ब्रेकिंग न्यूज़
वाढत्या बालवयातील लठ्ठपणाची चिंता

वाढत्या बालवयातील लठ्ठपणाची चिंता

गुटगुटीत मुले कोणाला आवडत नाही! आईवडलांना तर आपल्या गुटगुटीत, गोंडस बाळाचे भारीच कौतुक असते. पण हा गुटगुटीतपणा आहे की लठ्ठपणा यातला फरक जेव्हा लक्षात येतो तेव्हा मात्र हाच आनंद काळजीने घेरला जातो. कमी वजन असणे जसे कूपोषणाचे लक्षण आहे तसेच अतिरिक्त चरबी साचणे किंवा वजन जास्त असणे हेदेखील कूपोषणाचेच लक्षण आहे. मोठेपणी लठ्ठ असणे हा बालवयातील लठ्ठपणाचा गंभीर परिणाम आहे. मुलांमधील लठ्ठपणा मोठ्या माणसांमधील लठ्ठपणापेक्षा अधिक अपायकारक असतो. बालवयातील लठ्ठपणामुळे हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, सांध्यांचे विकार अशा प्रकारचे विकार अगदी विशी-तिशीतच मागे लागतात. बालपणापासून स्थूल असलेल्या व्यक्तींचे आयुष्यमान सरासरीपेक्षा कमी असते.
शरीरात सर्वत्र केवळ मेदधातूची वृद्धी अधिक प्रमाणात होते, याला आयुर्वेद शास्त्रात ‘मेदोरोग’ असे म्हटले आहे, म्हणजेच आपला लठ्ठपणा होय.  विशिष्ट अशा कारणांनी मुलांमध्ये बहुतेक वेळा सदोष आहार सेवनाने, व्यायामाच्या अभावामुळे, अति तणावामुळे मेद धातूची वृद्धी होते. वृद्ध झालेल्या मेदाने स्रोतोरोध निर्माण होतो आणि अन्य धातूंची पुष्टी होईनाशी होते. मेदामुळे अवरोध झाल्याने वायुच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन वायु विमार्गग होतो. हा विमार्गग वायु अवरोधामुळे कोष्ठात संचारित होत राहिल्याने भूक जास्त लागते व खाल्लेले लगेच पचते. अधिकच खाण्याची इच्छा होत राहते. या अधिक आहाराने पुन्हा अधिक मेदाची वृद्धी होते व त्यातून पुन्हा स्रोतोरोध… असे विषचक्र अव्याहतपणे चालू राहते आणि शरीरातील मेदसंचित अधिकाधिक वाढतच जाते. मेदधातूचा उपचय न होता, विकृत गुणांचा, अतिप्रमाणात असा मेदधातू उत्पन्न होत राहतो. त्यापुढील अस्थि, मज्जा व रसवह स्रोतसांनाही दुष्ट करून सर्वच शर्‍ीर धातूंच्या प्राकृत निर्मितीत अडथळा उत्पन्न करतो व यालाच लठ्ठपणा म्हणतात.
लठ्ठपणातील प्रमुख कारणे….
– अनारोग्यदायी आहार
वाढत्या आधुनिकीकरणामुळे आपली सर्वांचीच जीवनशैली बदललेली आहे व मुलंही याला अपवाद नाहीत. याची सुरुवात अगदी मुल जन्माला आल्यापासूनच होते. स्तन्यपानाऐवजी डबाबंद पावडरच्या दुधापासूनच अहितकर अशा आहाराची सुरुवात होते. बर्‍याच आयांमध्ये स्तन्यनिर्मितीच कमी होते तर काही आया पुढे कामावर रुजू व्हायचे आहे तेव्हा बाळाला बाटलीच्या दुधाची सवय लागावी म्हणून जन्माला आल्यापासूनच बाहेरचे दूध द्यायला सुरुवात करतात.
सहा महिन्यांनंतर जिथे भाज्यांचे सूप, फळांचा रस, विविध कडधान्यांची आमटी, खिचडी असा आहार द्यायला हवा तिथे वेळेअभावी डबाबंद असा आहार सुरू केला जातो. पाश्‍चात्त्य देशात या प्रकारचा आहार देण्याचे कारण म्हणजे त्यांना भारतीय आहार संकल्पनेचे ज्ञानच नाही. पण आपण मात्र त्यांचेच अनुकरण करतो व कडधान्ये, फळांची पावडर, न शिजवता तशीच दुधात मिसळून झटपट मुलांना भरवतो. हे सोयीचे आहे पण आरोग्यपूर्ण आहे का?
