ब्रेकिंग न्यूज़

लिंगायत अहिंदू कसे?

– दत्ता भि. नाईक

लिंगायत समाजाच्या मतांवर डोळा ठेवून मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी निवडणूक वर्षातच ही होळी खेळून संधीसाधू राजकारणाचे स्पष्ट उदाहरण घालून दिलेले आहे. देशातील राष्ट्रवादाला प्रांतवादाने शह देण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी कर्नाटकचा वेगळा झेंडाही तयार केलेला आहे.

कर्नाटक राज्य विधानसभेची निवडणूक दि. १२ मे रोजी घेतली जाणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी घोषित केले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी होणार्‍या या निवडणुकीकडे महासामन्याची उपांत्य फेरी असल्यासारखे उत्सुकतेने बघितले जाते. या निवडणुकीत ४ कोटी ९६ लाख मतदार मतदान करणार असून ५६ हजार मतदान केेंद्रांमध्ये हे मतदान घेतले जाईल. विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आली असता मार्चच्या मध्यास कर्नाटकच्या कॉंग्रेसप्रणीत सरकारचे मुख्यमंत्री श्री. सिद्धरामैया यांनी एक डाव टाकला. ‘लिंगायत’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या समाजाला हिंदू धर्मापासून वेगळे पाडून स्वतंत्र धर्माचा दर्जा द्यावा, या आशयाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून दिला. लिंगायत समाजातील काही मंडळीची स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्याची मागणी काही वर्षांपासून प्रलंबित अवस्थेत होती. लिंगायत समाजाच्या मतांवर डोळा ठेवून मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी निवडणूक वर्षातच ही होळी खेळून संधीसाधू राजकारणाचे स्पष्ट उदाहरण घालून दिलेले आहे. देशातील राष्ट्रवादाला प्रांतवादाने शह देण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी कर्नाटकचा वेगळा झेंडाही तयार केलेला आहे.

महात्मा बसवेश्‍वरांचे कार्य
मध्ययुगात हिंदू धर्मातील कर्मकांडे मोडून काढण्याकरिता अनेक चळवळी उभ्या राहिल्या. धर्माच्या मूळ संकल्पनेला धक्का न देता कालबाह्य असलेल्या प्रथा मोडीत काढणे व मूळ संस्कृतीचाच कालानुरूप अर्थ लावणे, हा या सर्व चळवळीचा हेतू होता. कर्नाटकमध्ये नंदी नामक एका उच्चवर्गीयाने याच प्रकारे कर्मकांडांना विरोध केला. ‘महात्मा बसवेश्‍वर’ या नावाने ते त्यांच्या भक्तमंडळीत ओळखले जाऊ लागले. शैव, वीरशैव, लिंगायत अशी नावे या पंथाला उद्देशून वापरली जाऊ लागली. हिंदूंचे तेहतीस कोटी देव आहेत. बृहदारण्यक उपनिषदात आठ वसू, अकरा रुद्र, बारा आदित्य, याशिवाय इंद्र व प्रजापती असे मिळून तेहतीस देव होतात असे याज्ञनवलक्य ऋषींनी शकलमुनीचा पुत्र विदग्ध उपाख्य शाकल्य याच्या प्रश्‍नास उत्तर देताना सांगितले आहे. रूपकात्मक सांगितलेला हा आकडा तेहतीस प्रकार म्हणजेच तेहतीस कोटी या अर्थाने रूढ झाला. यात आज प्रचलित असलेल्या देवदेवतांचा अंतर्भाव नव्हता. ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तीची व देवी स्वरूपात दूर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीची पूजा करण्याची पद्धत नंतर किंवा त्याच काळात सुरू झाली असावी. त्रिमूर्तीमध्ये महेश म्हणजे शिवशंकर हा कर्मकांडाच्या बाबतीत कर्मठ असलेल्यांपासून अनिष्ट रूढींविरुद्ध बंड करणार्‍यांपर्यंत व निर्जल उपवास करणार्‍यांपासून भांग प्राशन करणार्‍यांपर्यंत सर्व प्रकारच्या भक्तांचा देव आहे. शैवसिद्धांताचे तत्त्वज्ञान द्वैताकडून अद्वैताकडे नेणारे आहे. शिव हा अमूर्त आहे म्हणून त्याच्या लिंगाची पूजा करतात. महात्मा बसवेश्‍वर यांनी सर्वात सोपी असलेली शिवपूजा स्वीकारली, त्यामुळे त्यांचा शिष्यवर्ग कोणत्याही नावाने ओळखला गेला तरी तो शिवभक्त आहे.

महात्मा बसवेश्‍वरांनी त्यांच्या काळात सामान्यवर्गातील जनतेला झेपेल अशा पंथाची निर्मिती केली. बारा दिवसांचे सुतक, मासिकपाळीच्या काळात स्त्रीला अस्पृश्य मानणे यांसारख्या मधमवर्गीयांच्या ब्राह्मणी कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला.

