीत गोव्यात इंग्रजी भाषेतून उच्चशिक्षणाची सोय नसल्यामुळे इ.स. १९५० च्या दरम्यान बेळगाव येथे वास्तव्यास राहून तेथील राणी पार्वतीबाई देवी महाविद्यालयातून (आर.पी.डी. कॉलेज) कला शाखेची पदवी संपादन केली. महाविद्यालयातून शिक्षण घेत असताना तेथे गोव्यातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘कोकणी असोसिएशन’ या संस्थेतर्फे विविध कार्यक्रम सादर केले जात. त्यांतील एकांकिका व नाटकांतून बाप्पा मोठ्या उत्साहाने आणि हिरिरीने सहभागी होत असत.

पुढे मग त्यांनी बी.एड्. ही शिक्षक प्रशिक्षणाची पदवी संपादन केली. हिंदीतून राष्ट्रभाषाप्रवीण ही पदवीही मिळवली आणि वडिलांप्रमाणेच दीन-दलितांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य घडवण्याच्या कार्याला आणि त्याचबरोबर एकूणच समाजाला शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीयदृष्ट्या सक्षम बनवून योग्य दिशा दाखवण्याच्या मार्गाला लागले.

पोर्तुगिजांच्या जुलमी आणि दहशतवादी राजवटीतून भारतीय सेनेने १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त करून भारतीय संघराज्यात सामील करून घेतल्यावर गोवा, दमण व दीव या संघराज्यासाठी लोकशाही पद्धतीने प्रथमच सार्वत्रिक निवडणुका ९ डिसेंबर १९६३ रोजी घेण्यात येऊन ९ जानेवारी १९६४ रोजी पहिली विधानसभा गठीत करण्यात आली. या निवडणुकीत म्हापसा मतदारसंघातून महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या उमेदवारीवर आपले नजीकचे प्रतिस्पर्धी युनायटेड गोवन्स पक्षाचे कै. जगन्नाथ महांबरे (२७७३ मते) व कॉंग्रेसचे कै. आत्माराम करमळकर (१३३४ मते) यांना पराभूत करून कै. रघुनाथ टोपले (४५११ मते) निवडून आले होते.

९ जानेवारी १९६४ रोजी गोवा, दमण व दीव संघराज्याची पहिली विधानसभा भरली तेव्हा नायब राज्यपालांनी विधानसभा कामकाजाच्या प्रथेनुसार हंगामी सभापतिपदी कै. रघुनाथ टोपले यांची नियुक्ती केली होती. विधानसभा कामकाज नियमावलीनुसार सभागृहाच्या कामकाजात विधानसभा सदस्य किंवा सभागृहाने एखाद्या विषयावर आपले मत व्यक्त करण्यासाठी बोलावलेला महाधिवक्ता यांनाच सहभागी होता येते. प्रेक्षक-कक्षात बसलेल्या प्रेक्षकांना सभागृहाच्या कामकाजात कोणत्याही प्रकारे सहभागी होता येत नाही की अडथळे आणता येत नाहीत. तो सभागृहाचा अवमान ठरतो.

पहिल्या विधानसभेच्या पहिल्याच दिवशी कै. रघुनाथ टोपले यांनी हंगामी सभापती या नात्याने इतर विधानसभा सदस्यांना शपथ दिल्यावर पहिल्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि विरोधी यु. गो. पक्षाचे व विधानसभेतील नेते डॉ. जॅक सिक्वेरा यांनी सदस्याने विधानसभेत कोणत्या भाषेतून बोलावे यावर प्रश्‍न उपस्थित केला. सभापतिपदी असलेल्या कै. रघुनाथ टोपले यांनी विधानसभा कामकाज नियम ३४ (२) याकडे सभासदांचे लक्ष वेधून सभासदाला जी भाषा येते त्या भाषेतून त्याला बोलू देणे हा आपला अधिकार असल्याचे सांगून हिंदी आणि इंग्रजीबरोबरच ज्यांना या भाषा अगवत नाहीत त्यांना कुठल्याही भाषेत बोलण्याची मुभा देत इतर भाषांतील भाषणांची शब्दशः नोंद न होता फक्त सारांश नोंदला जाईल असा निवाडा दिला. एक-दोन प्रसंगी एक सदस्य बोलत असताना इतर सदस्यांनी उभे राहू नये व प्रेक्षक-कक्षातून टाळ्या वाजवणार्‍या प्रेक्षकांना विधानसभा कामकाजात भाग न घेण्याची ताकीदही देणारा निवाडा त्यांनी दिला होता.

मी स्वतः सभापती म्हणून इ.स. १९९०-९१ मध्ये पदभार सांभाळत असताना मागील सभापतीनी दिलेले दाखले आणि निवाडे यांचा अभ्यास करीत असे तेव्हा तत्कालीन पीठासीन सभापती कै. पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर या पहिल्या सभापतीनी हंगामी सभापतिपद सांभाळलेल्या कै. र. अ. टोपले यांनी प्रशासकाच्या अभिभाषणावर बोलताना एका सदस्याचा उल्लेख सन्माननीयरीत्या केला नसल्याचे लक्षात आणून देत प्रत्येक सदस्याचा उल्लेख ‘माननीय सभासद’ असा सन्मानपूर्वक केला गेला पाहिजे असा निवाडा दिला होता हे आजही आठवते आहे.

