ब्रेकिंग न्यूज़

‘विकृत’ नजर… ‘संस्कृती’ची शिकार!

  • सौ. स्वाती अणवेकर, म्हापसा

अत्याचार करावासा वाटणे ही मानसिकताच मुळात विकृती आहे. अल्पवयीन मुलांपेक्षा मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण अधिक आहे. इथे भावनांचे बंध तुटलेले आहेत. माणुसकीचा रंग उडालेला आहे, अन् नात्यांच्या गोतावळ्यात आपलेपणा हरवलेला आहे. कोवळ्या वयातच वासनेचा विषारी डंख होतोय. जगातील एकूण लोकसंख्येपैकी ११ टक्के मुली युवावस्थेत गरोदर राहतात. जगात दरवर्षी ३० लाख अल्पवयीन मुलींचा गर्भपात होतो. भारतात हे प्रमाण ३ लाख इतके आहे. भारतात दरवर्षी १ लाख अल्पवयीन मुलींचा मृत्यू होतो. हे सर्व बदलण्यासाठी सर्वप्रथम पालक, मुलांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याची गरज आहे.

२०१३ मध्ये नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोने अल्पवयीन मुलांवरील अत्याचारांची यादी जाहीर केली होती. त्यानुसार अल्पवयीन मुलांवरील बलात्कार मध्यप्रदेश : २११२, महाराष्ट्र : १५४६, उत्तरप्रदेश १३८१, राजस्थान ८९२, केरळ ६३७ अशा गुन्ह्यांची नोंद आहे. तर अल्पवयीन मुलांवरील होणार्‍या अत्याचारांची आकडेवारी टक्केवारीत पुढीलप्रमाणे – नागालँड ९०, मिझोराम ७८.४, सिक्कीम ६६.७, उत्तरप्रदेश ५७.७, उत्तराखंड ५१.२, मेघालय ४६.७, पंजाब ४३, राजस्थान ३९.४, त्रिपुरा ३६.४, छत्तीसगड ३७.४, मध्यप्रदेश ३३.६, गोवा ३०.३, तामिळनाडू २६.३ अशी होती. आता हे प्रमाण बहुधा दुप्पट झाले असेल. दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत शिक्षेचे प्रमाण अत्यल्प आहे.

स्त्रीजन्मा ही तुझी व्यथा,
पिता रक्षती कौमार्ये, भर्ता रक्षती यौवने
पुत्रश्च स्थाविरे भावे, न स्त्री स्वातंत्र्य महती!’

स्त्रीच्या कौमार्याचे रक्षण पिता करतो. तारुण्याचे रक्षण पती करतो. मुलं मोठी झाली की ती स्त्रीचे संरक्षक बनतात. ह्याचाच अर्थ काय तर स्त्री ही वयाच्या कुठल्याच टप्प्यात स्वतंत्र जगूच शकत नाही. मनुस्मृतीमध्ये मनूने किती तरी वर्षापूर्वी लिहून ठेवलेले हे वचन आजच्या घडीला देखील तितकेच सत्य वाटते. आज २१ व्या शतकात पदार्पण केले आहे. आम्ही आज मंगळ, चंद्र अशा ठिकाणी मनुष्य वस्त्या प्रस्थापित करण्याची स्वप्ने पाहत आहोत. पण खरोखरच अशी प्रगती होऊन देखील माजामध्ये स्त्रियांच्या बाबतीत असणारी विचारसरणी बदलली आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर देखील एक मोठे प्रश्नचिन्हच आहे.

