ब्रेकिंग न्यूज़

वंध्यत्वाची शारीरिक कारणे…

  •  डॉ. मनाली म. पवार(गणेशपुरी-म्हापसा)

… तो बलवान असतो. त्याचे बल हस्त, पाद व खांदे यातून व्यक्त होतात.
ही शुक्रसारतेची लक्षणे लक्षात घेतल्यानंतर वैद्याने सूक्ष्म निरीक्षण केल्यास शुक्राधिक्य आहे की शुक्राक्षीणता हे पाहताक्षणी लक्षात येईल.

 

परिपूर्ण वीर्य असलेली पती-पत्नी समुचित धातू आणि योग्य ऋतुकालात समागम या गोष्टी असल्यास दांपत्यजीवनात अपत्यनिर्मिती होणे ही सहज गोष्ट आहे. पण वर्ष-दीड वर्षाचा काळ गेल्यावर अपत्यनिर्मिती होऊ न शकल्यास गर्भधारणा होण्यामध्ये काहीतरी प्रत्यवाय – अडथळा आहे हे जाणावे.

वंध्यत्वाचे दोन प्रकार गणले जातात. पहिल्या गटामध्ये ज्यांना कधीच गर्भधारणा झालेली नाही. या गटाला ‘प्रायमरी इन्फर्टिलिटी’ म्हणतात. या गटातील जोडप्यांच्या वंध्यत्वाची कारणे अगदी साधीही असू शकतात. अगदी प्राथमिक तपासण्यांतूनही यांच्या वंध्यत्वाची कारणे ओळखता येऊ शकतात आणि त्यावर उपचार केले जाऊ शकतात. मात्र दुसर्‍या गटातील जोडप्यांवर म्हणजे ज्यांना पूर्वी गर्भधारणा झाली होती. परंतु त्यानंतर प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही. अशा जोडप्यांच्या तपासण्या आणि त्यावरील उपचारही काही वेळा किचकट, अधिक काळ चालणारे असे असू शकतात. वंध्यत्वाच्या या दुसर्‍या प्रकाराला ‘सेकंडरी इन्फर्टिलिटी’ असे म्हणतात.. हे पूर्वी आपण पाहिलेय.

वंध्यत्व म्हटले की पुरुषप्रधान समाजरचनेमुळे पुरुषांमधील वंध्यत्वावर आपल्याकडे फारसे बोलले जात नाही. एखाद्या जोडप्याला मूल होत नसले की तपासण्या-उपचारांचा पहिला रोख स्त्रीच्या दिशेनेच असतो. असे असणे योग्य नाही. म्हणून आपण येथे पुरुषांमधील वंध्यत्वाचाच आधी विचार करू.

पुरुषांतील वंध्यत्व –
पुरुषांमध्ये वंध्यत्व आणि नपुंसकत्व या अगदी टोकाच्या दोन गोष्टी आहेत. नपुंसकत्व (इम्पोटन्सी) म्हणजे पुरुषाला समाधानकारक शरीरसंबंध करता येण्याइतपत शिश्‍नाची ताठरता न येणे किंवा वीर्यस्खलनापूर्वीच लिंग शिथिल पडणे या नपुंसकतेचा आणि पुरुषाच्या जननक्षमतेचा किंवा फर्टिलिटीचा संबंध नाही. पूर्णपणे नपुंसक पुरुष अवंध्य असू शकतो आणि अशा माणसाचे शुक्राणू मिळवून त्यापासून कृत्रिम रितीने त्याच्या पत्नीस किंवा इतर कुणाही स्त्रीस गर्भधारणा होऊ शकते. याउलट शरीरसंबंध ठेवण्यास अगदी पात्र असलेला म्हणजे नपुंसक नसलेला पुरुष वंध्य असू शकतो.
प्राकृत शुक्र व शुक्रसारता
संदुष्ट शुक्र असेल तर म्हणजे बीज जर दुष्ट असेल तर ते ज्याप्रमाणे उगवत नाही त्याप्रमाणे शुक्र जर दुष्ट असेल तर अपत्यनिर्मिती होत नाही.
रुग्णाची चिकित्सा करताना प्राकृत शुक्र व शुक्रसारतेची लक्षणे माहिती असणे खूपच गरजेचे आहे.
स्फटिकांभ द्रवं स्निग्धं मधुरं मधुगंधि च |
शुक्रम् इच्छन्ति केचितु तैलक्षौद्र निभं तथा |
शुक्र हे स्निग्ध, घन, पिच्छिल, गुरू, स्फटीकवत् शुभ्र, आमगंध नसलेल्या तेल-तूप-मध सदृश, मधुर रस हे प्राकृत समजावे, असे आयुर्वेद शास्त्रात वर्णन मिळते.
दुष्टीचा विचार लक्षात घेऊन प्राकृत शुक्रलक्षणे माहिती असणे आवश्यक आहे. तसेच रुग्ण पाहताक्षणी रुग्णाच्या ठिकाणी शुक्रक्षीणता आहे किंवा नाही, असल्यास ती कोणत्या प्रकारची असावी दर्शन परीक्षेवरून शुक्रधातूचा अंदाज करता येतो.

शुक्रसार मनुष्याची लक्षणे –
डोळे सौम्य, आतील दुष्टी मंडलादी व श्‍वेतमंडलादी पटले श्‍वेत, स्वच्छ, सम, सुविभक्त असतात.
– त्याचे बघणे आनंददायी असते. डोळे मोठे, पापण्या दाट व डोळे पाणीदार असतात.
– हसताना दिसणारे त्याचे शुक्र स्निग्ध, सम, एकसारखे दात लक्ष वेधून घेतात.
– त्वचा स्निग्ध असते. शरीरसंपदा चांगली असते.
– तो बलवान असतो. त्याचे बल हस्त, पाद व खांदे यातून व्यक्त होतात.
ही शुक्रसारतेची लक्षणे लक्षात घेतल्यानंतर वैद्याने सूक्ष्म निरीक्षण केल्यास शुक्राधिक्य आहे की शुक्राक्षीणता हे पाहताक्षणी लक्षात येईल.
शुक्रदोषाची कारणे –
– अतिव्यवायात् ः अतिव्यवायामुळे शुक्र क्षीण होते. अतिव्यवायामुळे वातवृद्धी होते. शुक्राच्या स्निग्ध व बहलत्व या गुणांचा र्‍हास होतो. अतिव्यवाय हे कारण असल्यास सारभूत अशा शुक्राचा सतत स्राव होऊन ते गुणतः व कर्मतः हीनवीर्य होते. अतिव्यवाय म्हणजे चोवीस तासांतून एकदा रात्री पत्नीबरोबर किंवा दोन दिवस मध्ये टाकून एकदा हे समागमाचे प्रमाण योग्य आहे. हे प्रमाण न पाळल्यास, त्याचप्रमाणे केवळ पत्नीबरोबर न करता पत्नी व परस्त्रिया अशा प्रकारे दिवसातून दोन-तीन वेळा समागम केल्यास तो अतिव्यवाय होतो. अशा मनुष्याला अतिस्राव झाल्यामुळे ‘शुक्रक्षयजन्य’ असा दोष संभवतो. शुक्रक्षीणतेमुळे सार्वदेहीक आरोग्य बिघडते. मनुष्य दुर्बल होतो.
– व्यायामात् – ‘अतिव्यायामातः कासो’ या नियमानुसार अतिव्यायाम केल्यास व पौष्टीक अन्न न खाल्ल्यास वातवृद्धी होऊन शुक्रदोष निर्माण होतात. अतिकष्ट करणार्‍या व पोटभर न जेवणार्‍या माणसांमध्ये बर्‍याच वेळा हा दोष निर्माण होतो. अतिव्यायामाप्रमाणेच स्वप्नावस्था असल्यास, स्वप्नात स्त्रीचा विचार किंवा दर्शन घडल्यास झोपेत शुक्रस्राव होऊन जातो. कित्येक मुलांना अश्‍लिल चित्रपट पाहण्याची सवय लागते. अशा कारणांमुळे मानसिक संभोग केल्याने शुक्रस्राव होऊन जातो. असे रोज घडल्यास शुक्राणूंची संख्या कमी होते. पातळपणा आल्याने शुक्रस्खलन होते.

