ब्रेकिंग न्यूज़

वंध्यत्वावरचे अत्याधुनिक उपचार

डॉ. मनाली महेश पवार
(गणेशपुरी म्हापसा-गोवा)

‘एआरटी’ म्हणजेच ‘असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी’. या उपचार पद्धतीमध्ये स्त्रीबीज किंवा पुरुष बीज किंवा दोघांचाही प्रयोगशाळेत वापर करून गर्भधारणा केली जाते. ज्या जोडप्यांमध्ये स्वतःहून गर्भधारणा होण्याची शक्यता अगदी अति अल्प असते अशा रुग्णांमध्ये ‘एआरटी’मुळे वय शक्यता ३०-३५ टक्क्यांपर्यंत वाढते. बर्‍याच जणांना या पद्धतीद्वारे गर्भधारणेच्या सक्सेस रेटबद्दल शंका असते. या उपचार पद्धतीमध्ये ‘आययूआय’, एआयएच’, ‘एआयडी’ या उपचारपद्धती फारशा खर्चाच्या नसल्या तरी ‘आयव्हीएफ’ आणि ‘आयसीएसआय’ मात्र खर्चाच्या आहेत.

वंध्यत्वावरील उपचार पद्धतीमध्ये विविध उपचारांचा अंतर्भाव होतो. केवळ समुपदेशन, गोळ्यांची ट्रीटमेंट, ऑपरेशनपासून ‘एआरटी’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत विविध गोष्टींचा यात समावेश होतो. येथे आपण केवळ (अ.ठ.ढ.) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाच विचार करणार आहोत. ‘एआरटी’ म्हणजेच ‘असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी’. या उपचार पद्धतीमध्ये स्त्रीबीज किंवा पुरुष बीज किंवा दोघांचाही प्रयोगशाळेत वापर करून गर्भधारणा केली जाते. ज्या जोडप्यांमध्ये स्वतःहून गर्भधारणा होण्याची शक्यता अगदी अति अल्प असते अशा रुग्णांमध्ये ‘एआरटी’मुळे वय शक्यता ३०-३५ टक्क्यांपर्यंत वाढते. बर्‍याच जणांना या पद्धतीद्वारे गर्भधारणेच्या सक्सेस रेटबद्दल शंका असते. या उपचार पद्धतीमध्ये ‘आययूआय’, एआयएच’, ‘एआयडी’ या उपचारपद्धती फारशा खर्चाच्या नसल्या तरी ‘आयव्हीएफ’ आणि ‘आयसीएसआय’ मात्र खर्चाच्या आहेत. त्यामुळे सक्सेस रेट तीन प्रकारे ठरविला जातो. १) गर्भ बनण्याची शक्यता ही ८०-८५ टक्के असते. २) गर्भधारणेची शक्यता ही ३०-३५ टक्के असते. ३) बाळाचा जन्म निर्वेधपणे होण्याची शक्यता ही २० टक्के असते.
समागमाशिवाय इतर पद्धतींनी वीर्य जमा करणे आणि ते योनिमार्गात वरच्या म्हणजे गर्भाशय ग्रीवेभोवतालच्या भागात किंवा गर्भाशय ग्रीवेतून गर्भाशयात सोडणे अशी पद्धत म्हणजेच कृत्रिम गर्भधारणा होय.

पतीच्या वीर्याने कृत्रिम गर्भधारणा –
जेव्हा पुरुषातील शारीरिक वैगुण्यामुळे, शिश्‍नोत्थान असमर्थतेमुळे किंवा इतर कारणांनी सरळ साधा समागम अशक्य असतो, त्यावेळी वीर्य बाहेर जमा करून ते योनिमार्गात सोडले जाते. शिश्‍नोत्थान असमर्थतेच्या मानसिक स्वरूपामुळे काही व्यक्तींचे शिश्‍नोत्थान नैसर्गिक समागमाच्या वेळी होत नसले तरी ते हस्तमैथुनाच्या वेळी किंवा स्वप्नावस्थेत होऊ शकते. अशा प्रकारे त्या व्यक्ती वीर्य उपलब्ध करून देऊ शकत असल्यास, बहुधा त्यांचे शुक्राणू उत्पादन नैसर्गिक पातळीपर्यंत आल्याने ते कृत्रिमरीत्या गर्भाशयात सोडणे होते. गर्भाशय ग्रीवेच्या रोगांमुळे किंवा दोषांमुळे शुक्राणू गर्भाशय ग्रीवेत प्रवेश करू शकत नसल्यास किंवा समागमोत्तर तपासणीवरून आवश्यक वाटल्यास किंवा वंध्यत्वाचे इतर कोणतेही कारण सापडलेले नसल्यास वीर्य कृत्रिम पद्धतीने थोड्या प्रमाणात गर्भाशय ग्रीवेत सोडले जाते. वीर्य गोठवून टिकवून ठेवणे आणि नंतर गरजेनुसार कृत्रिम पद्धतीने गर्भधारणेसाठी वापरणेही आता शक्य झाले आहे.