पूर्वी स्त्रियांना शिक्षण नव्हते म्हणून त्या लाचार, परावलंबी आयुष्य जगायच्या. म्हणून पूर्वीच्या समाजसुधारकांनी मोठमोठ्या चळवळी घडवून आणल्या आणि आपल्याकडे स्त्री शिक्षणाला गती मिळाली. ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ अशी म्हण रूढ झाली. पण आपण काय पाहतो आज शिक्षण घेऊन उच्च पदावर मोठमोठे कार्यभार जरी स्त्री सांभाळत असली तरी आपण हे मात्र छातीठोक पणे सांगू शकत नाही की, स्त्रियांचे आयुष्य खरोखरच पूर्णपणे बदलले आहे. ह्याचे कारण स्त्रीने शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, स्तरावर कितीही प्रगती केली तरी देखील तिचे स्त्रीपण ह्या सर्वांच्या आड येतेच. ह्याचे प्रमुख कारण आहे देवाने केलेली स्त्री देहाची विशेष सुकुमार जडण घडण. हे स्त्री शरीराचे वैशिष्ट्यच जणू स्त्रीच्या अस्तित्वाचा शत्रू बनले आहे.
आज आपण समाजामध्ये काय पाहत आहोत, बरेच सुशिक्षित, अशिक्षित नराधम हे स्त्रीच्या ह्याच वैशिष्ट्‌याचा गैरफायदा घेतात. ते स्त्रीला माणूस न समजता एक उपभोग्य वस्तूच समजतात. एखादा जंगली पशू जसा आपल्या हाती लागलेल्या सावजाचा फडशा पाडायला उतावीळ असतो, तसाच हा पुरुष नावाचा पशू समाजामध्ये वेगवेगळे वेश पांघरून वावरत असतो. कधी तिचा मित्र, कधी गुरु, कधी शिक्षक, सहकारी, नवरा, काका, मामा, सासरे हेच कशाला वडील, भाऊ सुद्धा. (ह्या दोन पवित्र नात्याचा देखील अपवाद वगळणे शक्य नाही) हे सर्वच अवतीभवती असणार्‍या स्त्रीरूपी सावजाचा जणू फडशाच पाडायला टपलेले असतात. आत्ताच नव्हे, तर बलात्कार, रेप, शीलहनन ह्या गोष्टी अगदी रामायण, महाभारत काळापासून आपण पाहत आलो आहोत. रामायणात रावणाने सीताहरण केले. आपल्या वासना पूर्तीसाठी, पण रामायण सीतेमुळे घडले, असा आरोप मात्र होतो. महाभारतात द्रौपदीचे वस्त्रहरण केले, दुर्योधनाने पण द्रौपदी पाच पांडवांची एकटी पत्नी म्हणून तिलाच दूषणे देणारे महाभाग ह्या जगात कमी नाहीत. शेवटी काय जेव्हा जेव्हा स्त्रीच्या चारित्र्यावर आघात होतो, तेव्हा तेव्हा समाज हा स्त्रीलाच दोषी ठरवून मोकळा होतो.

हल्लीच्या काळात तर स्त्री अत्याचाराची मालिका एवढी वाढली आहे की आपल्याच देशातील काही भागांमध्ये स्त्रियांचे वास्तव्य, त्यांचे स्वातंत्र्य, त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. दिल्ली, यूपी, बिहार, झारखंड ह्या वा अशा अनेक राज्यांमध्ये स्त्रियांचे रात्री अपरात्रीच नव्हे, दिवसा ढवळ्या देखील फिरणे असुरक्षित बनले आहे. इथे गल्ली बोळात असे पुरुष रूपी पशू स्त्रियांची चेष्टा, टवाळकी करायला जणू टपलेलेच असतात. आणि जर का एखाद्या स्त्रीने त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला तर मग हे बुरसटलेल्या विचारांचे पळपुटे लोक एक न अनेक शस्त्रे घेऊन तिच्यावर चढाई करण्यात शौर्य मानतात. ती शस्त्रे म्हणजे रेप, ऍसिड हल्ला करून तिला आयुष्य भरासाठी कुरूप करून टाकायचे. चाकू, सुरीचा वापर करून तिला जखमी करणे, अथवा तिला ठार मारणे. समाजातील ह्या बुजदिल प्रवृत्तीच्या लोकांची अपेक्षा तरी काय असते, स्त्रियांनी कायमच ह्यांना शरण यावे. नाहीतर ह्यांनी कोणत्या न कोणत्या प्रकारे तिला आयुष्यातून उठवण्याचा जणू चंगच बांधलेला असतो. ह्या अशा लोकांचा समजच जणू हा असतो की प्रत्येक स्त्री ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता आहे. स्त्रियांनी आयुष्यात कायम वेदनाच सहन करायच्या का?
पूर्वीच्या काळी एक पुरुष एका स्त्रीवर बळजबरी व रेप करायचा. पण आता ‘गँगरेप’ हा शब्द जणू नित्याचा व सवयीचा वाटू लागला आहे. या विकृत संकल्पनेची करावी तेवढी कीव कमीच आहे.

