ब्रेकिंग न्यूज़
वास्को-पणजी जलमार्गावर लवकरच कॅटमरान बोटसेवा

वास्को-पणजी जलमार्गावर लवकरच कॅटमरान बोटसेवा

दाबोळी विमानतळावर उतरल्यानंतर गोव्याची राजधानी पणजी गाठण्यासाठी बायणा – पणजी – जुने गोवे या जलमार्गावर लवकरच कॅटमरान बोटसेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेसाठी दृष्टी मरीन या कंपनीने ४० आसनी दोन कॅटमरान घेतल्या आहेत. दाबोळी विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांसाठी बायणा येथे बोट धक्क्याकडे ये-जा करण्यासाठी मोफत बससेवा पुरविली जाईल. गोव्यात येणार्‍या पर्यटकांसाठी ही सेवा एक आकर्षण ठरणार आहे.

पर्यटकांना वातानुकूलित आणि विनावातानुकूलित या दोन प्रकारात या कॅटमरानमधून प्रवास करता येणार आहे. बागा, आग्वाद आणि जुने गोवे या पर्यटन स्थळांपर्यंत या कॅटमरान सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. या कॅटमरानवरील कर्मचार्‍यांची खासियत म्हणजे कोणत्याही आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी ते सक्षम व प्रशिक्षित असतील. सध्या विमानतळावर उतरल्यावर पुढील प्रवासासाठी टॅक्सी हाच एकमेव पर्याय उपलब्ध होता. त्याला आता जलमार्ग पर्यायाची जोड मिळणार आहे.

विमानतळ बोट टर्मिनल ते पणजी विनावातानुकूलित जलप्रवासाठी ५०० रुपये तर वातानुकूलित सेवेसाठी ८०० रुपये शुल्क आकारले जातील. तसेच विमानतळ बोट टर्मिनल ते जुने गोवे विना वातानुकूलित ५५० रुपये व वातानुकूलित ८५० रुपये तिकीट आकारले जाईल. पणजी (बंदर कप्तान धक्का) ते जुने गोवे विनावातानुकूलित १०० रुपये आणि वातानुकूलित १५० रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे.