विकासाच्या नावाखाली विश्‍वजीत राणेंकडून लूट

विकासाच्या नावाखाली विश्‍वजीत राणेंकडून लूट

>> रवी नाईक यांचे वाळपईत आरोप

वाळपई शहरातून ग्रामीण भागांना जोडणारे सुसज्ज रस्ते, वीज, पाणी अशा मूलभूत गरजा सर्वसामान्यांना देण्यास विश्‍वजीत राणे अपयशी ठरले आहेत. विकासाच्या नावाखाली त्यांनी लूट केली असल्याचा आरोप करून जो विकास जनतेच्या फायद्याचा नाही तो काय कामाचा असा सवाल फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी काल वाळपई येथे पत्रकार परिषदेत केला.
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाही हे वाळपईतील जनता यावेळी विश्‍वजीत यांचा पराभव करून दाखवून देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. आपण कोठे फिरावे व कोठे फिरू नये हे सांगणे म्हणजे विश्‍वजीत यांचा बालिशपणा आहे. आपण कॉंग्रेसचा आमदार असून वाळपई मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार म्हणून रॉय नाईक रिंगणात असल्याने त्यांच्या प्रचारासाठी आपण वाळपईत कोठेही फिरू शकतो. कुठे फिरावे यासाठी आपल्याला विश्‍वजीत यांच्या सल्ल्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेसच्या जीवावर राजकीय प्रवास करणार्‍या विश्‍वजीत राणे यांनी कॉंग्रेस पक्षाचा आमदार म्हणून राजीनामा देऊन जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी कॉंग्रेस पक्ष सोडणार्‍या विश्‍वजीत यांना वाळपईतील स्वाभीमानी जनता जागा दाखवणार असल्याचा दावा त्यांनी केला.