कामगारवर्गातील समाजाला हे चोचले मानवणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. दाहसंस्कारासाठी लाकूडफाटा जमवणे सामान्य माणसाला शक्य नाही, म्हणून मृत्यूनंतर प्रेताला पुरण्याची प्रथा त्यांनी चालू केली. आपला शिष्यवर्ग हातावरील पोटाचा आहे. तो व्यसनी झाला तर त्याच्या कुटुंबाचा सर्वनाश ओढवेल म्हणून त्यांनी जे नियम बनवले त्यात दारूला पूर्णपणे बंदी घातली. खर्चिक मांसाहार बंद केला. कर्मकांडाला रामराम ठोकणार्‍या महात्मा बसवेश्‍वर यांना सर्वात कर्मठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदत्त संप्रदायात मानाचे स्थान आहे, हे लक्षात ठेवावे लागेल. सोलापूरमधील सिद्धेश्‍वर हे लिंगायत धरून सर्व शिवभक्तांचे तीर्थक्षेत्र आहे. सिद्धेश्‍वराच्या मंदिरात ब्राह्मण व लिंगायत पुजारी पूजापाठ करताना दिसतात.

हिंदुत्व एक जीवनप्रवाह
लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळे व्हावे असे का वाटले हा सर्वांसमोर उभा राहिलेला प्रश्‍न आहे. सोलापूरमधील विश्‍वविद्यालयाला भगवान सिद्धेश्‍वराचे नाव द्यावे की पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांचे, यावरून अलीकडे बराच वाद उसळला होता. सोलापूर जिल्हा धार्मिक व भाषिक समन्वयासाठी प्रसिद्ध आहे. तरीसुद्धा विश्‍वविद्यालयाच्या नामकरणावरून वादंग माजलेच. भारत स्वतंत्र झाल्यापासून जे जे अल्पसंख्य असतील त्यांना विशेष अधिकार प्राप्त होतात असे वातावरण निर्माण झाल्यामुळे कोणत्याही उपासना पंथाने उठावे व स्वतःला अहिंदू असल्याचे घोषित करावे हे नेहमीचेच झाले आहे.

देशाच्या घटनेने या देशात स्थापन झालेल्या सर्व पंथोपपंथांना ‘हिंदू लॉ’खाली आणलेले आहे. बर्‍याचदा ही व्यवस्था जैन, बौद्ध व शिखांनाही मानवत नाही. परंतु यात फारसे काही बिघडत नाही असे अभ्यासू वकिलांचे म्हणणे आहे. १९९५ साली हिंदुत्व हा एक जीवनप्रवाह आहे असा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीही हेच मत मांडले होते. स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील आपल्या भाषणात म्हटले होते की, ‘भिन्न-भिन्न उगमातून निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्याप्रमाणे अंती सागरास मिळून एक होतात, त्याचप्रमाणे रुचिवैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गानी जाणारे सर्व पथिक हे प्रभो, अंती तुलाच येऊन मिळतात.’ हिंदू कोण? याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले होते की, ‘मूर्तीपूजा मानणारा वा न मानणारा, वेद मानणारा वा न मानणारा, प्रार्थना म्हणणारा वा न म्हणणारा, इतकेच नव्हे तर देव न मानणारा नास्तिकही हिंदू असू शकतो.’

शिवलिंगाची पूजा
काही वर्षांमागे पश्‍चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने रामकृष्ण मिशनद्वारा चालवल्या जाणार्‍या शाळा, महाविद्यालये, विश्‍वविद्यालये, वसतिगृहे इत्यादींवर टाच आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस आमचा रामकृष्ण इज्म नावाचा वेगळा धर्म आहे, म्हणून आम्हाला अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा, ही मागणी रामकृष्ण मिशनतर्फे करण्यात आली होती. रामकृष्ण मिशनचा हा दावा कुठल्याही निकषावर टिकू शकला नाही. त्यामुळे त्यांचा प्रयत्न फोल ठरला. आता सिद्धरामैया यांनी केंद्रात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणण्यासाठी हा बनाव केलेला आहे हे स्पष्टपणे दिसत आहे.

धर्मयात्रा याचा अर्थ रिलिजन असा घेतला तर हिंदुधर्म एक देव, एक प्रेषित व एक ग्रंथ या संकल्पनेवर आधारलेला नाही. हेच निमित्त धरून सेमेटिक विचारांच्या पंथांनी हिंदुधर्मावर सतत टीका केलेली आहे. तेहतीस कोटी देव, अनेक अवतार, आचार्य, सिद्ध, नाथपंथीय, संत इत्यादींनी सतत जिवंत ठेवलेल्या नित्यनूतन व पुरातन असलेल्या सनातन धर्माचे हल्लीच्या काळात हिंदू हे नाव प्रसिद्धीस पावले.

जे स्वतःला लिंगायत म्हणवून घेतात- म्हणजे शिवलिंगाची पूजा करतात- म्हणजेच ते शिवभक्त आहेत. अशा एखाद्या गटाने स्वतःला अहिंदू घोषित करणे हे कोणत्याही तर्कात बसत नाही. एखादा गट हिंदू धर्म सोडून जातो म्हटल्यावर उर्वरित हिंदू समाजाने समारंभपूर्वक त्यांना निरोप द्यावा व उत्सव साजरा करावा अशी भ्रामक आशा कुणीतरी बाळगत असेल तर त्या विद्वानांच्या बुद्धीचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. हिंदूना हिंदुस्थानात अल्पसंख्य बनवण्याचे षड्‌यंत्र चाललेले आहे, हे आता लपून राहिलेले नाही. भारत तेरे तुकडे होंगे म्हणणारे जसे देशाचे मारेकरी आहेत, तेवढेच ते हिंदुत्वद्वेष्टे आहेत हे लक्षात ठेवावे लागेल.