वागातोरातील ३० बेकायदा गाळे जमीनदोस्त
वागातोर येथील पर्यटन खात्याच्या जागेतील बेकायदा गाळे बुलडोझरच्या साहाय्याने पाडण्यात येत असताना. (छाया : प्रणव फोटो)

वागातोरातील ३० बेकायदा गाळे जमीनदोस्त

पर्यटन खात्याची पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई
बार्देश तालुक्यातील वागातोर वाहनतळावरील पर्यटन खात्याच्या जागेतील ३० पेक्षा अधिक बेकायदा गाळे पर्यटन खात्याने काल सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्तात बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. या धडक कारवाईवेळी विरोध करणार्‍या पुरुष व महिला मिळून एकूण बारा जणांनी पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली.या भागात कायसूव, शापोरा – वागातोर येथील नागरिक गाळे उभारून व्यवसाय करीत होते. गाळ्यांच्या माध्यमातून मिळणार्‍या उत्पन्नावर ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत असत. मात्र, सर्वच्या सर्व गाळे पाडण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबांवर संकट कोसळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पर्यटन खात्याचे व्यवस्थापक संजय चोपडेकर, बार्देशच्या अतिरिक्त पदभार सांभाळणार्‍या मामलेदार निशा सावंत, साहाय्यक मामलेदार मंदार नाईक, पोलीस फौजफाट्यासहित घटनास्थळी दाखल झाले. सदर गाळे हटविण्यासाठी पर्यटन खात्याचे अधिकारी घटनास्थळी बुलडोझरसहीत हजर झाल्याची माहिती समजताच येथील नागरिक गोळा झाले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. विरोध करणार्‍यांना मामलेदार निशा सावंत यांनी अटक करण्याचा आदेश दिल्यानंतर पोलिसांना पुरुष व महिला मिळून बारा जणांना अटक करून हणजूण पोलीस स्थानकात नेले.
हे गाळे पाडण्यासाठी कोणताही आदेश नसताना पर्यटन खात्याने जबरदस्तीने गाळे बुलडोझरच्या साहाय्याने पाडल्याचा आरोप करून या प्रकरणी आम्ही कोर्टात दाद मागणार असल्याचे गाळे धारकांनी म्हटले आहे. आपणाला आदेश आल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपण उपस्थित असल्याचे मामलेदार सावंत यांनी सांगितले. तसेच गाळे उभारण्यात आलेली जागा पर्यटन खात्याची असल्याने पर्यटन खात्याने गाळे हटविण्याचे ठरविल्याचे संजय चोडणकर यांनी सांगितले.