वादळी वार्‍यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

वादळी वारा व गडगडाटासह आज मंगळवारी राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून त्याचे रुपांतर वादळात होणार आहे. हे वादळ गोव्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकणार आहे. मात्र, या वादळाचा तडाखा हा किनारपट्टीलाच बसणार असल्याचे पणजी वेधशाळेचे संचालक कृष्णमूर्ती यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मंगळवारी राज्यात मोठ्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल. तसेच वादळामुळे किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहणार आहे. वार्‍याचा वेग ताशी ४५ ते ५५ कि. मी. एवढा असेल. हे वादळ दक्षिण दिशेकडून गोव्याच्या किनारपट्टीवर सरकत पुढे जाणार असल्याने या वादळाचा तडाखा हा उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण किनारपट्टीला जास्त बसण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली.

या वादळाचा जोर राज्यात १२ तासांपर्यंत राहण्याची शक्यता कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केली.अरबी समुद्र व लक्षद्वीप बेट हे या कमी दाबाच्या पट्‌ट्याचे केंद्रस्थान आहे. मच्छीमारांनी तसेच राज्यात येणार्‍या पर्यटकांनी समुद्रात उतरू नये असा इशारा ‘दृष्टी मरिन’ने दिला आहे.