विंडीजचा इंग्लंडला शॉक!

>> पहिली कसोटी ४ गड्यांनी जिंकली

>> ब्लॅकवूडचे शतक थोडक्यात हुकले

जर्मेन ब्लॅकवूड याच्या दमदार ९५ धावा व त्याने रॉस्टन चेज याच्यासह चौथ्या गड्यासाठी केलेल्या ७३ धावांच्या भागीदारीच्या बळावर वेस्ट इंडीजने इंग्लंडचा पहिल्या कसोटी सामन्यात चार गड्यांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विंडीजने विजयासाठीचे २०० धावांचे लक्ष्य ६४.४ षटकांत ६ गडी गमावून गाठले. ‘कोरोना ब्रेक’ नंतर झालेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता.

इंग्लंडने विजयासाठी समोर ठेवलेल्या २०० धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची दुसर्‍या डावात चांगली सुरुवात झाली नाही. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा यॉर्कर लागल्यामुळे सलामीवीर जॉन कॅम्पबेल याला ‘जखमी निवृत्त’ होऊन मैदान सोडावे लागले. यावेळी तो केवळ एक धावा करून खेळत होता. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केलेल्या अनुभवी क्रेग ब्रेथवेट याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु, दुसर्‍या डावात त्याला अपेक्षापूर्ती करता आली नाही. आर्चरचा एक उसळता चेंडू बचावात्मकरित्या खेळण्याच्या नादात त्याने चेंडू यष्ट्यांवर ओढवला. त्याला केवळ चार धावांचे योगदान देता आले. ब्रेथवेट माघारी परतला त्यावेळी फलकावर केवळ सात धावा लागल्या होत्या.

चौथ्या स्थानावर उतरलेल्या नवोदित शेमार ब्रूक्स याला आर्चरच्या एका झपकन आत आलेल्या चेंडूने यष्ट्यांसमोर गाठले. पायचीत होऊन तंबूची वाट धरावी लागलेल्या ब्रूक्सला पाच चेंडू खेळूनही भोपळाही फोडता आला नाही. शेय होप याच्या अपयशाची मालिका दुसर्‍या डावातही कायम राहिली. संघाला आधार देण्याची गरज असताना बेजबाबदार फटका खेळल्यामुळे त्याला आपल्या यष्ट्या गमवाव्या लागल्या. होप परतला त्यावेळी विंडीजचा संघ ३ बाद २७ अशा संकटात सापडला होता. यावेळी रॉस्टन चेज व ब्लॅकवूड यांनी संघाचा कोसळता डोलारा सावरला. वर्तमान संघातील विंडीजचा दुसर्‍या डावातील सर्वांत यशस्वी फलंदाज रॉस्टन चेज (३७) व संघात पुनरागमन केलेला जर्मेन ब्लॅकवूड (९५ धावा, १५४ चेंडू, १२ चौकार) यांनी चौथ्या गड्यासाठी ७३ धावांची मौल्यवान भागीदारी करत संघाचे शतक फलकावर लगावले.

यजमान इंग्लंडच्या क्षेत्ररक्षकांनी धावा रोखण्याच्या तसेच बाद करण्याच्या अनेक संधी दवडत विंडीजला हातभार लावला. चेज बाद झाल्यानंतर यष्टिरक्षक फलंदाज शेन डावरिच याने ब्लॅकवूडची चांगली साथ दिली. डावरिचने केवळ २० धावांचे योगदान दिले असले तरी पाचव्या गड्यासाठी ६८ धावा जोडल्या. स्टोक्सने डावरिच तसेच आपल्या दुसर्‍या कसोटी शतकाच्या दिशेेने आगेकूच करणार्‍या ब्लॅकवूड याला बाद करत विंडीजची ६ बाद १८९ अशी स्थिती केली.

या झटपट बळींमुळे सामना पुन्हा रंगतदार झाला. केवळ शेपूट उरल्यामुळे जायबंदी झालेला सलामीवीर कॅम्पबेल पुन्हा मैदानावर उतरला. त्याने नाबाद ८ धावा करत कर्णधार जेसन होल्डर (नाबाद १४) याच्या साथीने वेस्ट इंडीजचा धमाकेदार विजय साकार केला.
तत्पूर्वी, चौथ्या दिवसाच्या ८ बाद २८४ धावांवरून काल पुढे खेळताना इंग्लंडचा दुसरा डाव ३१३ धावांत संपला. जोफ्रा आर्चरने फटकेबाजी करत २३ धावा जमवल्याने इंग्लंडला आपली एकूण आघाडी १९९ धावांपर्यंत नेता आली. पाहुण्या वेस्ट इंडीजकडून शेन्नन गॅब्रियलने ७८ धावांत ५, अल्झारी जोसेफने ४५ धावांत २, ऑफ स्पिन गोलंदाज रॉस्टन चेजने ७१ धावांत २ तर कर्णधार जेसन होल्डरने ४९ धावांत एक गडी बाद केला.

इंग्लंडने पहिल्या डावात २०४ व दुसर्‍या डावात ३१३ तर विंडीजने पहिल्या डावात ३१८ धावा केल्या होत्या. सामन्यात १३७ धावा मोजून ९ गडी बाद केलेला जलदगती गोलंदाज शेन्नन गॅब्रियल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतील दुसरा सामना मॅचेस्टर येथे १६ जुलैपासून खेळविला जाणार आहे.