ल्युकेमिया (ब्लड कॅन्सर)

– डॉ. मनाली म. पवार
(गणेशपुरी-म्हापसा)

रुग्णाच्या शारीरिक तपासणी दरम्यान लिम्फ नोड्‌समध्ये सूज आढळल्यास व इतर लक्षणांवरून या रोगात रक्ताची तपासणी महत्त्वाची ठरते. रक्त परिक्षणात रक्तातील पांढर्‍या पेशी प्रचंड वाढलेल्या असतात.

वर्षानुवर्षे आपण अनेक चित्रपटातील पात्रांना होणारा कॅन्सर हा ‘ब्लड कॅन्सर’ झालेलाच पाहिला आहे. आत्ता-आत्तापर्यंत कॅन्सर म्हणजे ‘रक्ताचा कॅन्सर’ हेच समीकरण सर्वांना ज्ञात होते. फक्त हल्ली काही वर्षांत कॅन्सरचे रुग्ण एवढे वाढलेत की कॅन्सर हा शरीरातील इतर अवयवांनासुद्धा होतो याचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहचले आहे. एवढ्याशा मुलाला ‘ल्युकेमिया’ झाला असे बर्‍याचवेळा आपल्या ऐकण्यात येते. हा ‘ल्युकेमिया’ म्हणजेच ‘रक्ताचा कॅन्सर’ किंवा ‘ब्लड कॅन्सर’ होय. ल्युकेमिया होण्याचे प्रमाण बालकांमध्ये किंवा तरुण वयात वृद्धांपेक्षा जास्त असते. तसेच महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतो.
ल्युकेमिया म्हणजे काय? –
रक्तातील पेशींची सतत झीज होत असते व या झीज झालेल्या किंवा मृत झालेल्या पेशींच्या जागी आपल्या हाडामध्ये असलेली पोकळी म्हणजेच ‘बोन मॅरो’ नवीन पेशी तयार करत असतो. असे हे चक्र सतत चालूच असते. पण या रोगात रक्तातील पांढर्‍या पेशी दूषित होतात. या दूषित झालेल्या पांढर्‍या पेशी मृत पावत नाही व त्या तशाच रक्तात साठत जातात. परिणामी या दूषित पांढर्‍या पेशींची संख्या रक्तात वाढते व जागाही व्यापली जाते, त्यामुळे प्राकृत रक्ताच्या कार्यात बाधा येते व चांगल्या पांढर्‍या पेशी तयार होण्याचे हळुहळू बंद होते. यालाच ल्युकेमिया किंवा ब्लड कॅन्सर असे म्हणतात.
कारणे –
हा रोग अनुवंशिक आहे का?
– इतर कॅन्सरप्रमाणेच या कॅन्सरचीही नेमकी अशी कारणे सांगता येत नाहीत. मात्र कोणत्याही कोशांचे सतत क्षोभ होत राहणे हे त्याचे महत्त्वाचे कारण मानले जाते.
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे प्रकूपित झालेले दोष रक्त व सिरा यांचे पीडन वा संकोचन करून तत्‌स्थानी असलेल्या धातूचा पाक उत्पन्न करून मांसपिंड उत्पन्न करतात. या मांसपिंडावर मांसांकूर असतात. यातून स्राव वाहतो व याची वाढ फार लवकर होते. यामध्ये रक्ताची दुष्टी जास्त प्रमाणात झाल्यास त्यातून बर्‍याच प्रमाणात रक्तस्राव होतो व रक्तक्षयामुळे रोग्यास पांडुता येते. मंगोल मुलांमध्ये अधिक सापडते.
यामध्ये रक्तदुष्टीकर आहार-विहाराचे अति व सतत सेवन करणे ही महत्त्वाची कारणे आहेत. दूषित, अधिक मात्रेत, अति तीक्ष्ण, उष्ण आहार, मद्यपान, विष द्रव्यांचे सेवन, लवण-अम्ल-तिखट-क्षारयुक्त पदार्थांचे सेवन- विशेषतः कुळीथ, उडीद, वाटाणे, तेल, अळू, मुळा यांसारख्या पालेभाज्या, मासे किंवा अन्य जलचर प्राण्यांचे मांस, दही, अम्लकांजी हे पदार्थ विशेष रक्तदुष्टीकर समजले जातात. कृमी हेही कारण असू शकते.