धावपळ एवढी वाढली आहे – सकाळी लवकर उठून, आवरून सर्वांनाच शाळा, ऑफिस गाठायची घाई. त्यामुळे ब्रेकफास्टला ब्रेड, बटर, जाम, सॉस आणि शाळेतल्या डब्यातही केक, पेस्ट्री, वेफर्स, बिस्किट. तरी बरे सध्या थोडीशी सुधारणा होऊन बर्‍याच शाळांमध्ये पोळी-भाजीचा डबा सक्तीचा केला आहे.
मुलांना वेळ देता येत नसल्याने, त्यांचे लाड पुरविण्याचे मोठे अस्त्र म्हणजे त्यांच्या आवडीचा रोज खाऊ आणणे. कामावरून येताना पहिले पहिले आपण कौतुकाने काही-बाही खायला आणतो व मग मात्र हे नित्याचेच होते व मुलांनाही त्या खाण्याची सवय लागते. बरेचदा त्या खाण्यामध्ये तळलेले चटकदार पदार्थ उदा. समोसा, वडा-भजी किंवा केक, पॅटीस, पेस्ट्री किंवा पिझ्झा, बर्गर, सँडविच किंवा आईसक्रीम, कोल्ड ड्रिंक सारख्याच पदार्थांचा समावेश असतो. मुलांनाही जंक फूड प्रिय असते. आपल्या परंपरागत आहारापेक्षा मुलांचा ओढा हा पॅकबंद, चरबीयुक्त फास्ट फूड खाण्याकडे असतो.
टीव्हीवरच्या जाहिरातीसुद्धा दोन मिनिटांत तयार होणार्‍या नूडल्सच्या तसेच चटकदार, अति उष्मांक देणार्‍या पदार्थांच्याच असतात. त्यामुळे त्यातला प्रत्येक प्रकार आणून पहायचा मोह हा होतोच.
मुलांना खायला-प्यायला काही कमी पडता कामा नये म्हणून फ्रीजमध्ये सॉफ्ट ड्रिंक, एरिएटेड ड्रिंक, गोड पेय, आईसक्रीम ठेवण्याची जणू प्रथाच रूढ झाली आहे. पाहुणे आले तरी धावपळ होत नाही.
अति खाणे
– घरात कोणी नसल्यास वेळ घालवायचा म्हणून अरबट चरबट अति खाणे होतेच.
– टीव्ही, कॉम्प्युटरसमोर चिप्स, चॉकलेट्‌स आणि शीत पेय रिचवत आरामात वेळ घालवत अति खाणे.
– भूक नसताना, खाल्लेले पचले नसताना खाणे.
जेव्हा शारीरिक हालचालच कमी असते तेव्हा या अतिखाण्याने मुलांच्या पोटात अति उष्मांक जातात व शरीरातील मेद वाढतो व पर्यायाने लठ्ठपणा वाढतो.
शारीरिक हालचाल कमी
– बालवयात मुलांच्या शरीरात मेद साठण्यासाठी शारीरिक हालचालींचे कमी प्रमाण हा महत्त्वाचा घटक आहे.
टीव्ही आणि संगणक यांच्यापुढे बसून दिवसातले चार-पाच तास मुले घालवतात. यात भर म्हणून विविध आधुनिक गॅजेट्‌स, व्हिडिओ गेम्स व मोबाइल यांनीही आपला हातभार लावून मुलांना एका जागेवर चिकटवून ठेवले आहे.
एखादं मूल, फ्लॅट – अपार्टमेंट, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुले खेळणार कोणाबरोबर व कुठे… हा एक महत्त्वाचा प्रश्‍न आहेच.
गृहपाठ आणि शिकवणी यामुळे दिवसातील बहुतेक वेळ मुले नुसती बसूनच असतात. या सगळ्या गडबडीत वेळापत्रकामध्ये खेळाला, व्यायामाला स्थानच देता येत नाही. हल्ली शाळेत चांगली मैदानेही नसतात. घराच्या भोवती पुरेशी जागाही नसते. पोहण्याचे तलाव, बॅडमिंटन, टेनीसकोर्टमधलं दर्जेदार प्रशिक्षण महागही असतं. शाळा-क्लास-ट्यूशन यांमध्ये मुले पूर्ण अडकतात. हालचाल कमी होते, धावपळ होते, ताण येतो व स्थौल्य जन्माला येते.
