ब्रेकिंग न्यूज़
‘वाचू तेही आनंदे’

‘वाचू तेही आनंदे’

१३ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून महाराष्ट्र राज्याने जाहीर केला आहे. माजी राष्ट्रपती वैज्ञानिक डॉ अब्दुल कलाम यांचा हा जन्म दिवस. एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा हा स्मृतिदिन आहे. त्यांनी स्वप्ने पाहिली भारताच्या युवकांसाठी. आजकाल मुले वाचत नाहीत ही तक्रार साधारण सर्वसामान्य पालक/शिक्षक करतात (त्यातील किती जण स्वत: काही वाचतात हे अलाहिदा). तरीही ही तक्रार मात्र खरीच आहे.
नव्या पिढीला अनेक आकर्षणांना सामोरे जात असताना वाचण्यासाठी लागणारा वेळ, जागा आणि पुस्तक हे सारे मिळत असूनही त्याचे महत्त्व वाटत नाही. याला कुठेतरी त्यांच्या पालकांची/ शिक्षकांची आणि घरातील आणि समाजातील ज्येष्ठांची सुद्धा पिढी जबाबदार नाही का ???
मुलांच्या वाचनासाठी एक वेगळा उपक्रम राबवीत आहे श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्था. त्यामागची पार्श्‍वभूमी आणि आता ही छोटी मुले वाचण्याचा घेत असलेला आनंद समाजापुढे यावा यासाठीचा हा लेख प्रपंच.
शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेचा रौप्य महोत्सवाच्या आखणीची बैठक २०१६ साल … विश्व हिंदू परिषद सभागृह आणि जमलेल्या समाजातील विविध स्तरावरील आणि सर्व वयोगटातील सख्या. काही पुष्कळ वर्षापासून असलेल्या जुन्या जाणत्या तर काही अलीकडच्या वर्षात आलेल्या पण स्वत:तील क्षमता ओळखणार्‍या आणि सिद्ध करणार्‍या. पण तरीही आली होती थोडीशी मरगळ, माधवीताई गेल्यानंतर झालेली चार वर्षे. यांना पुन्हा एकदा ऊर्जा देण्यासाठी आले होते प्रा.अनिल सामंत सर. आपल्या वक्तृत्वाने त्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांना विचार करायला लावला. संस्था, त्याचे वेगळेपण आणि समाजाभिमुख काम कां, कसे करावे याचा परिपाठ समोर आला. त्यानंतर काय वेगळेपण किंवा कोणते काम समाजासाठी व्हायला हवे यावर प्रत्येक सखी बोलली, पोटतिडकीने, पण दोन-तीन वाक्यात.. सच्चेपणाने. कुणी मुलांच्या हस्ताक्षरातील सुधारणा येणे.. हे काम महत्त्वाचे मानले, कुणी किचन गार्डन, कुणी महिलांसाठी फोटो स्पर्धा, कुणी महिलांचे-मुलांचे आरोग्य यावर कार्यशाळा घेऊ, एक तर विवाहपूर्व समुपदेशन करायला हवे.. म्हणाली. मग अशा वेगवेगळ्या विषयांवर २५ कार्यशाळा पूर्ण वर्षभर आयोजित केल्या आणि त्याचे आयोजन शारदाच्या इतर सख्यांबरोबर जिने सुचवले तिनेच केले.
यातच एक महत्त्वाचा विषय आला. मुलांचे वाचन कमी होते, त्यासाठी, त्याची गोडी लावण्यासाठी अगदी लहान वयात काहीतरी करावे. सुचवत होती आय.टी. शिक्षिका मेधा प्रभुदेसाई. अर्थात वाचनाचे महत्त्व सगळ्यांनाच असल्याने सगळ्यांनी या विचाराला आपल्या परीने पाठिंबा दिला. आणि महिन्याच्या तिसर्‍या मंगळवारी दोन गट करून हे एक वेगळे पण आवश्यक काम सुरू झाले. वाचन कमी होण्याची कारणे अनेक होती. दूरदर्शन, कॉम्प्युटर, इंटरनेट, सोशल मिडिया इ इ, पण त्यावर बोलण्यापेक्षा आणि विचार करण्यापेक्षा यावर उपाय म्हणून वाचन वाढावे, त्याची गोडी लागावी…. यासाठी आपण काम करू, असे ठरले.
