वारंवार लॉकडाऊन करणे परवडण्याजोगे नाही ः विश्‍वजित

पुन्हा पुन्हा लॉकडाऊन करता येत नसल्याचे व तसे करणे परवडण्याजोगे नसल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल सांगितले. कोरोनाविरुद्ध सर्वांनी एकत्रित लढा देणे हाच आता त्यावरील उपाय असल्याचे ते म्हणाले. त्यासाठी आपसात न लढता सर्वांनी एकत्रित लढा दिल्यास विजय आमचाच आहे. विरोधकांनी ही बाब समजून घेण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

ज्या भागांत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला आहे त्या भागांत लॉकडाऊन करावे अशी जी लोक मागणी करीत आहेत त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले, की अशा प्रकारे एकामागोमाग एका गावात लॉकडाऊन केले जाऊ शकत नाही. त्याऐवजी लोकांची चाचणी करणे, लोकांना विलगीकरणात ठेवणे अशा उपायांचा अवलंब केला जात असल्याचे ते म्हणाले. काय करणे शक्य आहे व कसे पुढे जाता येईल याचा वेळोवेळी विचार व्हायला हवा.