विकृती

  •  पौर्णिमा केरकर

आज थांबलेल्या जगाने आम्हाला आमच्या खर्‍याखुर्‍या अस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे, तरीही आम्ही आमच्या विचार-वागणुकीत बदल करू इच्छित नाही. ही अशी वृत्ती विनाशाकडे वाटचाल करणारी आहे.

पेडणे ते थिवी या रेल्वेमार्गावर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी घातपात घडवून आणण्यासाठी ते रूळ उखडून टाकले. परंतु सुदैवाने गस्त घालणार्‍या रेल्वेकर्मचार्‍यांमुळे ही गोष्ट वेळीच उघडकीस आली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. वर्तमानपत्रांत बातमी वाचल्यावर हे कोणा अतिरेक्यांचे काम, नाहीतर मग चोर, लुटारू, माथेफिरूचे काम असावे, असे वाटते. ‘कोरोना’च्या काळात उपजीविकेची साधने बंद आहेत, त्यामुळे हा अघोरी विचार अशाच विकृतीने पछाडलेल्या लोकांच्या मनात येणार. रूळ उखडले गेले आहेत ही गोष्ट जर वेळीच लक्षात आली नसती तर…? तर कल्पनाही करवत नाही की काय झाले असते ते! बातमी वाचली खरी, पण हृदयावर जोरदार आघात झाला. काय झाले आहे माझ्या समाजातील प्रत्येक घटकाला? त्यांच्या अंतःकरणातील संवेदनाच गोठून गेल्या आहेत का?

हे कृत्य काही कोणा चोर, लुटारू, अतिरेक्यांचे नव्हते; तर ते होते अजूनही मिसरूड न फुटलेल्या, दुधाचे दात न पडलेल्या कुमारवयीन मुलांचे. त्यातील एक मुलगा तर आताच पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेला बसणारा होता. पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली, नाहीतर आज आम्ही काय बघितले असते? ही मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची जबानी ऐकून तर मन हबकूनच गेले! आम्हाला रेल्वे रुळावरून कशी घसरते? अपघात कसा घडतो? माणसे कशी मरतात? हे बघायचे होते म्हणून आम्ही रूळ उखडले. काय म्हणावे या विकृतीला..? कोवळ्या मनाला लागलेली ही विकृतीची कीड समाजाला कोठपर्यंत नेणार आहे? जे वय या मुलांचे हसण्या-खेळण्याचे आहे, त्याच वयात ही अशी विकृती त्यांच्यात संचारते तरी कशी?

मानवी जीवनमूल्ये, संस्कार, कौटुंबिक-सामाजिक सहजीवन, एकमेकांप्रतीची आपुलकी, जिव्हाळा, प्रदेश-देश भावना, निसर्ग-प्राणी यासंदर्भातील संवेदना या वयात एकदमच सपाट झालेली. कोणाला कोणाचेच काही पडलेले नाही, कोणाला कोणाविषयी काहीही वाटत नाही. मला काय त्याचे? माणसे मरत आहेत, खून होत आहेत, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत आहे… होऊ दे, मला काय? रस्त्यावर अपघात होतात, पण अशा विकृत मानसिकतेला त्याचे विडिओ चित्रीकरण करायचे असते. अपघातग्रस्ताचे तडफडणे जिवाच्या आकांताने असते, पण चित्रीकरणात मश्गुल असलेली मग्रूरता माणुसकीचाच गळा आवळून टाकते. कोरगाव-पेडणे येथील युवकाला तो आपल्या मित्रमंडळीबरोबर समुद्रकिनारी गेला असता त्याच्याच ओळखीचा आणखीन एक मित्रांचा समूह त्याला बोलावून घेतो आणि सगळे मिळून सर्वांसमक्ष त्याला मारहाण करून त्याचा खून करतात. हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तर हे लोक युवकाला मारल्यावर त्याच्या अचेतन शरीरावर नाचतात. हा तर विकृतीचा कळसच झाला! त्यात एक पोलीस युवाही सामील असतो. कायदा हातात घेतल्यावर काय होऊ शकते याची या लोकांना माहिती नाही असे मुळीच नाही. असे असताना ही तरुणाई एवढी क्रूर-विकृत कशी होते?

काही वर्षांपूर्वी आमोणे गावात एका राजस्थानी युवकाचा असाच खून करून त्याचे अवयव कापून विविध जागी विखुरून टाकले होते. खुनात सामील झालेले गोमंतकीय तरुण होते. त्यातही एक पोलीस कर्मचारी होता. जनतेचे रक्षक भक्षक बनतात तेव्हा मग सर्वसामान्य जनतेचा विश्वास अशा यंत्रणेवरून उडतो. राग, त्वेष, चीड या भावना सगळ्यांच्या ठिकाणी असतात. असे असले तरी या भावनांनी विकृती गाठली की मात्र होत्याचे नव्हते होऊन जाते. अलीकडे ही अशी विकृत मानसिकता विकृतीचा कळस गाठीत आहे. आपलेपणा, जिव्हाळा ,नातं… हे सगळं विसरायला होत आहे. जो तो उठतो आणि स्वतःभोवती चौकट आखून घेतो. ‘माझं’, ‘मी’ ही दांभिकता त्यात ठासून भरलेली आहे. मी जे काही करीत आहे त्याच्या आड जर कोणी अडचण बनत असेल तर त्याला संपवूनच टाकायचे, मग भलेही त्याचे परिणाम कोणतेही झाले तरी मला त्याची तमा नाही, ही मग्रुरी, भावनाशून्य मनोवृत्ती समाजाला अधोगतीकडे नेणारी आहे. समाज, सुव्यवस्था, संस्कार, माणुसकी या सर्वच गोष्टी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. समाजात शिस्त असायला हवी, तेथील नागरिकांचे आचरण समाजमनाचा आदर करणारे असावे, देश-प्रदेशाला समाजाला घातक असलेले वर्तन नागरिकांनी करता कामा नये. असे असतानाही जेव्हा काही लोक या नियमाविरुद्ध वागतात, नियम हे मोडण्यासाठीच असतात अशीच ज्यांची ठाम समजूत असते, अशी प्रवृत्ती ही गुंड प्रवृत्ती आपण मानतो. मनोविकाराच्या भाषेत तर अशा प्रवृत्तीला समाजविघातक प्रवृत्तीचा व्यक्तिमत्त्व दोष असे संबोधले जाते. आणि हे असेच दोष आजच्या सर्व स्तरातील तरुणाईला व्यापून राहिलेले दिसतात. संयम, शिस्त, सहनशीलतेचा अभाव, वापरा आणि फेकाची मग्रुरी, ‘मला नाही तर कोणालाच नाही’ ही आढ्यता, माझ्या वाटेत कोण आडवं येईल त्याला सरळ कापूनच टाकायचे ही क्रूरता या पावलांना अराजकतेकडे घेऊन चालली आहे. हे असेच चालू राहिले तर नुसता विचार करणेसुद्धा भयानक वाटते. समाजाचे नियम तोडणे, लहानपणापासूनच गट करून मारहाण करणे, विडी-सिगारेट-तंबाखू-दारू-ड्रग्जचे व्यसन. खोटे बोलणे, अश्लिल वेबसाईट पाहणे, हिंसक घटनांचा थरार अनुभवणे, दुसर्‍यांना होणार्‍या वेदना अनुभवून अपरिमित आनंद घेणे, ही लक्षणे अशाच प्रकारच्या समाजविघातक प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. रेल्वेला होणारा अपघात प्रत्यक्षात अनुभवण्याची मानसिकता कुमारवयीन मुलात निर्माण व्हावी?

शिक्षण, संस्कार, कुटुंब या संकल्पनांना मुळातून गदगदा हादरवून टाकणारा हा प्रकार आहे. खून करणारे हात आम्हा गोमंतकीयांचे नाहीत, ते भायले असे म्हटले जायचे. परंतु ही कुमारवयीन मुलांची मानसिकता. त्याचबरोबर खून करून प्रेतावर नाचण्याची विकृती.
वास्कोत सुनेने आपल्या सासूला आणि पेशाने डॉक्टर असलेल्या आपल्या जावेला दुधातून विष पाजून थंड डोक्याने मारले होते. मंदार सुरलीकर या कुमारवयीन मुलाचा खून त्याच्याच मित्रांनी केला जे आर्थिकदृष्ट्या सक्षम कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले तरुण होते. अशा एक ना अनेक घटनांतून गोमंतकीय समाजमनाचीही मानसिकता कशी ढासळत चालली आहे याचेच प्रतीक बनून सामोरी येत आहे. सुशेगाद, संयमी, सुशिक्षित गोमंतकीयांसाठी या घटना खूप क्लेशदायक आहेत. विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, समाज, कुटुंब, प्रदेश या सर्वांनी मिळून यावर विचारमंथन करायला हवे. मुलांची बदललेली मानसिकता, मनोविकाराचे विविध प्रकार, असे म्हणून या घटनांकडे दुर्लक्ष करता कामा नये. तरुणाई बेफाम होत आहे. निसर्गाचा आस्वाद ती त्याला ओरबाडून, धांगडधिंगा करून, दारू ढोसून घेत आहे. सायबर गुन्हे नकळत्या मुलापर्यंत पोहोचले आहेत. ड्रग्जच्या विळख्यात निरागस पिढी गुरफटत आहे… या रिकाम्या हातांना कृतिशील काम हवे. हिंसक विचार करणार्‍या मेंदूला कलात्मक अंगाने वळवणे ही काळाची गरज आहे.

आज मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळ खर्च करण्याची मोठी गरज आहे. त्यासाठी कुटुंब, समाज, शाळा यांचा महत्त्वाचा सहभाग हवा आहे. आज थांबलेल्या जगाने आम्हाला आमच्या खर्‍याखुर्‍या अस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे, तरीही आम्ही आमच्या विचार-वागणुकीत बदल करू इच्छित नाही. ही अशी वृत्ती विनाशाकडे वाटचाल करणारी आहे. त्यासाठी जबाबदार घटकांनी वेळीच सजग बनून अशा विकृतीना आळा घालायला हवा…!