लॉकडाऊन आणि कुटुंबातील उपक्रम

  •  नेहा नि. खानविलकर

कोरोनामुळे सर्वच भारतीयांना देशकार्य करण्याची संधी मिळाली आहे. आता भारतीयांच्या अंगी देशप्रेम व देशसेवा मुरली आहे. सर्व देशवासियांनी एकत्र होऊन कोरोनाविरुद्ध लढा देऊया आणि याच बळावर कोरोनाला हरवू या… देशाला जिंकवूया!!

सर्व जगभर ‘कोरोना विषाणू’ने धुमाकुळ घालून अनेक निष्पाप जिवांचा बळी घेतला आहे. याचा प्रसार वेगवेगळ्या देशात वाढतच चालला आहे. त्यातच भारतात संक्रमण झालेल्यांच्या बातम्या कानावर येऊ लागल्या. आजपर्यंत कोरोनावर उपचार सापडला नाही.

कोरोनावर लस काढण्यासाठी अनेक वैज्ञानिकांचे प्रयत्न चालू आहेत. पण यावर उपाय नसला तरी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क घालणे, साबणाने वरचेवर हात धुणे अशा काही गोष्टींनी कोरोना नियंत्रणात ठेवता येतो. म्हणून भारत सरकारने याची जाणीव व्हावी म्हणून ‘घरात रहा, सुरक्षित रहा’ असे सांगितले. पण लोकांचे फिरणे, गर्दी करणे सुरूच होते. शेवटी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्चला जनता कर्फ्यू जाहीर केला. त्याला भारतभर चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच गोव्यात रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला. कोरोनामुळे प्रथमच सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. गोवा सरकारने हा कर्फ्यू आणखी दोन दिवस वाढविला व त्यानंतर भारत सरकारने २५ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केले व त्यापुढेही हे असेच सुरू राहिले.

कोरोनामुळे झालेले हे लॉकडाऊन आपणा सर्वांनाच काही ना काही शिकवून गेलं. या काळात नदीचे पाणी, वातावरण स्वच्छ झालं. अशा काही गोष्टी कमावल्या तर काही गोष्टी गमावल्याही. याच काळातला मी व माझ्या कुटुंबियांचा अनुभव आपल्याला सांगू इच्छिते.
मी एकत्र कुटुंबात राहते. आमच्या घरी आम्ही १५ सदस्य आहोत. त्यात सासु, सासरे, ३ दीर, २ जावा व आमची ६ मुले. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वांत प्रथम आम्ही घरातील सर्वांची बैठक घेतली व सर्वांना देशावर आलेल्या या संकटाची माहिती दिली. यावेळी कोरोना काय आहे? आपण स्वतःची व इतरांची काळजी कशी घेतली पाहिजे.. हे सर्वांना सांगण्यात आले. घरातील मुलांसाठी व प्रौढांसाठी काय काय करावे लागेल याची चर्चा झाली. तसेच घरातील सामान किती आहे? त्याचा योग्य वापर कसा करावा यावर चर्चा करण्यात आली व काही गोष्टी ठरविण्यात आल्या… जसे –
* कोरोना टाळण्यासाठी अत्यावश्यक कामासाठीच घरातील एकाच व्यक्तीने बाहेर जावे.
* घरातील प्रौढ व लहान मुलांनी बाहेर जाऊ नये.
* शेजारी व नातेवाईकाकडे जाणे टाळावे.
* बाहेर जाणार्‍या व्यक्तीने अंघोळ करूनच घरात यावे.
* आणलेले सामान बाहेरच तीन दिवस ठेवावे व त्यासाठी लागणारी व्यवस्था करण्यात यावी.
* परसातील भाज्यांचा जास्तीत जास्त वापर करावा. जसे- फणस, पपई इ. व इतर भाज्या परसात लावण्याचा संकल्प केला.
टाळेबंदीच्या काळात मा. पंतप्रधानांनी देशासाठी काम करणार्‍या सर्वांना आदरांजली देण्यासाठी ‘टाळ्या वाजविणे व दीप प्रज्वलन’ करण्याचे आवाहन केले होते. त्यातही आमच्या कुटुंबाने उत्साहाने भाग घेत टाळ्या वाजवल्या. व ‘कोरोना जा’ अशी अक्षरे लिहून त्यावर दिवे लावले. खरंतर घरात राहून देशकार्य करण्याची सुसंधीच सर्वांना मिळाली आहे. या कोरोनाविरुद्धच्या लढाईत, प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला तर आपण ‘विजयसेतु’ नक्कीच बांधू असे मला वाटते. कुटुंब सुरक्षित तर गाव, राज्य व देश सुरक्षित. खरंतर वेळ नाही, वेळ नाही असे म्हणणार्‍या सर्वांकडेच आता भरपूर वेळ होता म्हणून याचा सदुपयोग करण्याचे आमच्या कुटुंबाने ठरविले आणि त्यानुसार कामाचे नियोजन करण्यात आले.