डिसेंबर २०१२ साली घडलेले निर्भया रेप व हत्याकांड. त्या प्रकारानंतर ह्या ‘गँगरेप’चा जणू सपाटाच आपल्या देशात सुरू झाला. पूर्वी तारुण्यात पदार्पण केलेल्या स्त्रियांवरच असे अत्याचार झालेले ऐकू यायचे. पण आता तर ह्याला छोट्या १-५ ह्या वयोगटातील मुली आणि वृद्ध महिला देखील अपवाद राहिल्या नाहीत. निर्भया हत्याकांडानंतर सर्वत्र लोकांनी मोठमोठी निदर्शने केली. सभा भरविल्या, शोकसभा घेतल्या. त्यावेळी सगळा समाज अगदी पेटून उठला होता. आणि हा पेटलेला ज्वालामुखी पाहून आपल्या सरकारचे देखील हृदय पाघळले आणि त्यांनी ह्या केससाठी खास ‘फास्ट टॅ्रक कोर्ट’ स्थापन केले. तेव्हा वाटले, ह्या नराधमांना एका वर्षात नक्की फाशीची शिक्षा सुनावली जाईल. पण इथेही कायद्याचे घोडे नेहमीप्रमाणे रखडले. आज या खटल्याला पाच वर्षे उलटून गेली तरी देखील गुन्हेगार तुरुंगात सुरक्षित आयुष्य जगत आहेत. तसेच एका प्रमुख बालगुन्हेगारास सुधारगृहातून मुक्त देखील केले. हे सगळे चित्र पाहिल्यावर असेच वाटते, जिने आपले प्राण नाहक दुसर्‍याच्या वासनेचा बळी होऊन गमावले, तिच्या गेलेल्या बळीपेक्षा ह्या सिस्टिमला त्या गुन्हेगारांचीच जास्त काळजी आहे. आणि म्हणूनच आपल्या जनतेच्या पैशांवर आरामात ते तुरुंगात सुखरूप आयुष्य जगत आहेत. का नाही, अन्य देशांप्रमाणे आपल्या देशात देखील बलात्कार, रेप ह्या खटल्यांमध्ये तातडीने निकाल देऊन अशा नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जात? हल्लीच्या काळात आपण ऐकतो, अगदी १-११ ह्या वयोगटातील चिमुरड्या मुली देखील ह्या अत्याचाराला अपवाद उरल्या नाहीत. त्यांची तर रेप करून निर्घृण हत्या देखील करताना ह्यांचे हात धजावत नाहीत. जेव्हा एखाद्या तरुण मुली अथवा स्त्रीवर असा अत्याचार होतो तेव्हा समाज वेगवेगळी कारणे देऊन अशा स्त्रियाच कशा ह्या सगळ्याला जबाबदार आहेत, हे पटवून देण्याचा अतोनात प्रयत्न करत असतो. त्या पिडीत स्त्रीने कसे अश्लील व चुकीचे कपडे घातले होते, ती कशी सगळ्यांशी बिनधास्त वागायची, ती कशी रात्री अपरात्री एकटी फिरायची, अशा तिच्या एक ना अनेक चुका दाखवून देण्यात हा समाज स्वत:ची धन्यता मानतो. पण त्या स्त्रीला झालेल्या यातनांचा, तिच्या मनावर ह्या घटनेचा झालेल्या परिणामांचा विचार एकालाही करावासा वाटत नाही. बरे जर ह्या तरुण स्त्रिया जर अशा चुका करतात, असे ह्या नराधमांचे म्हणणे आहे तर जेव्हा हेच नराधम अगदी कोवळ्या वयातील मुलींचा फडशा पाडतात व उपभोग घेतात तेव्हा ह्यांनी आपली माणुसकी कुठे गहाण टाकलेली असते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे का कुणाकडे? ह्या कोवळ्या चिमुरड्यांना तर आपल्या शरीराची, शरीरातील स्त्री सुलभ अवयवांची नीट ओळख देखील झालेली नसते. अगदी निष्पाप असतात त्या बिचार्‍या! त्यांना तर आपल्या सोबत काय घडते आहे हेच समजत नाही. ह्या अशा निष्पाप बाळांकडे पाहून एखाद्या पुरुषातील वडील, भाऊ जागृत न होता त्यांच्या देहाकडे पाहून त्यांची वासना कशी काय जागृत होते आहे? ह्याचे उत्तर कोणाकडे आहे का? ती चिमुरडी देखील नीट कपडे न घालता फिरत होती, म्हणून तिच्यावर हा अत्याचार झाला, असेच समाज म्हणणार. आता सरकारने एक नवीन कायदा काढला आहे, तो म्हणजे १२ वर्ष वयाच्या खालील मुलीवर रेप करणार्‍यास फाशीची शिक्षा सुनावली जाणार. असे हे कायदे कागदोपत्री करून त्याचा काहीच उपयोग नाही. हे कायदे अमलात आणून अपराध्याला कठोर शासन झाले तरच त्यांना अर्थ असेल.

