लोकसभा सभापतीपदासाठी भाजपचे ओम बिर्ला उमेदवार

>> आज होणार निवडणुकीची औपचारिकता

भाजपाचे खासदार ओम बिर्ला यांच्या नावाची निवड एनडीएचे लोकसभा सभापतीपदाचे उमेदवार म्हणून काल करण्यात आली. दोन वेळचे खासदार असलेले बिर्ला यावेळी राजस्थानमधील कोटा-बुंदी मतदारसंघातून निवडून आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिर्ला यांचे नाव सभापतीपदासाठी सुचविले असून या पदासाठी आज निवडणूक होणार आहे.

केंद्रात एनडीएच्या बाजूने भक्कम बहुमत असल्याने त्यांची सभापतीपदी निवड ही औपचारिक बाब ठरणार आहे. या पदासाठी बिर्ला यांची उमेदवार म्हणून निवड केल्याची नोटीस भाजपने लोकसभा सचिवालयाला दिली आहे.
बिर्ला यांच्या निवडीच्या ठरावाला अभाअद्रमक, वायएसआय, बिजू जनता दल व एनडीएच्या अन्य घटक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेना, अपना दल, लोजप या पक्षांनीही बिर्ला यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
दरम्यान विरोधी पक्षांनी लोकसभा सभापतीपदासाठी आपल्या कोणाही उमेदवाराची घोषणा केलेली नाही.

संसदीय व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की आपण कॉंग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद व के. सुरेश यांच्याशी बोललो आहे. बिर्ला यांच्या उमेदवारीला ते विरोध करतील असे आपल्याला वाटत नाही असे जोशी म्हणाले.

कॉंग्रेस तसेच चंद्रबाबू नायडू याच्या तेलगू देसम पक्षानेही एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही. भाजपचे उमेदवार ५७ वर्षीय ओम बिर्ला राजस्थान विधानसभेवरही तीन वेळा निवडून आलेले आहेत. त्यांची निवड झाल्यास ते भाजपच्या या आधीच्या सभापती सुमित्रा महाजन यांची जागा घेणार आहेत.