– अव्यायामात् ः अव्यायामामुळे मेदधातू वाढतो, स्रोतोरोध निर्माण होतो, मैथुनेच्छा कमी होते व शुक्रदोष उत्पन्न होतो.
– असात्म्यानांच सेवनम् ः असात्म्य पदार्थाचे सेवन करणे, अतिरुक्ष, अतितीक्ष्ण, अतितिखट, अतिआंबट, अतिमसालेदार खाण्याची सवय असल्यास पित्त बिघडते, रक्तच बिघडते, शुक्राची उत्पत्ती कमी होते आणि शुक्रक्षय होतो.
– अकाले म्हणजे अत्यंत लहान वयात म्हणजे पंधरा-सोळा वर्षाच्या वयात समागम केल्यास दिवसातून पाच-सहा वेळा केल्यास किंवा वयाच्या सत्तर वर्षेंनंतर केल्यास लहान मुलाने वयाने मोठ्या असणार्‍या स्त्रीशी समागम केल्यास तो अकाली समागम होऊन शुक्रदोष संभवतात.

– अयोनौ ः योनिभागी समागम न करता यासाठी मुख, गुद किंवा प्राण्यांचा वापर केल्यास शुक्रधातू दुष्ट होतो आणि क्षीण होतो. हस्तमैथुनाचाही यात समावेश आहे.
– मैथुनं न च गच्छतः – मैथुनाची इच्छा होऊन बलवान मनुष्य आहे व कामवासनेने मन क्षुब्ध झालेले आहे. असे असताना वासनेचा रोध केला असता शुक्रस्तंभज अशा प्रकारचा शुक्रदोष निर्माण होतो.
– नारीणां अरसज्ञानां – साथ देणारी स्त्री नसल्यास किंवा एखाद्या स्त्रीविषयी अत्यंत द्वेष वाटत असल्यास तिच्याशी संबंध घडवून आणल्यास क्लैष्य उत्पन्न होते.
– चिंता, भीति, शोक आणि व्यभिचार केल्यास शुक्रदोष संभवतो.
– मेद्रजन्य मोठा रोग झाल्यास गळू, अंतर्विद्रधी असेल तर शुक्रदोष निर्माण होतात.
– वीर्यवाही सिराच्छेद – काही कारणांमुळे वृषणाकडून मेद्राकडे येणार्‍या मार्गामध्ये मार लागल्यास, जखम झाल्यास वीर्यवाही सिरांचा छेद होतो. त्यामुळे मेद्रोन्नती न झाल्याने क्लीबत्व येते आणि शुक्रामध्ये दोष संभवतो.

– तापमान – वृषणाचे तापमान काही शारीरिक अवस्थांमध्ये वाढते, असे व्हेरिकोसिल, हायड्रोसिल आणि फायलेरियासिस, उष्ण वातावरणात नेहमी राहण्याने आणि घट्ट अंतर्वस्त्रे वापरण्यानेसुद्धा वृषणाचे तापमान वाढते. तापमान वाढले की शुक्राणुविकास नीट होऊ शकत नाही.
– वेगविधारण केल्याने शुक्र मार्गातच ग्रथित होऊन राहते.
– सेवनी, मेद्र, वृषण, शुक्रवाहिन्या, शुक्रग्रंथी, वंक्षण या ठिकाणी मर्म असल्याने छेद झाल्यास शुक्रदोष निर्माण होतात.
कारणांचा विचार करता प्रथम दोष दुष्ट होतात. दुष्ट झालेले दोष रेतोवह सिरांच्या ठिकाणी गेल्यास व्यवायजन्य बहिःप्रवृत्त शुक्रास दुष्ट करतात. त्यामुळे अपत्यनिर्मितीस अडथळा निर्माण होतो व अनपत्यता संभवते.