ब्रेकिंग न्यूज़

वाढती लोकसंख्या देशाच्या विकासाला घातक

  • देवेश कु. कडकडे
    (डिचोली)

वाढत्या लोकसंख्येमुळे जीवनावश्यक गरजांवर प्रचंड भार पडतो. एका मोठ्या वर्गाला अनेक गरजा भागविण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. जगात ज्या राष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो तिथेच विकासाला गती देणे शक्य आहे. जिथे लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो तिथे विकासाची गती संथ होत असते.

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या काळात देशाला स्वावलंबी आणि विकसनशील बनविण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित झाल्या. त्यासाठी आर्थिक स्थिती सुधारण्याचाही प्रयत्न झाला, परंतु सर्व स्तरांतील मुरलेल्या भ्रष्टाचारामुळे देशात आर्थिक विषमतेने परिसीमा गाठली. त्यातच वाढत्या लोकसंख्येच्या समस्येने विकासाची प्रक्रिया किचकट बनवली. देशातील मोठा वर्ग गरीबीच्या चक्रव्यूहात अडकू लागल्याने देशासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या. गरीबी, अज्ञान, शिक्षणाच्या अभावाने देशातील बहुसंख्य जनतेला लोकसंख्या नियंत्रणाचे गांभीर्य लक्षात आलेच नाही. जरी आज आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले असले तरीही वाढत्या लोकसंख्येच्या समस्येचे आपण गुलाम बनलो आहोत. पंतप्रधान मोदींनी देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण राखण्यासाठी उपाययोजनांचे महत्त्व विशद केले आहे. मानवाचे जीवनमान आणि लोकसंख्यावाढ याचा घनिष्ट संबंध आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे जीवनावश्यक गरजांवर प्रचंड भार पडतो. एका मोठ्या वर्गाला अनेक गरजा भागविण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. जगात ज्या राष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो तिथेच विकासाला गती देणे शक्य आहे. जिथे लोकसंख्या वाढीचा दर जास्त असतो तिथे विकासाची गती संथ होत असते. भारत हे त्याचे उदाहरण आहे. वास्तविक या लोकसंख्येच्या भीषण वास्तवाची कुणकुण आपल्या देशात १९४७ सालापासून अनेकांना लागली होती. त्यांनी धोक्याची घंटा वाजवूनही नेत्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमाचे सर्वप्रथम प्रचार आणि कार्य करणार्‍या र. धो. कर्वेंना तर समाजाने वाळीतच टाकले होते. वाढत्या लोकसंख्येचा असाही अर्थ लावला जातो की, मनुष्याने मृत्यूला मागे ढकलले आहे. मात्र दुसर्‍या बाजूने विचार केला तर जगातील २०० कोटी लोकांना पर्याप्त भोजन मिळत नाही. २४० कोटी लोकांना शौचालयाची सुविधा नाही. जगातील एकूण लोकसंख्येच्या १८% लोक भारतात राहतात. मात्र आपल्या देशातील पाण्याचा साठा केवळ ४% आहे. लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर भविष्यात आपल्याला पिण्याचे शुद्ध पाणी नसेल तर चालण्यासाठी रस्ते नसतील. आपल्या देशात असल्या गोष्टीबद्दल कधी गांभीर्याने चर्चा होत नाही. लोकसंख्या भरमसाट वाढवणारा देश सदैव विकसनशील देशांच्या यादीत राहतात. भारतात ६५% लोकसंख्या युवा आहेत. त्या युवा शक्तीचा सदुपयोग करण्यासाठी आपल्याकडे परिपूर्ण सुविधांचा अभाव आहे. युवा पिढी ही देशाचे भवितव्य आहे असे म्हटले जाते, मात्र हीच वाढती लोकसंख्या भविष्यात देशावर ओझे ठरू शकते.

भारत हा विविध धर्म, परंपरा अस्तित्वात असलेला देश आहे. या देशावर अज्ञान, अंधश्रद्धा, रुढी यांचा इतका पगडा आहे की, त्या कधी कधी समाज आणि राष्ट्राला जाचक ठरतात. काही धर्मातील लोक लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी कुटुंब नियोजन या आपल्या राष्ट्रीय कर्तव्याला हरताळ फासतात. म्हणूनच आपला देश नैसर्गिक साधन समृद्धीने संपन्न असूनही लोकसंख्येच्या वाढत्या स्वरुपामुळे त्याची टंचाई जाणवू लागली आहे. भारतात लोकसंख्या वाढण्याची जी अनेक कारणे आहेत, त्यातील जन्मदरात वाढ आणि मृत्युदरात घट हे प्रमुख कारण आहे. लोकसंख्या वाढ आणि सोबत उपभोग साधनांची संख्या वाढू लागली. शिक्षण क्षेत्रातील बदलत्या स्वरुपाने नोकर्‍यांची गरज वाढू लागली. ती पुरी होऊ शकत नाही. त्यामुळे बेरोजगारांची संख्या भरमसाट वाढून या चंगळवादी समाजात पैसा कमाविण्यासाठी मुले गुन्हेगार प्रवृत्तीकडे वळतात. देशात तणाव आणि संघर्ष वाढून सर्वत्र असंतोष माजतो. एक अस्वस्थ आणि असंतुष्ट समाज निर्माण करण्याच्या मार्गावर आपण उभे आहोत. अशाने देशाच्या विकासाच्या मार्गावर सदैव पिछेहाट होते. आपल्या देशाचे चित्र हे भारतीय रेल्वेसारखे आहे. रेल्वेत सदैव जागेची कमतरता असते. प्रवाशांना बसायला जागा मिळत नाही. प्रवासी दरवाजावर लटकत असतात. रेल्वेतून पडून मृत्यू होणार्‍यांची संख्याही आता वाढू लागली आहे.