सर्वांनी कामे वाटून घेतली. ‘तू कर’ म्हणण्यापेक्षा ‘आम्ही करूया’ म्हणण्याने आपलेपणा वाढतो. पुरुष मंडळींनी साफसफाईचे काम घेतले. दरवर्षी काजूची बाग स्वच्छ करण्याचे काम दुसर्‍याकडून करवून घेतलं जायचं. पण यावर्षी घरातीलच लोकांनी श्रमदान सुरू केले आणि काही दिवसातच काम पूर्ण झाले. आर्थिक बचतीबरोबर सर्वांचा व्यायामही झाला. तिथेच एक दिवस वनभोजनही करण्यात आले. सर्वांच्या सहकार्यामुळे तेही छान पार पडले. कुटुंबात सर्वांचाच विचार करावा लागतो. त्यामुळे काही गोष्टी आपोआपच शिकता येतात. ‘सहनशीलता’ हा सर्वांत मोठा गुण आपोआपच अंगवळणी पडतो.

काजूच्या बागेत मुलांसाठी झोपाळे बांधण्यात आले. मुलांनी चुडतापासून झाप (मल्ल) तयार केली. मुलांना खेळण्यासाठी चुडताापासून गाडी तयार करून देण्यात आली. मुलांबरोबर वेळ घालवताना मोठ्यांच्याही बालपणातील आठवणी ताज्या झाल्या.
कोरोनामुळे स्वच्छतेचे प्रमाण वाढले. घरात येणार्‍या प्रत्येक वस्तुची सफाई होऊ लागली. घरातील सज्जे, अडगळीच्या जागा साफ करण्याची मोहीमच हाती घेण्यात आली. त्यातून अनावश्यक सामान बाहेर काढले गेले आणि आपोआपच घर स्वच्छ झाले. नादुरुस्त उपकरणे दुरुस्त केली गेली. मुलांनीही घरातील गॅलरी, खिडक्या यांचे रंगकाम आनंदाने केले.

या दिवसात घरातील आम्ही गृहिणींनी स्वयंपाकाची कमान सांभाळली. घरात असलेल्या कमी सामानातच मुलांना, आबाल-वृद्धांना त्यांच्या आवडीचे पदार्थ करून घालू लागलो. सर्व महिलांनी वेगवेगळे पदार्थ करण्याचे आपले छंद पूर्ण केले. बाहेरून आणले जाणारे केक, बिस्किटे असे पदार्थही घरातच तयार होऊ लागले. घरात पौष्टीक व आरोग्यवर्धक पदार्थ बनविण्यावर भर दिला जाऊ लागला. गॅस वाचविण्यासाठी घराबाहेर चूल लावण्यात आली. त्याच चुलीवर घरातील मुलींनी एकदा पुरी-भाजी करून सर्वांना खायला घालून आश्‍चर्याचा धक्काच दिला. घरातील गृहिणींना काय कामं असतात याची जाणीव झाली. पूर्वी सहज दुकानातून मिळणार्‍या वस्तू न मिळाल्याने त्या गोष्टींची किंमत सर्वांनाच कळली. वस्तू पुरवून वापरण्याची सवय अंगवळणी पडली.

