विजय दिवस!

0
114

आजच्या २६ जुलै या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि त्याचे विस्मरण देशाला कदापि होता उपयोगी नाही, कारण आज कारगिलमधील भारतीय सेनेच्या विजयाला पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. १९९९ च्या फेब्रुवारीमध्ये एकीकडे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानशी मैत्रीचे हस्तांदोलन करीत असताना आणि लाहोर घोषणापत्रातून भारत – पाक मैत्रीची ग्वाही जगाला दिली जात असताना दुसरीकडे स्वतः मुजाहिद्दीन असल्याचे भासवत प्रशिक्षित पाकिस्तानी सैनिकांनी कारगिल, द्रास, मश्कोह आणि बटालिकच्या पहाडांमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे घुसखोरी करून भारतीय ठाणी बळकावली. मार्च ते मे या काळामध्ये हे सगळे पहाड बर्फाच्छादित असतात आणि तेथे कडाक्याची थंडी असते. त्यामुळे प्रत्येक हिवाळ्यात आघाडीवरच्या या ठाण्यांवरून सैनिक मागे हटविले जायचे. तीच संधी पाकिस्तानने साधली आणि त्या तीन महिन्यांमध्ये भारतीय हद्दीत शिरकाव करून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्यासहित पर्वतशिखरांवरील मोक्याच्या ठाण्यांवर आपले बस्तान बसवले. दुर्दैवाने भारतीय गुप्तचर यंत्रणांना या छुप्या कारवाईचा काहीही थांगपत्ता नव्हता आणि लष्करही या चढाईबाबत अनभिज्ञ होते. जेव्हा काय घडले आहे ते कळले तेव्हा उशीर झाला होता. तोवर दोनशे चौरस कि. मी. परिसरात हे सशस्त्र सैनिक मोक्याची ठाणी बळकावून, बंकर उभारून बसले होते. श्रीनगर – लेह महामार्ग नजरेच्या टप्प्यात येईल अशा तोलोलिंग पहाडांपर्यंत त्यांनी मुसंडी मारली यावरून पाकिस्तानी लष्कराच्या या ‘ऑपरेशन बद्र’चे कपटकारस्थान लक्षात यावे. कारगिलच्या कारवाईमागे पाकिस्तानचे उद्दिष्ट व्यापक होते. काश्मीर खोरे आणि लडाख यांच्यातील श्रीनगर – द्रास – कारगिल – बटालिक – लेह मार्गाने चालणारी रसद तोडायची आणि सियाचिनमधून भारतीय सैनिकांना माघार घेण्यास भाग पाडायचे असा तत्कालीन लष्करप्रमुख जनरल मुशर्रफ यांचा कपटी डाव होता. तो हाणून पाडण्यासाठी अर्थातच भारतीय लष्कराला फार मोठी किंमत द्यावी लागली. सर्व मिळून दोन लाख सैनिकांनी कारगिलच्या या युद्धात भाग घेतला. साठ दिवस चाललेल्या ‘ऑपरेशन विजय’ मध्ये ५२७ भारतीय जवान शहीद झाले. यात लेफ्टनंट कर्नल आर. विश्वनाथन, अकरा मेजर, सतरा कॅप्टन आणि ग्रेनेडियर, हवालदार, लान्स नायक, नायक, रायफलमन, शिपाई अशा विविध हुद्द्यांवरील जवानांचा बळी गेला. पाकिस्तानने बळकावलेली सगळी भारतीय ठाणी परत मिळवण्यासाठी जी झुंज द्यावी लागली, ती देशाने दूरचित्रवाणीवरून तेव्हा पाहिलीच आहे. टायगर हिलवर भारताचा तिरंगा फडकला तेव्हा प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. पण कारगिलच्या त्या शहिदांचा किती मान आपण राखला? शहीदांसाठी अमेरिकेतून आयात केलेल्या पाचशे शवपेट्यांवरही दलाली उकळली गेली. बाजारभावापेक्षा तेरा टक्के जास्त दराने या शवपेट्या खरेदी केल्या गेल्या. कारगिलच्या विजयीवीरांचे नाव वापरून मुंबईत भ्रष्टाचाराचा ‘आदर्श’ उभा राहिला. कारगिलनंतर पाकिस्ताननेही काही धडा घेतल्याचे दिसले नाही. कंदाहारचे विमान अपहरणनाट्य घडले, भारतीय संसदेवर दहशतवादी हल्ला झाला, मुंबईमध्ये दहा दहशतवाद्यांनी थैमान घातले. किती भारतीय शहरांमध्ये बॉम्बस्फोट मालिका घडल्या त्याची तर गणतीच नाही. दहशतवादाला पाकिस्तानातून मदत सुरूच राहिली आहे आणि आजही जमात उद दावाचा हाफिज सईद पाकिस्तानातून भारताला बेटकुळ्या दाखवीत राहिला आहे. पाकिस्तानी नेत्यांना आजही कारगिलमधील आगळिकीबद्दल खेद वाटत नाही. कारगिलचा कट रचणार्‍या मुशर्रफनी आपल्या ‘इन लाइन ऑफ फायर’ मध्ये कारगिलचे युद्ध लष्करीदृष्ट्या पाकिस्ताननेच जिंकले आहे आणि अमेरिकेच्या दबावाला नवाज शरीफ बळी पडले नसते तर आणखी तीनशे मैलांचा टापू पाकिस्तानने जिंकला असता अशी प्रौढी मिरवली. खरे तर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा ‘कारगिल’ नंतर डागाळली. अमेरिकेची पाकिस्तान समर्थनाची नीतीही बदलत गेली. जागतिक व्यापार केंद्रावरील हल्ल्यानंतर आणि लादेन पाकमध्ये सापडल्यानंतर तर समीकरणेच बदलली आहेत. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाही त्या युद्धाचा फटका बसला. पण तरीही पाकिस्तान पडलो तरी नाक वर करून वागते आहे आणि आपण कितीही मैत्रीचा हात पुढे केला तरी सुधारण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.