भारतात लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्याही कडक कायद्याची तरतूद नाही. चीन देशाने ‘एक कुटुंब एक मूल’ या कडक कायद्याने लोकसंख्येच्या वाढत्या उग्र स्वरुपाला आळा घालण्यात यश मिळविले आहे. सरकार आपल्या देशात जनतेला विविध योजनांखालील अनेक मुलभूत सुविधा देते. ज्यांना दोनपेक्षा अधिक अपत्ये आहेत, त्यांना अशा सुविधांपासून वंचित केले पाहिजे. बहुपत्नित्वाला बंदी घातली पाहिजे. बालविवाह करणार्‍या मातापित्यांवर कडक कारवाई केली पाहिजे. जन्म ही ईश्‍वराची देणगी आहे, अशीच भावना भारतीयांमध्ये पूर्वांपार आहे आणि मुलांना तर आपण देवाचा आशीर्वाद समजतो, मात्र या मुलांचे योग्य तर्‍हेने संगोपन झाले नाही तर हा अभिशाप ठरू शकतो. काही कुटुंबांत एक तरी मुलगा हवा किंवा मुलगी हवी अशी प्रबळ विचारधारा असते. तसेच मुलगा हा वंशाचा दिवा असतो, म्हातारपणाची काठी असते असाही दृढ समज असतो. तेव्हा सुरुवातीला तीन चार मुली झाल्या तरी पुत्रप्राप्तीसाठी पुढे अनेकदा संधी घेतली जाते. महानगरातील कुटुंबातील महिलांना दुसरे मूल नको असते. मात्र अनेकदा त्यांच्यावर कुटुंब वाढविण्याचा सतत दबाव असतो आणि त्याचा परिणाम महिलांनाच भोगावा लागलो. आपल्याकडे कुटुंबनियोजनांच्या साधनांबद्दल अनेक गैरसमज आणि अज्ञान आहे. अनेक अंधश्रद्धा जोपासणार्‍या आपल्या देशात लोकसंख्या शिक्षणाच्या प्रोत्साहनाची आणि प्रचाराची नित्यंत आवश्यकता आहे. लोकसंख्या वाढीमुळे मुलांच्या शिक्षणाची बाजू दुबळी होते. जर एखाद्या कुटुंबात जास्त मुले असतील तर एकाच मुलाच्या उच्च शिक्षणावर जास्त भर दिला जातो. अशा कुटुंबातील बहुसंख्य मुली मात्र शिक्षणापासून वंचित राहतात. त्यांच्यावर एक तर लहान भावंडांना सांभाळण्याचे दायित्व सोपवले जाते, नाही तर कुटुंबाच्या मिळकतीसाठी त्यांना रोजगारासाठी भटकावे लागते. आज जगात दरवर्षी ६ कोटी २० लाख मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. जास्त लोकसंख्या वाढल्याने बेकारी वाढून दारिद्य्र येते आणि दारिद्य्रामुळे परत लोकसंख्या वाढ अशा दुष्टचक्रात आपण अडकत राहतो. अशाने श्रीमंत अधिक श्रीमंत होतात तर गरीब लोक अधिक गरीब होतात. एकीकडे टोलेजंग इमारती आणि दुसरीकडे वाढत्या झोपडपट्‌ट्या हे चित्र अधिक भयानक आहे. लोकसंख्या वाढल्याने खेड्यांचे रुपांतर शहरात आणि शहरांचे रुपांतर महानगरात होते. त्यामुळे घरबांधणी, उद्योगधंदे, रस्ते, महामार्ग, लोहमार्ग, विमानतळ यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये जमिनींची आवश्यकता भासते. त्यासाठी झाडे, वनस्पती, डोंगर नष्ट करावे लागतात. त्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोचते. नुसती भराभर लोकसंख्या वाढून देशाचे हित साधत नाही. लोकसंख्या ही निरोगी, शिक्षित नसेल तर देश कधीही सामर्थ्यवान नसतो. असा देश कधीही विकासाच्या मार्गावर येऊ शकत नाही, कारण विकास हा व्यक्तीचा झाला तर मग कुटुंबाचा नंतर देशाचा विकास होतो. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे भारताने विकासाच्या जपलेल्या अनेक स्वप्नांची भविष्यात राखरांगोळी होईल.