ब्रेकिंग न्यूज़
वनौषधी गुणधर्म

वनौषधी गुणधर्म

काकडी
काकडीची वेल असते. काकडी, तवसे, वळूक इ. फळे एका जातीची आहेत. त्यात थोडा फेरफार असतो. सर्वांत काकडी चांगली असते. काकडीत साची, सातपानी, तवसे, नारंगी अशा जाती आहेत. काकडीची भाजी, कोशिंबिर, सांडगे करतात. काकड्या सोलून, उभ्या चिरून त्यात मिरपूड व मीठ घालून काही वेळा चोळून त्यातील पाणी वाहून जाते ते गेल्यावर खाल्ल्यास चांगली लागते. काकडी थंड आहे. फार खाल्ली तर बाधते. भिजवून मळलेल्या गव्हाच्या पिठात काकडीचे पाणी पडले असता त्या पीठातील चिकटोणा नाहीसा होतो. हा मोठा चमत्कार आहे.
काकडी ः- मधुर, शीत रुचीकर, मूत्रल, सालीच्या ठायी तिखट, कडू, पाचक, अग्निदीप व ग्राहिणी असून मूत्ररोध, अश्मरी, मुत्रकृच्छ, दाह, श्रम याचा नाश करते. ही पिकली असता रक्तदोषकर, उष्ण व बलकर आहे.
१) मूत्राधातावर काकडीचे बी – १ तोळा पावशेर पाण्यात टाकून द्यावे.
२) मद्यावर उतारा – काकडी खावी म्हणजे मद्याचा मद उतरतो,
३) गलगंडावर जुन्या काकडीच्या रसात बिडलीण व सैंधव घालून नस्य करावे.
४) गुडघी व मांड झाल्यास त्यावर काकडी ठेचून गरम करून बांधावी किंवा काकडीची जाड साल बांधावी व वरून कपड्याचे वेष्टन द्यावे. त्याप्रमाणे २-३ दिवस करावे. ५) पांढर्‍या धुपणीवर काकडीच्या बियातील मगज एक तोळा व पांढर्‍या कमळाच्या पाकळ्या एक तोळा बारीक वाटून त्यात जिरे व खडीसाखर पूड टाकून ते सात दिवस द्यावे. ६) मूतखड्यावर काकडीची बी व पारव्याची विष्ठा ही तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी.
७) उन्हाळ्यात काकडी चिरून त्यात खडीसाखरेची पूड व लिंबाचा रस घालून ती खावी. ८) मूत्रकृच्छावर काकडीच्या बिया सोलून त्यातील मगज ज्येष्ठमध व दारूहळद याचे चूर्ण करून ते तांदळाच्या धुवणात द्यावे. काकडीची बी गुलाबकळी न पांढर्‍या कमळाच्या पाकळ्या एकत्र वाटून वस्त्रगाळ करून घ्यावे व त्यात साखर घालून पिण्यास द्यावे.
काकडशिंगी (कर्कटशुंगी) ः
काकडशिंगीचे वृक्ष हिमालय पर्वतावर असतात. या वृक्षाच्या डहाळ्यांस कीटकाच्या कृमीने उत्पन्न झालेला रस जमून त्याची कलाकृती ग्रंथी होते. तिला ‘काकडशिंगी’ असे म्हणतात.
काकडशिंगी ः ही कडू, उष्ण, तुरट, जड आहे व वायू, उचकी, अग्निस्तर यांचा नाश करणारी, बालकास हितकर, दमा-खोकला, रक्तदोष, पित्तज्वर, कफ, क्षय, कृमी, तृष्णा यांचा नाश करते.
१) शृग्यादी चूर्ण – बालकाचा खोकला, ज्वर, वांती यावर काकडशिंगी, नागरमोथा, अतिविष याचे चूर्ण मधाबरोबर द्यावे.
२) बालकाचा खोकला – काकडशिंगी व मुळ्याचे बीज चूर्ण तूप व मधासोबत द्यावे. ३) अतिसार – काकडशिंगीचे चूर्ण मासा-दीड मासा मधातून द्यावे.