तसेच विरुद्ध भोजन, दिवसा झोपणे, अति क्रोध, वेगधारण, श्रम, आघात, शरीर व मनाचा क्षोभ तसेच सध्या सर्वांत जास्त शरीराला अपाय करणारे कारण म्हणजे रासायनिक द्रव्यांशी सततचा संपर्क व प्रदूषित वायूसेवन. किरणोत्सर्गाशी संपर्क.
बर्‍याच वेळी अनुवंशिकता हे कारण ‘ल्युकेमिया’मध्ये आढळते.
ल्युकेमियाची लक्षणे –
जलद गतीने वाढणारा ल्युकेमिया असल्यास शरीरावर रोगाची लक्षणे लवकर दिसून येतात. नाहीतर लक्षणे लगेच शरीरावर दिसून येत नाही.
– ताप येणे
– रात्रीचा घाम येणे
– लिम्फ नोड्‌स सुजलेले आढळतात पण बर्‍याचवेळा वेदनारहित असतात.
– सतत थकल्यासारखे, हात-पाय गळून गेल्यासारखे वाटते.
– लगेच रक्तस्राव होतो, त्वचेवर लाल चट्टे किंवा बारीक स्पॉट दिसतात. परत परत नाकातून रक्तस्राव होऊ शकतो.
– सतत कसलं ना कसलं रोगसंक्रमण
– हाडे किंवा सांधेदुखी
– वजन कमी होणे, भूक न लागणे
– प्लिहा व यकृतामध्ये वृद्धी दिसणे व सतत पोटात दुखणे
– याचा प्रसार मेंदूपर्यंत झाल्यास सतत डोकं दुखणे, चक्कर येणे, आकडी येणे, उलट्या येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
परीक्षण –
रुग्णाच्या शारीरिक तपासणी दरम्यान लिम्फ नोड्‌समध्ये सूज आढळल्यास व इतर लक्षणांवरून या रोगात रक्ताची तपासणी महत्त्वाची ठरते. रक्त परिक्षणात रक्तातील पांढर्‍या पेशी प्रचंड वाढलेल्या असतात. तसेच ‘बोन मॅरो’ सॅम्पलसुद्धा घेतले जाते किंवा बोन मॅरो बायॉप्सी केली जाते. तसेच एक्स-रे, सी.टी.स्कॅन व एम्.आर्.आय.सारख्या टेस्टसुद्धा ल्युकेमियामध्ये केल्या जातात.
ल्युकेमियामधील चिकित्सा –
ल्युकेमियामध्ये चिकित्सा ही रुग्णाचे वय, बल, प्रसार यावर अवलंबून असते.
– किमोथेरपी
– रेडिओथेरपी
– स्टेम सेल ट्रान्सप्लांट
– शस्त्रकर्माद्वारे प्लिहावृद्धी असल्यास प्लिहा काढून टाकणे.
याप्रकारची चिकित्सा ल्युकेमियामध्ये केली जाते. तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पथ्यापथ्य पालन. ऍक्यूट ल्युकेमिया असल्यास चिकित्सेने रुग्ण बरा होऊ शकतो.
किमोथेरपी – किमोथेरपी म्हणजे यामध्ये ल्युकेमियामधील वाढलेल्या पेशींचा नाश करण्यासाठी काही औषधे शरीरात गोळ्यांच्या स्वरूपात, इन्ट्राव्हेनस स्वरूपात किंवा कॅथेटर स्वरूपात रक्तात सोडली जातात. ही औषधे काही अंतराच्या विश्रांतीने दिली जातात. ल्युकेमियाचा प्रसार मस्तिष्कात झाला असल्यास किमोथेरपी सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये दिले जाते. या किमोथेरपीमध्ये दुष्परिणाम जास्त असतात- उदा. केस गळणे, मळमळणे, उलट्या होणे, भूक न लागणे, रक्तस्राव व सतत इन्फेक्शन (संसर्ग) होणे. यासाठी मऊ व हलका असा शामक आहार या कालावधीत रुग्णास उपयुक्त ठरतो.
– तुपावर भाजलेल्या तांदळाची पेज, मुगाचे वरण, साजूक तुपाची फोडणी दिलेल्या उकडलेल्या भाज्या, फुलके, भाज्यांचे सूप, गोड ताजे ताक, लोणी, नाचणीचे सत्व यांचा आहारात मोठ्या प्रमाणात वापर करावा.
– गाईचे दूध, गोड ताजी द्राक्षे, डाळिंब, अंजीर अशी रसाळ व गोड फळे, साळीच्या लाह्या, चंदन व वाळा घातलेले, उकळून थंड केलेले पाणी यांचा आहारात समावेश असावा.