आपल्या देशात एखाद्या स्त्रीवर जेव्हा असा अत्याचार होतो की आपल्याकडील प्रसारमाध्यमांना आयतेच खाद्य हाती लागते. ही सगळी माध्यमे योग्य ती परिस्थिती लोकांसमोर मांडायचे सोडून अक्षरशः तिच्यावर झालेल्या अत्याचाराचे जनतेसमोर वाभाडेच काढतात. त्या विषयावर वेगवेगळ्या राजकीय पक्षातील तज्ज्ञ व वरिष्ठ समजल्या जाणार्‍या मंडळीची चर्चा वजा वादविवाद स्पर्धाच भरवतात. काही न्यूज चॅनल्स तर पिडीत अथवा पिडीतेच्या नातेवाईकांना त्यांच्या नाजूक मनस्थितीमध्ये जे प्रश्न विचारतात ते पाहिले की असे वाटते हे लोक ह्यांच्या जखमांवर मलम लावतात की मीठ चोळतात? बरे ह्यातून सकारात्मक असे काहीच निष्पन्न होत नाही. मग अशा प्रकरणांना असे काही ‘राजकीय’ वळण दिले जाते की त्यात काही फुटीरवादी लोक आपल्या फायद्याकरिता जातिवाद, धर्मवाद देखील घुसवतात. खरेच ह्या अत्याचारात बळी गेलेल्या स्त्रीसाठी किंवा पिडीत स्त्रीसाठी ह्या गोष्टी केल्याने तिला हवा तो न्याय मिळतो का? आपल्या देशात ज्या स्त्री अथवा मुलीवर असे शारीरिक अत्याचार घडतात, तिलाच शेवटी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. आज देखील आपल्या देशात अशा स्त्रियांकडे मानाने पाहिले जात नाही. त्यांच्यावर अपराध करणारा पुरुष मात्र एवढे सगळे करून चक्क नामानिराळा होतो. कारण त्याला बहुतेक आपण काही तरी मोठेे पौरुषत्व गाजविले आहे, असेच वाटत असावे बहुधा.

जग पुढे चालले आहे. समाज सुधारत आहे, असे म्हणतो, मग सोज्वळपणा, नैतिकता, घराणे, समाज ह्यांचा मान, अब्रू, लज्जा हे सगळे मापदंड फक्त समाजातील स्त्रियांवरच लागू होतात का? एखाद्या स्त्रीची अब्रू एवढी तकलादू असते का, की ती तिच्यावर झालेल्या शारीरिक अत्याचाराने पूर्णपणे मलिन होऊन जाते. बरेचदा तर अशा प्रकारांत त्या पिडीत स्त्रीचे एवढे मानसिक खच्चीकरण केले जाते की त्या बिचारी समोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. स्त्रियांवरच प्रत्येक बाबतीत बंधने लादली जातात. त्यांनी कसे वागावे, कुठे जावे, कुठे जाऊ नये, किती वाजता घरी यावे, कोणते कपडे घालावे, कोणते घालू नयेत, हे सगळे नियम फक्त स्त्रियांनाच लागू होतात. या उलट पुरुषांना मात्र खुली सूट ह्या समाजाने दिली आहे. समाजात पुरुषप्रधान संस्कृती देखील ह्या अशा नियमांमुळेच निर्माण झाली आहे. स्त्रियांच्या चारित्र्याचे मापदंड जसे ह्या समाजात आहेत, तसेच ते पुरुषांसाठी का नसावेत. कधी कधी वाटते आपला हा समाजच स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांना जबाबदार आहे. कारण घरात मुलगी जन्माला आली की ती एक मोठी जबाबदारी आहे, असे आज देखील बर्‍याच कुटुंबांना वाटते. मग ती मोठी होत असताना ती मुलगी असून ती मुलापेक्षा कशी वेगळी आहे, आणि ती कशी दुबळी व अबला आहे, तसेच तिला कायम कुणाच्या तरी संरक्षणाची कशी गरज आहे, हीच जाणीव वारंवार करून दिली जाते. साहजिकच जेव्हा तिच्या घरातच तिला स्वत:च्या दुबळेपणाची जाणीव पदोपदी करून दिली गेली तर आपल्या देशात स्त्रीचे सशक्तीकरण होणार तरी कसे? घरातच मुलामुलींमध्ये भेद केला जातो. मुलाला हवे तेव्हा, हवे तिथे जायची मुभा असते. त्याच्यावर कोणतीही बंधने लादली जात नाहीत, आणि मुलीला मात्र ‘सातच्या आत घरात’ हा नियम आजही पुष्कळ घरांमध्ये लागू केला जातो. कुठे तरी स्त्रियांना कमकुवत बनविण्यात आपली कुटुंब व्यवस्था जबाबदार आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.

