ब्रेकिंग न्यूज़
लोकमानसाचे आदिदैवत

लोकमानसाचे आदिदैवत

  • डॉ. पांडुरंग फळदेसाई

मातीपासून बनविलेली गणेशमूर्ती, नैसर्गिक रंग, रांगोळी, फळफळावळीची माटोळी, केळीच्या पात्यांची व नैसर्गिक पानां-फुलांची आरास, पालेभाज्या आणि गोडधोड स्वयंपाक, घुमट-शामेळों वादन, लोकपरंपरातील आरतीगायन, फुगड्या, दवले-मांडीच्या साहाय्याने होणारे लोकगीतगायन आणि पुन्हा गणेशमूर्तींचे होणारे वाहत्या पाण्याच्या प्रवाहातील विसर्जन ही सर्व रूपे निसर्गपूजनाची आहेत हे आपल्या ध्यानी येते. लोकपरंपरांमधून ही रूपे जतन करून ठेवलेली आपल्याला दिसतात.

श्रीगणेश ही एक आदिदेवता. आदीम काळापासून या देवतेचे पूजन होत आले आहे. खरे तर ही एक निसर्गदेवता आहे. आपण गणेश पूजन करतो तेव्हा नारळ, तांदूळ आणि विडा ठेवून, त्याला कुंकुमार्चन करून त्याची पूजाअर्चा करतो. म्हणजे निसर्ग-निर्मित वस्तूंचे- फळे, पाने, फुले यांचे पूजन. मुळात गणेश ही एक कृषिदेवता मानलेली आहे. शेतीचे रक्षण आणि कृषिमालाचे भरघोस पीक यावे यासाठी गणेशाची उपासना केली जायची. नंतरच्या काळात गणेशाच्या मृत्तिकाशिल्पाची कल्पना पुढे आली आणि शेतातील चिकणमातीच्या गणेशमूर्ती बनवून त्यांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. त्यातूनच गणेशाचे आदीम स्थान स्थिर होत गेले आणि कोणत्याही कार्यारंभी गणेश पूजन करण्याची पद्धत रूढ होत गेली.

लोकपरंपरेमध्ये कोणत्याही कामाला आरंभ करण्याअगोदर गणेश दैवताचे स्मरण आणि पूजन करण्यात येत असे. ती परंपरा आजतागायत रूढ असलेली आपणास दिसते. एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात गणेश-स्मरणाने झाली म्हणजे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते अशी लोकमानसाची श्रद्धा आहे. अडलेल्यांना बुद्धी प्रदान करणे, दुबळ्यांचे रक्षण करणे आणि शत्रूंचा निःपात करणे या कामी गणेश देवता आपल्या भक्तांना सर्वकाळ साहाय्य करते, अशी लोकभावना आहे.

गणेशाला सकल कलांचा दाता मानण्यात आले आहे. गीत, संगीत आणि नर्तन यात तो तरबेज मानला जातो. म्हणूनच सर्व कलावंत मंडळींचा तो आवडता देव आहे. म्हणूनच कलासादरीकरणाच्या प्रारंभी सदैव त्याचे स्मरण करण्यात येते. आदीम काळापासून चालू असलेल्या लोककलारंगात गणेशाचे स्थान सर्वोच्च असून त्याच्या पूजनानेच कलाप्रकारांचे मंचन होते. कधी नारळ, तांदूळ, विडा यांचे कुंकुमार्चन तर कधी गणेशाच्या मुखवट्याचे पूजन आणि त्याचेच साग्रसंगीत मंचन.
इसवी सनाच्या चौथ्या शतकापासून आलेल्या गुप्त राजवटींना गणेश हे आपले आदिदैवत वाटले. त्यावेळेपासून सर्वत्र गणेशमूर्तींचे दर्शन घडू लागले. संपूर्ण भारतात गणेश मंदिरांची उभारणी होऊ लागली. राज्यकर्ते आणि व्यावसायिकांना गणेश हे समृद्धी आणि सुबत्तेचे दैवत वाटू लागले. आणि त्याच श्रद्धेचा भाग म्हणून व्यापार्‍यांनी गणेशाला आपले आराध्यदैवत मानून त्याची सर्वत्र पूजाअर्चा चालविली. नवव्या-दहाव्या शतकापासून यातील दर्यावर्दी व्यापार्‍यांनी गणेशाला दर्यापार नेले आणि सुरुवातीला दक्षिण-पूर्व आशियातील जावा, बाली, बोर्निओ, ब्रह्मदेश, कंबोडिया, थायलंड इत्यादी देशांत आणि पुढे सर्व देशांत नेले. त्यातून गणेशभक्तीचा सर्वत्र प्रसार झाला आणि बहुतेक देशांतून गणेशाची मंदिरे उभी राहिली.