गरोदरपणात मातेला झालेला मधुमेह
गरोदरपणी मातेला मधुमेह असेल तर जन्मणारी मुले अधिक वजनाची असतात. त्यासाठी गरोदरपणीच मातेने आपले वजन आणि मधुमेह आटोक्यात ठेवले पाहिजेत.
बालकांना पहिले सहा महिने निव्वळ स्तन्यपानच द्यावे. स्तन्यपान करणार्‍या मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण कमी असते. वरचे दूध पिणार्‍यांमध्ये ते जास्त असते.
अनुवंशिकता
लठ्ठपणामध्ये अनुवंशिकतेचा भागही असतो. अगोदर सुप्त अवस्थेत असलेली जनुके (जीन्स) परिस्थितीनुसार जागृत होऊन लठ्ठपणा व्यक्त करतात.
लठ्ठपणातील सामान्य लक्षणे….
– सर्व शरीरात विशेषतः त्वचेखाली मेदाची अतिप्रमाणात वृद्धी होणे हे मेदोरोगाचे प्रत्यात्मिक असे लक्षण आहे.
– आळस, स्वेदाति प्रवृत्ती, दौर्बल्य, दौर्गंध्य, स्वेदावाध, अतिक्षुधा व अतितृष्णा अशी लक्षणे लठ्ठपणात आढळतात.
लठ्ठपणातील चिकित्सा व उपचार
लठ्ठपणामध्ये मुख्यतः आहारावर नियंत्रण ठेवणे ही चिकित्सा आवश्यक असते. पण जिभेवर ताबा ठेवणे लहान मुलांना फारच कठीण. त्यामुळे स्थूल मुलांचं वजन कमी करणं कठीण जातं. लठ्ठ मुलं प्रमाणाबाहेर खातातच असं नाही. पण त्यांच्या पोटात जाणारे उष्मांक आणि वापरले जाणारे उष्मांक यांच्यात तफावत असते. आहार खूपच अधिक प्रमाणात असतो आणि त्याला योग्य असा व्यायाम मिळत नाही. मुलांना भूक असेल तितकंच खायला द्यावं. जोर-जबरदस्ती करून खायला घालू नये.
आहार व औषधी द्रव्ये ही कफहर व मेदघ्न वापरली पाहिजेत. पण त्यामुळे वातप्रकोप होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. आहारात वापरण्याची द्रव्ये ही पचनास जड, परंतु ज्यामध्ये सारभाग कमी अशी असावीत. आहार द्रव्येही रुक्ष व कठीण असणे लाभदायी ठरते.
अनेक प्रकारची तृणधान्ये – विशेषतः नाचणी, वरी, बाजरी यांचा उपयोग करणे फायदेशीर ठरते.
लहानपणापासूनच मुलांना आदर्श भारतीय आहार वरण-भात, पालेभाज्या, फळभाज्या, कंद-भाज्या, पोळी, भाकरी, दूध-तूप-लोणी अशा प्रकारचा आहार घेण्यास प्रवृत्त करावे. अर्थातच मोठ्यांनीही असाच आहार घ्यावा. फळे-भाज्यांचा वापर अधिक करावा.
मधल्या वेळेतही चॉकलेट्‌स, चिप्स, बिस्किटे, आईसक्रीम, केक यांसारख्या मैदायुक्त बेकरी पदार्थांवर पूर्ण बंधन घालावे.
आई-वडील दोघेही नोकरी-व्यवसायात कितीही बिझी असले तरी मुलांचे लाड पुरविण्यासाठी सारखे हॉटेलमध्ये खाणे नकोच. कारण हॉटेलच्या खाण्यात साधारण तिप्पट तेल असते. त्याचप्रमाणे हल्ली पालकांमधील व मुलांमधील बॉंडिंगही कमी होत चाललेय. त्यामुळे वडलांच्या सहकार्याने आईने स्वतः बनवलेले पदार्थ नेहमीच शरीराला हितकारकच ठरतील व मुलंही आनंदित होतील.
शाळांमधील कँटीनमधून आदर्श आहार मिळावा म्हणून पालक-शिक्षक संघाने पुढाकार घ्यावा.
प्रसारमाध्यमांनी आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी आहाराबद्दल शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोचवावी. मुलांना भुरळ पाडणार्‍या जाहिरातींवर बंधनं घालावेत, तसेच फळे – भाज्या अशा आहार द्रव्यांचे महत्त्व सांगणार्‍या कार्यक्रमांना प्रेरणा द्यावी.