त्यानंतर कै. र. अ. टोपले यांना म. गो. पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली नव्हती. पुढे मग त्यांनी ३ जानेवारी १९८० रोजी गोवा, दमण व दीव संघप्रदेशासाठी घेण्यात आलेल्या ५ व्या विधानसभा निवडणुकीत म्हापसा मतदारसंघातून जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत कै. श्यामसुंदर नेवगी हे भारतीय कॉंग्रेस (अर्स) पक्षाचे उमेदवार म्हणून (६६२० मते) माझ्या विरोधात (मगो- ५५५९ मते) निवडून आले होते, तर कै. र. अ. टोपले (जनता पक्ष- ८५७ मते) मिळवून तिसर्‍या स्थानावर फेकले गेले होते. त्यावेळी संपूर्ण देशात भारतीय कॉंग्रेस (इंदिरा) निवडून आलेली असताना गोव्यात मात्र भारतीय कॉंग्रेस (अर्स) निवडून येऊन एका रात्रीत भारतीय कॉंग्रेसमध्ये (इंदिरा) विलीन झाली होती. त्यानंतर राजकारणापासून ते थोडे दूरच राहिले होते.

कै. र. अ. टोपले हे वास्तविक पाहता खर्‍या अर्थाने हाडाचे शिक्षक होते. कला शाखेची पदवी संपादन केल्यावर ते म्हापशातील म्हापसा हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले होते. स्वतंत्र बाणा असल्यामुळे त्यानंतर त्यांनी स्वा.सै. कै. शांताराम धोंड, स्वा.सै. कै. लक्ष्मण गोवेकर, कै. कृष्णा डिचोलकर आदींनी एकत्र येऊन ‘जनता एज्युकेशन सोसायटी’ ही एक शैक्षणिक संस्था सुरू करून इ.स. १९६२ मध्ये ‘जनता हायस्कूल’ हे इंग्रजी माध्यमाचे हायस्कूल सुरू केले. सुरुवातीला कै. बाळकृष्ण उपाख्य नारू सुभेदार यांच्या एकमजली घराच्या माळीवर वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर जागा अपुरी पडू लागल्याने कै. गजानन व कै. रघुवीर पानकर या बंधुद्वयांच्या मालकीच्या इमारतीतील पहिल्या माळीवर बाकी वर्ग सुरू करण्यात आले होते. या विद्यालयातर्फे पुणे शालान्त मंडळाची परीक्षा देणार्‍या पहिल्या तुकडीचा मी विद्यार्थी होतो. मुद्दाम उल्लेख करायची बाब म्हणजे या तुकडीतील विद्यार्थी आपल्या पुढील शैक्षणिक जीवनात आणि विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांत आजही नाव कमावून आहेत. पुढे मग त्यांनी शिक्षणापासून वंचित असेलल्या कामगार मुलांसाठी रात्रपाळीचेे वर्ग सुरू केले. गोव्यातील असे रात्रपाळीचे शिक्षण देणारे हे दुसरे विद्यालय होते. रात्रपाळीच्या विद्यालयीन स्तरावर शिक्षण घेतलेली अनेक मुले पुढे उच्चशिक्षण घेऊन चांगल्या हुद्याच्या नोकरीला लागल्याची उदाहरणे मी पाहिली आहेत.

कै. नारू सुभेदार यांच्या इमारतीसमोर नगरपालिकेचे एक उद्यान होते. आडबाजूला असल्यामुळे या उद्यानाचा फारसा उपयोग नागरिकांना होत नसे. सरकारदरबारी प्रयत्न करून ती जागा त्यांनी ताब्यात घेतली व विद्यालयासाठी एक दुमजली इमारत उभारून तेथे वर्ग घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांचा कळंगुट येथील फळारी कुटुंबातील सौ. सरोज यांच्याशी विवाह झाला होता. त्याही सुरुवातीस शिक्षिका म्हणून विद्यालयात रुजू झाल्यावर पुढे ‘बाप्पा’ निवृत्त होताच मुख्याध्यापिकापदाची सूत्रे सौ. सरोज यांनी स्वीकारली. पुढे बाप्पांचे निधन होईपर्यंत ते विद्यालयाचे व्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळत होते. सध्या श्रीमती सरोज टोपले या विद्यालयाच्या व्यवस्थापिका म्हणून कार्यभार सांभाळत असतात. त्यांचा जितेंद्र हा मोठा मुलगा इलेक्ट्रॉनिक अभियंता असून सध्या तो अमेरिकेत आहे, तर त्यांची पत्नी डॉ. आज्ञा ही आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्यांचा दुसरा मुलगा डॉ. हरिष हा अस्थिशल्यविशारद असून म्हापशातील ‘व्हिजन हॉस्पिटल’सारख्या नावाजत्या इस्पितळातून सल्ला देत असतो. त्याची पत्नी डॉ. शिल्पा या गोवा शासनाच्या आरोग्य खात्यात म्हापसा येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची प्रा. प्रतिभा चोपडेकर ही विवाहित मुलगी ज्ञानप्रसारक मंडळाच्या कै. जयराम भिकाजी नेवगी शास्त्र उच्च माध्यमिक विद्यालयात जीव व वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत.