लोकसभा ः अंतिम टप्प्यात ६४ टक्के मतदान

लोकसभेसाठी काल झालेल्या अंतिम सातव्या टप्प्यातील मतदानाला हिंसाचाराचे गालबोट लागले. पं. बंगाल व पंजाबात हिंसाचाराच्या घटना घडल्या. मात्र अन्यत्र मतदान शांततेत पार पडले.

विशेष म्हणजे सर्वाधिक ७३.४० टक्के एवढे मतदानही पं. बंगालमध्येच झाले आहे. तर या टप्प्यातील देशभरातील एकूण ५९ मतदारसंघांमध्ये ६४ टक्के एवढे मतदान झाले आहे. शेवटच्या टप्प्यात रिंगणात ९१८ उमेदवार उभे आहेत. या आधीच्या सहा टप्प्यांमध्ये ६६.८८ टक्के मतदान झाले आहे.

काल संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बिहारात ५३.३६, हिमाचल प्रदेशात ६६.१८, मध्य प्रदेशात ६९.३८, पंजाबात ५८.८१, उत्तर प्रदेशात ५५.५९, पं. बंगालात ७३.०५, झारखंडमध्ये ७०.९७, चंडिगडमध्ये ६३.५७ टक्के मतदान झाले.
काल शेवटच्या तथा सातव्या टप्प्यात पंजाबात १३, उत्तर प्रदेशात १३, प. बंगालात ९, बिहार व मध्य प्रदेशात प्रत्येकी ८, हिमाचल प्रदेशात ४, झारखंडमध्ये ३ व चंदिगडमध्ये एका मतदारसंघात मतदान झाले.

प. बंगलात अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याची नोंद झाली आहे. राजधानी कोलकात्यातही भाजप व तृणमूल कॉंग्रेस यांच्यात संघर्ष झाल्याचे वृत्त आहे. डायमंड हार्बर मतदारसंघाचे भाजप उमेदवार नीलांजन राय यांनी आपल्या वाहनाची काही लोकांनी तोडफोड केल्याची तक्रार केली. भाजपचेच जादबपूर मतदारसंघाचे उमेदवार अनुपम हाजरा यांनीही अशीच तक्रार केली आहे. इव्हीएम बिघाडाच्याही काही तक्रारी नोंद झाल्या.

केदारनाथप्रकरणी मोदींविरुद्ध
तृणमूल कॉंग्रेसची तक्रार

निवडणूक आचार संहिता काळातच तसेच शेवटच्या टप्प्यातील मतदान होण्याआधीच म्हणजेच १७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ तीर्थस्थळाला भेट देऊन त्याची माध्यमांमधून प्रसिद्धी केल्याने निवडणूक आचार संहितेचा भंग झाल्याची तक्रार तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. मोदी यांच्या केदारनाथ भेटीचे चित्रण राष्ट्रीय व प्रादेशिक माध्यमांमधून गेले दोन दिवस प्रसारीत झाले आहे. तसेच केदारनाथ मंदिर विकासाचा मास्टर प्लॅन तयार झाला असल्याची घोषणाही मोदी यांनी केदारनाथ येथे केली ही बाब नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे. केदारनाथ मंदिराच्या ठिकाणच्या त्यांच्या प्रत्येक मिनिटाचे चित्रण माध्यमांनी प्रसारीत केल्याने त्यातून अप्रत्यक्षपणे मतदारांवर परिणाम झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.