‘वायू’ चक्रीवादळामुळे राज्यात सर्वत्र पडझड

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू या चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची नोंद झाली असून सोसाट्याच्या वार्‍यामुळे विविध ठिकाणी झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. राज्यभरात झाडांच्या पडझडीच्या शंभर पेक्षा जास्त कॉल्सची नोंद अग्निशामक दलाकडे झाली आहे. मागील चोवीस तासात फोंडा येथे सर्वाधिक ५६.० मिलिमीटर, मडगाव येथे ५१.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती वेधशाळेने दिली आहे.

राज्यभरात वायू चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहत आहे. तसेच विविध भागात जोरदार पाऊस पडत आहे. फर्मागुडी, फोंडा येथे एका कारगाडीवर झाड कोसळल्याने नुकसान झाले आहे. पावसामुळे विविध भागात गटारातील गाळ, माती रस्त्यावर पसरल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. झाडांच्या पडझडीमुळे विविध भागात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. पावसामुळे कमाल तापमानात थोडीशी घट नोंद झाली आहे.

मागील चोवीस तासात म्हापसा येथे २०.२ मिलिमीटर, पेडणे येथे ४३.२ मिलिमीटर, फोंडा येथे ५६ मिलिमीटर, पणजी येथे ३३.३ मिलिमीटर, ओल्ड गोवा येथे २०.८ मिलिमीटर, साखळी येथे २४.८ मिलिमीटर, वाळपई येथे २८.९ मिलिमीटर, काणकोण येथे ३२.८ मिलिमीटर, दाबोळी येथे १६.८ मिलिमीटर, मडगाव येथे ५१.३ मिलिमीटर, मुरगाव येथे ११.८ मिलिमीटर, केपे येथे १७ मिलिमीटर, सांगे येथे २०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

अग्निशामक दलाचे कर्मचारी कोसळलेली झाडे हटविण्याच्या कामात गुंतले आहे. उत्तर गोव्यातून सुमारे ४० ते ४५ कॉल्सची नोंद झाल्याची माहिती पणजी येथील कार्यालयातून देण्यात आली आहे. मडगाव परिसरात १४ कॉल्स व सावर्डे, सांगे, कुडचडे , वेर्णा या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. या भागातील कॉल्सची सविस्तर माहिती मिळू शकली नाही. तरीही, पन्नास ते साठ कॉल्सची नोंद होण्याची शक्यता मडगाव येथील अग्निशामक दलाच्या कार्यालयाकडून व्यक्त करण्यात आली आहे.