गणेश ही केवळ हिंदूंचीच देवता राहिली नाही. ती जैनांनी आपली मानली. ते तर देवांचा धनरक्षक कुबेराच्या ठिकाणी गणेशाला पाहू लागले. हेरंब, गणविघ्नेश आणि विनायक अशा त्रिविध नावांनी जैनांनी गणेशाला आपलेसे केले. श्वेतांबर जैन तर गणेशाला देवांचाही देव मानतात. कारण त्यांच्या मते देवांना यश मिळवून देण्यात गणेशाची कर्तबगारी मोठी आहे. बौद्ध धर्मियांमध्ये गणेशाला नृत्तगणपती मानले जाते. गणेश ही देवता नृत्यनिपूण असल्याने कलाविष्कारासाठी त्याचे आशीर्वाद अत्यंत आवश्यक मानले जातात. नेपाळमध्ये असलेल्या बौद्ध धर्मियांचे नृत्तगणपती हे आवडते दैवत असल्याने त्यांच्या बहुतेक प्रार्थनास्थळांच्या आसपास गणेशमूर्तींचे अस्तित्व दिसते. तेथे महारक्त गणपती हा गणांचा नायक मानला जातो. तो तांत्रिक गणपती असून चक्रसंहाराशी संलग्न आहे. गणेशपुराणात बुद्ध हा गणेशाचा अवतार असल्याचे सांगितले आहे. गणेशसहस्त्रनामात याचा संदर्भ मिळतो. एकंदरीत काय तर गणेश हे सर्व हिन्दूधर्मियांचे आणि त्याच्या सर्व शाखीय धर्मपंथांचे आदिदैवत बनून राहिले आहे.
गोव्यात तर आदिम काळापासून गणेशभक्तीची परंपरा चालून आलेली आहे. घराघरांतून गणेशाचा उत्सव येथे साजरा केला जातो. गोमंतकीय लोकजीवनातील एक आनंदपर्व म्हणजे गणेशचतुर्थीचा सण. यात निसर्गपूजनाची विविध रूपे आपल्याला दिसतात. मातीपासून बनविलेली गणेशमूर्ती, नैसर्गिक रंग, रांगोळी, फळफळावळीची माटोळी. केळीच्या पात्यांची व नैसर्गिक पानां-फुलांची आरास, पालेभाज्या आणि गोडधोड स्वयंपाक, घुमट-शामेळों वादन, लोकपरंपरातील आरतीगायन, फुगड्या, दवले-मांडीच्या साहाय्याने होणारे लोकगीतगायन आणि पुन्हा गणेशमूर्तींचे होणारे वाहत्या पाण्याच्या प्रवाहातील विसर्जन ही सर्व रूपे निसर्गपूजनाची आहेत हे आपल्या ध्यानी येते. लोकपरंपरांमधून ही रूपे जतन करून ठेवलेली आपल्याला दिसतात. गणेशजन्माची अद्भुत कथा तर आपल्या लोकवाङ्‌मयात अजरामर झालेली दिसते.
तार-सावर्डे, सत्तरी येथील एक ज्येष्ठ लोकगीत गायक लाडू शांबा गावकर यांचे गेल्या तीन वर्षांमागे निधन झाले व ते एक पट्टीचे गायक होते. अनेक लोककथानकांचे गायन ते करीत असत. त्यांनी गायिलेली एक गणेशाची सकारत माझ्या संग्रही आहे. आज गणेश उत्सवाच्या निमित्ताने ती या लेखात समाविष्ट करीत आहे.
कैलास पूर राज्यात
ईश्‍वर म्हादेव पार्वती
सुखान राज्य करता
राज्य से चलयता कैलासपुरी

सकाळीं उटोन आंगोळ्यो केल्यो
आपले कुलदेवी हातशे जोडीले
आपली तरसाद कमराक लायिली
आनी म्हादेव देव काय चालले शिकारेसी- हो रामा

सकाळचो गे सूरया
दिन बारा वाजली
देवशे येयल्या अन्ना-भोजनाक- हो रामा

पार्वती गे नारी स्वामी गे भर्तारा
विचरूंक लागली
खंय तुमी वयता स्वामी भर्तारा- हो रामा

