लाडली लक्ष्मी’चे २० हजार अर्ज लवकरच हातावेगळे

लाडली लक्ष्मी योजनेखालील अडून पडलेले १५ ते २० हजार अर्ज लवकरच हातावेगळे करण्यात येणार असल्याची माहिती काल महिला व बाल विकास मंत्री विश्‍वजित राणे यांनी विधानसभेत दिली. इजिदोर फर्नांडिस यांनी सदर प्रश्‍न विचारला होता. ‘गृह आधार’ व ‘लाडली लक्ष्मी’ या दोन्ही योजना चांगल्या असल्याचे फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले. मात्र, काही अडचणींमुळे या योजनांसाठी नव्याने अर्ज करणार्‍या अर्जदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. सरकारने या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
गृह आधार योजनेचा लाभ मिळू शकत नाही असे काही लोक या योजनेचा लाभ घेत असल्याचे दिसून आल्यानंतर सरकारने त्याबाबत चौकशी करण्याचे ठरवले होते त्याचे काय झाले, अशा प्रश्‍न यावेळी दिगंबर कामत यांनी केला. यावर माहिती देताना राणे म्हणाले की, आम्ही त्याबाबत चौकशी केली असून सुमारे १५ ते २० हजार लाभार्थींची नावे वगळण्यात येणार आहेत.

लाडली लक्ष्मी योजनेसाठी मुलीला १८ वर्षे होऊन गेल्यानंतर अर्ज स्वीकारला जात नाही, असे सभागृहाच्या नजरेस आणून देऊन सरकारने त्यावर तोडगा काढावा, अशी सूचना आमदार ग्लेन टिकलो यांनी केली.
त्यावर बोलताना राणे म्हणाले, की १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिनाभराच्या विलंबाने येणारे अर्ज आम्ही स्वीकारू. त्यापेक्षा जास्त विलंबाने येणारे अर्ज स्वीकारणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.