लॉकडाऊन करण्याचा अधिकार पंचायतींना नाही : मुख्यमंत्री

कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी पंचायती आपल्या क्षेत्रात लॉकडाऊन करू शकत नाहीत. पंचायतींना तसे अधिकार दिलेले नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनधिकृतरित्या पत्रकारांशी बोलताना दिली. काल पत्रकारांनी त्यांना त्यासंबंधी छेडले असता ते बोलत होते.

सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल येथे कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर चिंबल पंचायतीने सोमवारी पंचायत क्षेत्रात ७ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या नजरेत आणून देण्यात आले असता ते म्हणाले की, त्यांना अशा प्रकारे लॉकडाऊन करता येणार नाही. पंचायत क्षेत्रातील लॉकडाऊन करून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा पंचायतींना अधिकार नाही.

दरम्यान, भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर उद्या (आज) आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जो संवाद साधणार आहात त्यावेळी त्यांच्याकडे कोणते प्रस्ताव ठेवणार आहात, असे विचारले असता त्यांच्यासाठीची योजना तयार आहे. मात्र, त्यासंबंधी आता काहीही सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधानांशी आज संवाद
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत १६ जून रोजी संध्याकाळी ३ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राज्यातील कोरोना विषाणूची स्थिती, उपाय योजना, नवीन व्यवसाय, आर्थिक स्थिती व इतर मुद्यावर चर्चा केली जाऊ शकते.