मुलांच्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवणे, ही एक अतिशय अवघड पण आवश्यक गोष्ट आहे. त्यामुळे मोठ्या मुलांना काही दिवस त्यांनी खाल्लेल्या प्रत्येक खाद्यपदार्थाची नोंद ठेवण्यास सांगावे. त्यानंतर आहारातला कोणता भाग सुधारता येईल, याबद्दल चर्चा करावी. आहारातील बदल हळुहळू मुलांच्या कलाने करावेत.
कधी कधी कंटाळा आल्यावर किंवा एकटे असताना मुलं जास्त खातात. रिकामपणी चटकदार, घन उष्मांकी पदार्थ हाताशी ठेवू नयेत. अशावेळी चुरमुरे, शेंगदाणे, चणे-फुटाणे, सुका मेवा किंवा फळांसारखे पदार्थ खाण्यास सांगावे.
आहारात तंतुमय पदार्थ आणि पाण्याचा समावेश करावा, म्हणजे पोट भरल्याची भावना होते. लठ्ठपणात तिखट व कडू पदार्थांचे सेवन करावे. तिखट व कडू द्रव्यांनी सिद्ध केलेले पाणी पिण्यास द्यावे. पिण्याचे पाणी नेहमी गरम असावे. पाणी प्यायच्या वेळेस गरम हवे. तापवून गार केलेले पाणी नव्हे! महिन्याकाठी एक ते दोन किलो वजन कमी होतं आणि कोणत्याही प्रकारे अशक्तपणा येत नाही.
मध हेही अपतर्पण करणार्‍या द्रव्यांपैकी एक चांगले द्रव्य आहे. मध गुरू असून त्याने अग्निदीपन घडत नाही. उलट अपतर्पण मात्र घडते व मेदोधातूचे क्षरण होते.
मुलांना ज्या गोष्टी वर्ज्य असतील, त्या घरात आणायच्याच नाहीत. सर्वांनीच टाळाव्यात. पालकांनी न करणेच बंधनकारक आहे.
अभ्यास-गृहपाठाइतकंच महत्त्व व्यायाम व खेळाला द्यावे. वाढीच्या वयातच व्यायामाची गोडी लावावी. खेळ व व्यायामाचे महत्त्व पटवून द्यावे. पालकांनी मुलांच्या खेळांमध्ये – व्यायामामध्ये सहभाग घ्यावा. दिवसाकाठी किमान एक तास सर्वांनीच हसत-खेळत एकत्र मिळून खेळावं, व्यायाम करावा.
औषधी चिकित्सेपेक्षा पथ्याअपथ्यालाच या रोगात अधिक महत्त्व आहे व मुलांना पथ्याअपथ्याचे पालन करायला लावणे तेवढेच कठीण.
औषधी चिकित्सेचा विचार करता रूक्ष, उष्ण द्रव्यांची बस्ती हितकर. मृदू अनुलोमनासाठी गोमुत्र अधिक उपयुक्त ठरतात.
औषधी द्रव्यांमध्ये शिलाजतु व कुभा ही लठ्ठपणातील अग्र द्रव्ये आहेत. त्यामुळे कुभजतुसारखे कल्पही उपयुक्त ठरतात.
गुग्गुळ हाही लेखन करणारा, रुक्ष, उष्ण, वातघ्न व कफमेदहर असल्याने लठ्ठपणात उपयुक्त ठरतो.
लठ्ठपणामध्ये सर्व धातूंच्या ठिकाणी शैथिल्य आलेले असते. दौर्बल्यही फार मोठ्या प्रमाणात आलेले असते. हे शौथिल्य दूर करण्यासाठी लोह भस्माचा उपयोग होतो.
 तसेच लठ्ठपणात घाम अतिप्रमाणात येतो, त्यामुळे शरीराला दौर्गंध अधिक येते. ते कमी करण्यासाठी रुक्ष द्रव्यांचे उद्वर्तन करणे हितकर ठरते. हरितकी, लोध्र, नागशेखर इ.चे सूक्ष्म चुर्णाचे उटणे लावावे.
मुलांमधील लठ्ठपणा ही सध्या झपाट्यानं वाढत असलेली जागतिक समस्या आहे. लठ्ठपणाचं प्रमाण अशाच तर्‍हेनं वाढत राहिलं तर लवकरच उच्च-रक्तदाब, मधुमेही रुग्णांच्या संख्येत जास्तीत जास्त भर पडेल. तेव्हा फक्त आपल्या मुलांचा विचार न करता समाजाचा विचार करून मुलाला सुदृढ बनवा.