पार्वते गे अस्तुरे मी गे वयता
प्राण्याक प्रजेक चारो पुरो
जेवणा येयल्या स्वामी भर्तारा- हो रामा

पार्वते अस्तुरे आपल्या भर्ताराची
कसोटी घेवची केली
दोन रे प्राण्यांक बाटलेंत रे भल्ले
देव गेले कायी प्रजेक चारो पुरो
जेवणा येयल्या स्वामी भर्तारा- हो रामा

स्वामी माज्या भर्तारा सर्वय प्राण्यांक
चारो पुरोवंक नायी
उपाशी मेले दोन प्राणी शे- हो रामा

पार्वते देवा म्हादेवा पार्वते गे देवा
भार-भार गे पडलो
पायांची तिडक तकले चडली
तिडकीन देवान सांगलें
गुड्डीशी काड तुजे बाटलेची- हो रामा

खज्यार साकार
दोमळ्या मुयेच्या
अन्नशें पाजला तेका बाटलेंत- हो रामा

ईश्‍वर देव ईश्वर म्हादेव
आनी मोठे पराक्रमी
हटना ईश्वर देव पार्वतेक- हो रामा

ईश्‍वर म्हादेव सदचो शिकारेक
पार्वते गे नारीन काय कवना गे केली
आंगाची मळमाती मळीचा गे बाळ
अमृत कोपी घालून बाळाक जिवदान दिले- हो रामा

हातींत दिली तरसार
फुडल्या गे दरवाज्या
बाळाक देवा ठेवला
कोण घरांत येता
अटक कर बाळा
दनपारच्या भारार ईश्‍वर म्हादेव
येयले आपल्या घरी
अटक केलो ईश्वर-म्हादेवांक- हो रामा

म्हाजे न्ही रे घर
अटक तूं रे करूं
कोणाचे रे बाळू
नावांचो ईश्वर देव
भोलानाथ शंकर
तरसार ओडल्यार
एक धपको दोन तुकडे
युद्ध शे रे कर म्हंटा बाळका तरी- हो रामा

ईश्वर- म्हादेवान तिडकीन ओडली
बाळाचे मानी तरसार झोबयली
लूण पडले धरणीवरी
शीर गेले आकाशी
पार्वती गे नार धावत येयली
माझ्या नी बाळाचो अपघात कसो केलो- हो रामा

पापा रे कर्मा अंगाची काडली माती
मळीचो केलो बाळ
अमृत कोपी घालून स्वामी जीवदान दिले- हो रामा

ईश्‍वर म्हादेव शिरीं गे सुकले
पार्वते गे नारी भियोंव नाका तुयां
तुज्या गे बाळा कायी जीवदान दितां- हो रामा

पार्वते गे नारीन स्वामी गे भर्ताराचे
वचन देवा घेतले
नावाचो भोलनाथ भोलानाथ शंकर
दर्शिन दोंगरा वचान हत्तीन गे वधीन
शीर हाडोन कायी हतियाचां- हो रामा

शीर गे हाडून शीरा नि गे लूण
एकीकडेन गे जोडले
अमृतकोपी घालून जीवदान गे दिले
जीवदान दिले पार्वतीच्या बाळा- हो रामा

स्वामी म्हाराजा भर्तारा ईश्‍वरा रे देवा
आदीं वचन म्हाका दिवचें ईश्‍वरा म्हादेवा
वचन दिला नारी पयलो भोमान दी रे पुतराक- हो रामा

पिशे खुळे नाही तेत्तीस कोटी देव
म्हाका गे विचारत कसो केलो भौमान पयलो
तुज्या पुतराक- हो रामा

स्वामी माज्या भर्तारा ईश्‍वरा रे देवा
वचन रे दिला फाटी सरूं नाका
ईश्वर म्हादेव विचारां पडलो
विचार करूनी पार्वती गे नारी
तुज्या गे बाळाक दितां पयलो भोमान
दिता पयलो भोमान हे नी धर्तरेर- हो रामा

पयलो गे भोमान गणेसा देवाक
तेत्तीस कोटी देवां श्रेष्ठ गे देव
पयल्या गे मानाचो माजो गणपती- हो रामा

तुज्या गे बाळाक मिर्त्यलोकां गे राज
पांच दिसांची गे सोबा
देड दीसाचें गे राज्य
राज्य शें चलयता सिंहासनार- हो रामा

गणेश आदिदेवतेला हार्दिक वंदन!