असे म्हणतात, वाघ देखील कायम शेळीच्या कळपात राहिला तर तो आपण वाघ आहे हे विसरून शेळीसारखा वागतो. मग स्त्रियांना सशक्त करायचे असल्यास तिच्या मनात ती किती खंबीर आहे, हे पटवून दिले पाहिजे. ती स्वतः स्वतःची नीट काळजी घेऊ शकते. तिला कोणाच्याच आधाराची गरज नाही, हे बीज जर घरातच तिच्या मनात रुजवून त्या प्रमाणे तिला समाजात सामोरे जायला तयार केले तर स्त्री देखील मर्दानी बनून समाजात वावरू शकेल, ह्यात शंकाच नाही.

स्त्रियांवर होणारे अत्याचार बंद व्हावेत, असे वाटत असल्यास तिला शारीरिक व मानसिक दृष्ट्‌या सशक्त करण्याची गरज आहे. शाळांमधून लहान वयातच मुलामुलींना एकत्रितपणे स्वसंरक्षणाचे धडे देणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे खास करून मुलींची शारीरिक ताकद कशी वाढेल ह्यावर भर देऊन त्याप्रमाणे कसरत, मैदानी खेळ तसेच योग्य आहार ह्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. स्त्री अत्याचारांवर लगाम घालायचा असल्यास रेप, बलात्कार ह्या संबंधीचे कायदे आपल्या देशात कडक करून ते फक्त कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी अशा गुन्ह्यांमध्ये लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. तसेच पिडीत स्त्रीचे मानसिक खच्चीकरण होणार नाही आणि ती पुन्हा समाजात अगदी ताठ मानेने वावरू शकेल, ह्याकडे देखील लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा प्रसार माध्यमांनी देखील ह्या घटनांचे गांभीर्य बाळगावे. वृत्त संकलन असे करावे की ते पाहून सरकार, पोलीस खाते, कायदा ह्यांनी अशा गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करून पिडीत स्त्रीला न्याय मिळवून द्यावा. मग अपराध करताना अपराधी १०० वेळा विचार करेल. आपल्या देशात फक्त स्त्रियांचेच सबलीकरण करणे हा पुरेसा उपाय ह्यावर नाही तर आपल्या देशातील प्रत्येक पुरुषाने स्त्री वर्गाचा आदर ठेवणे गरजेचे आहे. आजच्या मुलांना अर्थात उद्याच्या भावी पुरुषांना उत्तम मानसिक संस्कार देणे, हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. ह्यात पहिला भाग येतो तो आपण आपल्या (लिंग सापेक्ष) मुलांना कसा आहार देतो ते. त्यांना मिळणारा आहार हा घरगुती, सकस व पौष्टिक तसेच उत्तम दर्जाचा असावा. ह्या सर्वांचा परिणाम त्याच्या मानसिक विकासावर देखील होत असतो. आणि ह्यामुळेच काही मुले मग अशा चुकीच्या मार्गाला लागतात. आज जग अगदी छोटे झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कालची मुले लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट ह्यांचा सर्रास वापर करतात. त्यामुळे त्यांना सोशल मिडियावर हवी ती माहिती उपलब्ध होते. म्हणूनच पालकांनी आपले मूल सोशल मिडियाचा वापर का व कशासाठी करते, ह्याकडे बारीक लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच मुलांचे मानसिक आरोग्य चांगले रहावे म्हणून त्यांना ध्यान, योग अशा गोष्टींची आवड लावणे गरजेचे आहे. असे झाले तर त्यांच्या मनात अशा विकृत गोष्टींना थाराच उरणार नाही. अशा सर्व उपाययोजना आपण केल्या तर स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांवर पुष्कळ प्रमाणात आळा बसेल, ह्यात तीळ मात्र शंका नाही.