घरात सर्वांचे नाश्ता, जेवण, साफसफाई, टीव्ही पाहणं सगळंच एकत्र व्हायचं, त्यामुळे नात्यातली गोडी वाढली. जुने दिवस नव्याने परत आले आणि घरांना ‘घरपण’ देऊन गेले. एकेकाळी दूरदर्शनवर लागणार्‍या ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘श्रीकृष्ण’ यांसारख्या पौराणिक मालिका परत प्रसारित झाल्याने पुन्हा कुटुंबासोबत त्यांचा आस्वाद घेता आला. ‘बातम्या’ ज्यातून जगातील सर्व घडामोडी कळतात त्यातही सर्वांचा रस वाढला होता. त्या पाहताना जबाबदारीने वागणारे आणि बेजबाबदार दोन्हीही तर्‍हेचे लोक पहायला मिळाले. आपण घरात सुरक्षित असताना वैद्यकीय सेवा पुरवणारे, सफाई कामगार, पोलीस यांच्या देशसेवेतून त्यांचा आदर मनात वाढला. आपणही समाजाचं देणं लागतो.. ही भावना जागृत झाली. माणसातल्या माणुसकीचं दर्शन घडलं.
घरामध्ये दररोज मनोरंजनासाठी विविध खेळ घेतले जात होते. त्यात मोठ्यापासून लहानांपर्यंत सर्वांचा समावेश असायचा. कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, लुडो, गाण्यांच्या भेंड्या अशा बैठ्या खेळांबरोबर बॅडमिंटन, क्रीकेट असे मैदानी खेळही खेळण्यात आले. मुलांना सायकल चालविणे शिकविण्यात आले.

घरातल्या घरातच सर्वांसाठी चित्रकला स्पर्धा- विषय कोरोना आणि उपाय; हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचे बक्षीस वितरणही घरातच केले गेले. एकत्र कुटुंब असल्याने आमच्या घरात ठराविक रक्कम ‘सार्वजनिक निधी’ गोळा केला जातो. या निधीत बक्षिसांची रक्कम जमा करण्यात आली. त्यामुळे त्यात वाढ झाली. हा निधी सार्वजनिक कामासाठी वापरला जातो. त्यामुळे खर्च कोणी करावा?… असा प्रश्‍न येत नाही.
घरातील परसात वेगवेगळ्या भाज्या लावण्यात आल्या. त्यावेळी मोठ्यांबरोबर लहान मुलांनीही माती खणणे, त्यात बिया घालणे व दररोज पाणी घालणे ही सर्व कामे आवडीने केली त्यामुळे आपोआपच त्यांचे निसर्गाशी नाते जोडले गेले.

माझ्या कुटुंबात कॉलेजपासून शिशुवाटिकेपर्यंत सर्व इयत्तेची ६ मुले आहेत. त्यांनी संध्याकाळी एक तास आपली ‘आगळीवेगळी’ शाळा सुरू केली आहे. त्यात प्रत्येकाने एक दिवस शिक्षक व्हायचे असे ठरविले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक जण शिक्षक होऊन आपल्या कुवतीप्रमाणे रोज नवा गृहपाठ देत असतो. त्यामुळे मुलांच्या विचारांना चालना मिळते व मुलांच्यात दुसर्‍यांना मान दिला पाहिजे ही भावना वाढीस लागते.

आता लॉकडाऊनला बरेच दिवस होऊन गेले. तरीही मुलांनी कोणत्याही प्रकारचा हट्ट केला नाही. त्यांच्यातील समंजसपणा वाढला आहे. मोबाईलचे प्रमाण खूप कमी झाले आहे. एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळालीय. परस्परातील आनंद वाढला आहे. प्रत्येकाला आपोआपच छंद जोपासायला वेळ मिळाला आहे.
कोरोनामुळे सर्वच भारतीयांना देशकार्य करण्याची संधी मिळाली आहे. आता भारतीयांच्या अंगी देशप्रेम व देशसेवा मुरली आहे. सर्व देशवासियांनी एकत्र होऊन कोरोनाविरुद्ध लढा देऊया आणि याच बळावर कोरोनाला हरवू या… देशाला जिंकवूया!!