ब्रेकिंग न्यूज़

विजयारंभास टीम इंडिया सज्ज

>> पराभवांची हॅट्‌ट्रिक टाळण्याचे दक्षिण आफ्रिकेसमोर आव्हान

क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धा जिंकण्याच्या आपल्या मोहिमेला टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरुवात करणार आहे. स्पर्धेत सहभागी संघांचे एक किंवा दोन सामने झालेले असताना भारत आपला पहिलाच सामना आज खेळणार आहे. खेळपट्टींचे स्वरुप व प्रतिस्पर्ध्यांच्या क्षमतेची झलक सुरुवातीच्या आठवड्यांत भारतीय संघाला पहायला मिळाल्यामुळे याचा फायदा संघाला होऊ शकतो. इंग्लंडमधील वातावरणाचा अंदाज आल्याने तसेच टीम इंडिया आपला पहिलाच सामना खेळणार असल्यामुळे सलग दोन पराभवांमुळे धास्तावलेल्या दक्षिण आफ्रिकेला विजयी मार्गावर परतण्याची ही संधी असेल.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपला तिसरा विश्‍वचषक खेळणार आहे. खेळपट्टीचे स्वरुप पाहूनच संघाची निवड केली जाणार असून त्यानुसार संघातील फिरकीपटू व वेगवान गोलंदाजांची संख्या ठरणार असल्याचे विराटने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकारपरिषदेत स्पष्ट केले. भारतीय संघाचा विचार केल्यास आघाडीच्या तीन खेळाडूंवर अधिक भिस्त असल्याचे मागील दोन वर्षांत दिसून आले आहे. त्यामुळे मधल्या फळीत लोकेश राहुल, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर यांना स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. केदार जाधव सलामीच्या लढतीत खेळण्याची शक्यता खूप कमी असून रवींद्र जडेजा किंवा ‘थ्री डी’ विजय शंकर त्याची जागा घेऊ शकतो. लोकेश राहुलने सराव सामन्यांत केलेली फलंदाजी पाहता चौथ्या स्थानावर त्याला पसंती मिळण्याची शक्यता आहे. गोलंदाजी विभागात बुमराह, शमी व चहल यांची जागा पक्की असून इतर जागांची निवड विराटच्या खेळपट्टीच्या आकलनावर अवलंबून असेल. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याची रणनीती पहिल्या काही सामन्यांत यशस्वी ठरल्यानंतर उर्वरित सामन्यांतही याच रणनीतीचा केलेला वापर संघांच्या अंगलट आल्याचे मागील काही सामन्यांत दिसून आले आहे. खेळपट्टीचा योग्य अंदाज न येणे, संघाचा योग्य समतोल नसणे अनेक संघांना नडले आहे. दक्षिण आफ्रिका संघाचादेखील यात समावेश आहे. पहिल्या दोन सामन्यांत केलेल्या गंभीर चुकांची पुनरावृत्ती न करण्याचा दबाव दक्षिण आफ्रिकेवर असेल. डेल स्टेनच्या दुखापतीचे स्वरुप गंभीर असल्याचे काल स्पष्ट झाल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे. स्टेनच्या माघारीमुळे वेगवान गोलंदाजी विभागात त्यांचा वेगवान गोलंदाजी विभाग लुळा पडला आहे. बांगलादेेशविरुद्धच्या सामन्यात जायबंदी झालेला लुंगी एन्गिडी भारताविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे कगिसो रबाडाच्या रुपात केवळ एकच स्पेशलिस्ट वेगवान गोलंदाज संघात राहिला आहे. अष्टपैलू आंदिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, ख्रिस मॉरिस व उपलब्ध असल्यास डेल स्टेनचा बदली खेळाडू ब्युरन हेंड्रिंक्स यांना भारताच्या बलाढ्य फलंदाजी फळीला रोखावे लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्याला मुकलेला हाशिम आमला भारताविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची अपेक्षा आहे. परंतु, त्याच्या समावेशाबद्दल संघ व्यवस्थापनाने अजून जाहीर घोषणा केलेली नाही. केदार जाधव वगळता भारताचे उर्वरित सर्व खेळाडू तंदुरुस्त असून संघासाठी ही जमेची बाजू असेल. पराभवांमुळे ‘घायाळ’ झालेला दक्षिण आफ्रिकेचा संघ आज भारताचा पराभव करेल की भारतीय संघ विजयी सलामी देत प्रतिस्पर्ध्याचा सलग तिसरा पराभव निश्‍चित करेल हे आज कळणार आहे.

भारत संभाव्य ः शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी, विजय शंकर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल व जसप्रीत बुमराह.
द. आफ्रिका संभाव्य ः हाशिम आमला, क्विंटन डी कॉक, ऐडन मार्करम, रस्सी वेंडर दुसेन, फाफ ड्युप्लेसी, जेपी ड्युमिनी, आंदिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, ख्रिस मॉरिस, कगिसो रबाडा, इम्रान ताहीर