मेधा यासाठी, ज्ञान प्रबोधिनीची पुण्यातील अशा प्रकारच्या निवासी कार्यशाळेत स्वत:हून सहभागी झाली आणि त्यातून तिला ‘नेमके काय करावे’ याचा मार्ग सापडला. आपले दोन छोटे बछडे घरी ठेवून तिने हे केले आणि तिच्या कुटुंबीयांनी यात तिला सहकार्य दिले, हे खूप विशेष आहे. संगीताच्या कार्य कुशल आणि नेटक्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा एक वेगळा प्रकल्प. बाकीचे सारे विषय एक-दोन दिवसात, एक-दोन सत्रात संपले. पण हे मात्र रौप्यमहोत्सवी वर्ष संपल्यावरही या दुसर्‍या वर्षात चालू आहे. आता हे सत्र प्रत्येक बुधवारी सायंकाळी ४.३० ते ६.०० पर्यंत होते. दहा वर्षाखालील आणि वरील असे दोन गट असतात. छोट्यांना शब्दकोडी, समानार्थी शब्द, वेगळ्या प्रकारची शब्दांची अंताक्षरी आणि अर्थात कवितेचे किंवा छोट्या गोष्टीचे वाचन असते. काही शब्दांचे यमक जुळवणे आणि त्याचे नादमाधुर्य समजून घेणे हे त्यांना आवडते. तर मोठ्या गटाला म्हणीतील काही शब्द उलटसुलट देऊन म्हणी शोधणे, वाक्‌प्रचार शोधणे, त्याचा अर्थ, त्यामागील एखादी गमतीची गोष्ट, कविता असे काहीतरी वेगळे घेतले जाते. दोन्ही गटातील सार्‍या सत्रात प्रत्येक मुलाचा सहभाग असेल आणि त्यांना त्यातील आनंद घेता येईल.. अशी काळजी घेतली जाते. त्याचबरोबर हे शब्द त्यामागच्या कथा, काही पुस्तके वाचण्याची ओढ या मुलांना लागावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. उच्चारामुळे होणारे एकाच शब्दाचे वेगळे अर्थ, हे समजून घेताना त्यातील मजा मुले अगदी समरसून ऐकतात, प्रश्‍न-शंका मोकळेपणाने विचारतात. प्रत्येक वर्गामध्ये शारदाच्या सख्या.. अगदी ठरवून, वाटून आणि मुख्य म्हणजे खूप विचार करून, प्रत्येक सखी त्यासाठी पूर्व तयारीनिशी आपले असे वेगळे काही शिकवते. यातील सगळ्याच शिक्षिका नाहीत. पण वाचनाचे महत्त्व कळलेल्या आणि ते पुढच्या पिढीपर्यंत पोचावे अशी मनापासून तळमळ असलेल्या अनेकजणी यात आहेत. यासाठीचे वेळापत्रक संगीताच्या सूत्रबद्ध नियोजनाने दोन महिन्यांपूर्वी तयार असते. तरीही एखादीची काही अडचण आली तर दुसरी कोणी तयार असतेच आणि हे सगळे एवढ्या सहजतेने आणि मनापासून केले जाते, (कोणत्याही आर्थिक फायद्याशिवाय) हे खूप महत्त्वाचे आणि कौतुकास्पद आहे. सुरुवातीला यासाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ञ श्री. कालिदास मराठे यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन केले. ‘वाचू आनंदे’च्या टीममध्ये २०१७-१८ ला अध्यक्ष पौर्णिमाताई, संगीता, मेधा, मुग्धा, मनीषा, प्रार्थना, प्रिया, साक्षी, मिता, सुषमाताई अशा होत्या तर आता म्हणजे २०१८-१९ मध्ये आता यात रेवा, सुषमा, विजूताई, दीपा, वैशाली, गिरीजा मुरगोडी यांची भर पडली आहे.
मेधा प्रभुदेसाई (प्रकल्प संयोजक, संगणक शिक्षिका)- माझी मुले लहान, म्हणजे तीन-चार वर्षाची असताना, मला माझ्या मुलांनी आवडीने वाचले पाहिजे, असे वाटत होते. इतर कोणत्याही क्लासपेक्षा त्यांना स्वत:हून वाचायची गोडी लागावी यासाठी काहीतरी करावे असे मनात होते. वाचनाचा क्लास कोणी घेईल का.. असे मनात येत होते. त्याच वेळी रौप्यमहोत्सवी वर्षासाठी हा उपक्रम सुचवला आणि माझ्या शारदाच्या सख्यांना विशेषत: सांगितला. त्यांना ही कल्पना खूपच आवडली. त्यासाठी मी पूर्वानुभव नसताना काय आणि कसे करीन हे कळत नव्हते. पण संगीताच्या आखीव रेखीव मार्गदर्शनाने माझी कल्पना सत्यात उतरली. त्यासाठी ज्ञानप्रबोधिनीचे कुमार साहित्य संमेलन अनुभवले. त्यातून मला माझ्या उपक्रमाची दिशा कळू लागली. माझ्या या कामात माझ्या घरच्या माणसांचे संपूर्ण सहकार्य होते. मोठा मुलगा बरोबर होता, पण चौथीतील छोटा आजी-आजोबांनी सांभाळला.