दात्याकडून घेतलेले वीर्य कृत्रिमरीत्या गर्भाशयात सोडणे –
जेव्हा स्त्री पूर्णपणे जननक्षम असून, पती वंध्य, वीर्यात शुक्राणूंचा पूर्ण अभाव असलेला असेल किंवा इतर काही विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीत अज्ञात दात्याचे चांगल्या प्रतीचे वीर्य कृत्रिम रेचनासाठी वापरले जाते. दोन्ही बीजवाहिन्या व्रण किंवा इतर अडथळ्यांमुळे बंद असलेल्या स्त्रियांसाठी वीजवाहिन्यांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नव्हता. आता पुढे फुगा जोडलेली बारीक अरुंद नलिका वीजवाहिनीस सरकावून आणि पुढील फुगा फुगवून बीजवाहिनी मोकळी करता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याशिवाय कृत्रिम गर्भधारणेचे ‘आययूआय’ आयव्हीएयू यासारखे सफलतेची हमी नसलेले आणि बरेच खर्चीक असलेले अनेक उपाय उपलब्ध आहेत. त्याशिवाय पुरुष जननक्षम आहे आणि स्त्रीमधील विकार टोकाचे आहेत, अशा वेळी एखाद्या तिसर्‍या महिलेचे गर्भाशय भाड्याने घेऊन या पती-पत्नीच्या शुक्राणू बीजांपासून तयार झालेला गर्भ त्या तिसर्‍या महिलेच्या गर्भाशयात वाढविण्याचे म्हणजेच ‘सरोगेट मदरहूड’ उपायही आता उपलब्ध आहे; परंतु हा उपायही अत्यंत खर्चीक आहे.