रेडिओथेरपी –
यामध्ये जास्त प्रखर ऊर्जा वापरून फक्त कॅन्सरच्या टार्गेटेड पेशींवर त्याचा वापर केला जातो. बर्‍याचवेळा मस्तिष्कामध्ये ल्युकेमियाचा प्रसार झाल्यास याचा वापर करतात. रेडिएशनचेही दुष्परिणाम असतात. पण बर्‍याच वेळा ज्या अवयवाला रेडिएशन दिलेले असते तिथे लक्षणेसुद्धा दिसून येतात. उदा. रेडिएशन पोटाला दिले असल्यास उलट्या, संडास, भूक न लागणे यांसारखी लक्षणे दिसतात. तसेच त्वचा लाल होणे, रूक्ष, पातळ होणे, हे दुष्परिणामही दिसतात. यासाठी गुलकंद, धन्याचे पाणी, चंदन घातलेले पाणी यांचाही वापर करावा. एकाच वेळेला भरपेट न जेवता दर ३-३ तासांनी थोडा थोडा आहार घ्यावा. डोळ्यांची आग होत असल्यास निरसे दूध किंवा गुलाबपाण्याच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्या. सर्वांगाचा दाह कमी करण्यासाठी तळपायाला गाईचे तूप काशाच्या वाटीने चोळावे. नित्यनियमाने खोबरेल तेल डोक्यास चोळावे.
आजपर्यंत कोणत्याही वैद्यकशास्त्रात कॅन्सरसाठी कायमस्वरूपी पूर्ण चिकित्सा उपलब्ध नाही. किमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रकर्म याने रुग्ण पूर्ण बरा होत नाही. पण व्याधीचे प्रसरण थांबू शकते, परंतु दुष्परिणामही वाढतात. यासाठी पर्यायी चिकित्सा म्हणून आयुर्वेदाचा फायदा होऊ शकतो. उष्णतेचे, पित्ताचे व विषाक्ततेचे शमन करणारी, पित्तशमन करणारी आयुर्वेदिक औषधे, विशिष्ट आहार-विहार, मानसिक संतुलन यांचा अवलंब केल्यास त्यामुळे निर्माण होणारी लक्षणे कमी होतात व रुग्ण उपचारपद्धतीस उत्तम प्रतिसाद देऊ शकतो.
ल्युकेमियामध्ये पूर्ण रक्तवहस्रोतस दुष्टी होत असल्याने रक्तवह स्रोतसावर सर्व प्रकारचे रक्तपित्तघ्न उपचार करावेत. रक्तमोक्षण, विरेचन व लंघन हे महत्त्वाचे उपक्रम आहेत.
ल्युकेमियामध्ये रक्तमोक्षण हा महत्त्वाचा उपक्रम आहे. रक्तमोक्षण एका बाजूला व इतर चिकित्सा एका बाजूला एवढा रक्तमोक्षणाचा फायदा या व्याधीत होतो. रक्तदुष्टी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे याचा विचार करून जवळच्या मार्गाने रक्तशोधन करावे यासाठी जलौका, शृंग, आयाबू वा सिरा यांद्वारे रक्तमोक्षण करावे.
विरेचन – विशेषतः मृदुविरेचन हे रक्तवह दुष्टीवर आवश्यक ठरते. आमलकी, द्राक्षा, निशीत्तर, बाहवा यासारखी मृदुविरेचक द्रव्ये वापरावीत. यामध्ये बर्‍याच वेळा जराशा कारणांनी रक्तस्राव होत असतो. अशावेळी रक्ताचे विमार्गगमन होत असेल तर कषाय रसाची व रक्तस्तंभन द्रव्ये वापरावीत. उर्ध्वमार्गाने रक्ताचे विमार्गगमन असेल तर वासा, लाक्षा, गोदंती इ. द्रव्ये उपयुक्त ठरतात. अधोमार्गाने रक्त जात असल्यास नागकेशर, रक्तबोल ही द्रव्ये उपयुक्त ठरतात.
मौक्तिक, कामदुधा, प्रवाळ, गोदंती किंवा पद्मकादि तैलासारखी द्रव्ये कोणत्याही मार्गाने रक्तस्राव असताना उत्तम कार्यकारी ठरतात.
रस-रक्तादि धातूंचे तर्पण व वर्धन करणार्‍या मधुर-अम्ल फळांचा रस, सुवर्ण कल्पांचा रसायन म्हणून वापर केल्यास रुग्णास चांगल्या प्रकारे उपशम मिळू शकतो.