यानंतर गोव्यात परतल्यावर अनेक बैठका झाल्या. प्रा. अनिल सामंत सरांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले आणि आम्हाला मार्गदर्शन सुद्धा केले. शब्दांचा मनोरा, मजा म्हणींची, शब्द आठवू अशा अनेक खेळातून शब्द, अर्थ असे मुलांना आवडू लागले. मुले आणि पालक यांचा खूपच उत्साही प्रतिसाद आणि उपक्रम पुढे सुरू ठेवण्याचा आग्रह, त्याचबरोबर शारदाच्या सख्यांनी दिलेले सहकार्य यामुळे २०१८-१९ मध्ये दर बुधवारी हा उपक्रम सुरू ठेवला आहे. रौप्यमहोत्सवी वर्षातील विविध रंगी २४ प्रकल्प, उपक्रम तात्कालिक ठरले, तर माझा हा उपक्रम मात्र पुढे चालू राहिला तो सगळ्यांच्या सहकार्याने.
संगीता अभ्यंकर (कार्याध्यक्ष, श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्था)ः-
‘वाचू आनंदे’ या शारदा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील उपक्रमाच्या यशाची पावती म्हणजे नियमित स्वरूपात तो चालू करण्याची पालकांची आग्रही मागणी! डॉ. रेवा दुभाषी, डॉ. माधवीलता दीक्षित, रश्मी साधले यांसारखे सजग पालक आणि आनंदाने सहभागी झालेले गिरीजा मुरगोडी, सावनी शेट्ये, सुभाष जाण, विजया दीक्षित, मेधा प्रभुदेसाई, मुग्धा बोरकर, सुषमाताई तिळवे…असे मार्गदर्शक. यांच्यामुळेच वाचन संस्कृती रुजविण्याची ही धडपड फलदायी होत आहे. सर्व मार्गदर्शकांना एकच काळजी घेण्याची विनंती आपण केली आहे ती म्हणजे- मुलांना शाळेत आल्यासारखे वाटू नये आणि वेगवेगळ्या माध्यमातून हसत खेळत वाचनाची गोडी लागावी. नाटक, फिल्म्स, स्थलदर्शन… अशा अनेक अनुभवांनी मुलांचे मानसिक विश्व समृद्ध व्हावे, रसिकता वृद्धिंगत व्हावी हीच तळमळ आहे.
रश्मी साधले (एक पालक आणि आर्किटेक्ट) ः-
अभ्यासेतर वाचन आणि त्यामधील आनंद दोन्हीही मुलांना नावडते होत असतानाच शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेचा ‘वाचू आनंदे’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात पुस्तकाचे वाचन आहेच, पण खोल अर्थाच्या कविता, त्या समजायला कवयित्रींचा सहवास हे असे मौल्यवान दुर्मीळ क्षण या मुलांच्या वाट्याला येत आहेत. चित्रवाचन ही कल्पना शब्दसामर्थ्य वाढविण्यासाठी उपयोगी पडते. पुस्तकांच्या सीमा ओलांडून महत्त्वाच्या धार्मिक स्थळाची प्रत्यक्ष भेट हा ‘स्थळ वाचन’ प्रयोग नावीन्यपूर्ण वाटला. धार्मिक पुस्तके आणि स्थळ वाचन असा एक नेमका योग त्याने साधला. व्यक्तिचित्रण (ीहेीीं षळश्रा) दाखवल्याने त्यांची अधिक माहिती तर मिळालीच पण त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली जागा आपल्याजवळ आहे, याचा अभिमानही वाटला. चरित्र अनुभव द्यायचा प्रयत्न समर्पक होता. पुन्हा एकदा पुस्तकांच्या कक्षा विस्तारताना वाचनाचा आनंद नवनव्या प्रयत्नांनी वेचणारी आमची मुले खरच आनंदी होऊन घरी येतात. डॉ. दादा वैद्य यांच्या निवासस्थानी नुकत्याच झालेल्या भेटीत मुलांनी त्याच्यावरील ीहेीीं षळश्रा पाहिली आणि प्रा. सुभाष जाण यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना खूप छान समजून उत्तरे दिली.
लहान गटात पंधरा मुले आहेत तर मोठ्या गटात पाच मुले आहेत. सध्या ही संख्या कमी असेल पण हे बीज आहे वटवृक्षाचे. तो मोठा होणार आणि हे सत्त्व आणि तत्त्व आपल्या पारंब्यांपर्यंत पोचवणार यात मला तरी शंका नाही.