कृत्रिम गर्भधारणेमध्ये पुढील विविध तंत्रांचा अंतर्भाव होतो.
१) ‘एआयएच’ आर्टिफिशियल इनसेमिनेशन हजबंड –
येथे पुरुषाचे वीर्य योनिमार्गामध्ये कृत्रिमरीत्या सोडले जाते. जेव्हा जोडप्यामध्ये प्रत्यक्ष शारीरिक संबंध शक्य नसतात तेव्हा या उपचाराचा वापर केला जातो.
२) ‘एआयडी’ आर्टिफिशियल इनसेमिनेशन डोनर
जेव्हा पुरुषाच्या वीर्यामध्ये शुक्राणूंचे प्रमाण अजिबात नसते तेव्हा या पद्धतीचा वापर केला जातो. येथे एखाद्या दात्याचे वीर्य वापरून गर्भधारणा केली जाते. प्रथम दात्याची पूर्ण शारीरिक तपासणी व विविध रक्तचाचण्या केल्या जातात. ‘एचआयव्ही’ची तपासणी अनिवार्य आहे. ‘एचआयव्हीच्या’ धोक्यामुळे अतिशीत अवस्थेतील गोठविलेले वीर्यच वापरावे लागते. त्यामुळे याच्या यशस्वितेचे प्रमाण ३०-३१ टक्के एवढेच असते.
३) ‘आययूआय’ – इन्ट्रायुटेराईन इनसेमिनेशन
याचा वापर मुख्यत्वे करून वंध्यत्वाचे कारण नेमके कळत नसेल तेव्हा होतो. प्रथम काही गोळ्या अथवा इंजेक्शन देऊन एकापेक्षा अधिक म्हणजेच दोन-तीन स्त्रीबीजे वाढविली जातात. स्त्रीबीजे फुटण्याच्या सुमारास ‘सीमेन वॉथ’ या पद्धतीने वीर्यामधील सर्वात चांगले शुक्रजंतू बाजूला काढले जातात. हे शुक्रजंतू नलिकेच्या साह्याने गर्भाशयात सोडले जातात. गर्भधारणेच्या सर्वसाधारण नैसर्गिक प्रक्रियेपेक्षा या पद्धतीमध्ये काही घटक गर्भधारणेला अधिक अनुकूल असतात. यामध्ये
– एकापेक्षा जास्त स्त्रीबीजे उपलब्ध असतात.
– सर्वांत चांगले शुक्रजंतू वापरले जातात.
– हे शुक्रजंतू स्त्रीबीजांच्या जवळ सोडले जातात.
– स्त्री बीज फुटण्याच्या सुमारास हे केले जाते. त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.
४) ‘आयव्हीएफ’ – इनव्हिट्रो फर्टिलायझेशन
हा ‘टेस्ट ट्यूब बेबी’चाच एक प्रकार आहे. जेव्हा स्त्रीच्या गर्भनलिकेत दोष असतो तेव्हा याचा वापर केला जातो. यात
– काही इंजेक्शन्स देऊन १०-१२ स्त्रीबीजे वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.
– ही स्त्रीबीजे शरीराबाहेर काढली जातात. सोनोग्राफीच्या साह्याने केले जाते. या क्रियेस पाच-दहा मिनिटे लागतात.
– इस्पितळामध्ये दोन-तीन तास थांबावे लागते.
– वीर्यातून चांगले शुक्रजंतू बाजूस केले जातात.
– हे शुक्रजंतू व स्त्रीवीजे इन्क्युबेटरमध्ये एकमेकांजवळ ठेवली जातात. शुक्रजंतूंद्वारे स्त्रीवीजाचे फलन घडते.
– ही फलित स्त्रीबीजे तिसर्‍या दिवशी गर्भाशयात सोडली जातात.
या उपचार पद्धतीच्या यशस्वितेचे प्रमाण ३०-३५ टक्के असते. स्त्रीचे वय हे या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा घटक आहे.
५) ‘आयसीएसआय’- इन्ट्रा सिस्टोप्लाझ्मिक स्पर्म इन्जेक्शन
ही सर्वात नवीन उपचारपद्धती आहे. जेव्हा वीर्यामध्ये दोष असतो, तेव्हा आयसीएसआय केले जाते. स्त्रीबीजालासुद्धा अंड्याप्रमाणे कवच असते व हे कवच फोडून स्त्रीबीजाला आत जावे लागते तेव्हाच फलन होते. जेव्हा शुक्रजंतूचे प्रमाण कमी असते व हालचाल मंद असते, तेव्हा ही क्रिया घडू शकत नाही. म्हणूनच या पद्धतीमध्ये ‘आयव्हीएफ’ प्रमाणेच स्त्रीबीज वाढवून शरीराबाहेर काढली जातात. पुढे मात्र स्त्रीबीजावरील कवच फोडून एकेक शुक्रजंतू आत सरकवून त्यांचे फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेेले गर्भ नंतर गर्भाशयात ठेवले जातात.
६) स्त्रीबीज दान
याचा वापर अकाली पाळी बंद झाल्यास किंवा नैसर्गिकरीत्या पाळी बंद झालेल्या स्त्रियांमध्ये करता येतो. या प्रक्रियेत दात्या स्त्रीबीजे व नवर्‍याचेच शुक्राणू वापरून गर्भ बनविला जातो व जिच्यावर उपचार सुरू आहेत, अशा स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो. होणारे अपत्य हे त्या जोडप्यातील नवर्‍याचेच असते.
७) सरोगेट मदर
काही कारणाने (मुख्यत्वे क्षयरोग) गर्भाशय खराब झाले असेल किंवा काढून टाकलेले असेल तर हा उपचार केला जातो. यामध्ये ‘आयव्हीएफ’ प्रक्रियेने गर्भ तयार केला जातो. हा गर्भ मात्र दुसर्‍या स्त्रीच्या गर्भाशयात सोडला जातो. दुसर्‍या स्त्रीच्या गर्भाशयात हे गर्भ वाढतात व जन्मानंतर परत जोडप्याकडे दिले जाते. मूल संपूर्णपणे त्या जोडप्याचेच (जैविकदृष्ट्या) असते.
सर्व प्रकारात गर्भधारणेची यशस्विता ही ३०-३५ टक्के असते. तरीही महत्त्वाचा असतो तो योग्य आहार-विहार व आपली जीवनशैली.