ब्रेकिंग न्यूज़

वाहतूक खात्यात १ जुलैपासून रोख स्वीकारणे होणार बंद

>> एक हजारावरील रक्कम कार्डमार्फतच

वाहतूक संचालनालयाने कॅशलेस होण्यासाठी प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर येत्या १ जुलैपासून १ हजार रुपयांपेक्षा अधिक शुल्काची रक्कम रोख स्वरूपात स्वीकारणे बंद केले जाणार आहे. ही शुल्काची रक्कम डेबिट किंवा क्रेडिट कार्डाद्वारे स्वीकारली जाणार आहे.

वाहतूक संचालनालय १ ऑक्टोबरपासून कॅशलेस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅशलेसबाबत जनजागृतीसाठी पहिल्या टप्प्यात १ जुलैपासून १ हजार रुपयांवरील शुल्क रोख स्वरूपात स्वीकारले जाणार नाही. वरील रक्कम डेबिट किंवा क्रेडिट कार्डाद्वारे स्वीकारण्यात येणार आहे. वाहतूक कार्यालयात रोख रक्कम सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. कार्डाच्या माध्यमातून भरण्यात येणार्‍या शुल्काची रक्कम सकाळी १० ते संध्या. ५ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे. यासंबंधीचे परिपत्रक वाहतूक खात्याच्या संचालकांनी जारी केले आहे.

खात्यात कामासाठी येणार्‍या एखाद्या व्यक्तीकडे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसल्यास संबंधित डीडीओने चलन तयार करून शुल्काच्या रक्कमेचा स्वीकार केला पाहिजे. संबंधित बँकांनी उपलब्ध केलेल्या पीओएस मशीनचा वापर शुल्क स्वीकारण्यासाठी केला पाहिजे, असे परिपत्रकात म्हटले आहे.