लाट ओसरली?

0
101

देशाच्या विविध राज्यांत लोकसभेच्या तीन व विधानसभांच्या ३३ जागांसाठी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीने भारतीय जनता पक्षाचे हवेत तरंगणारे पाय पुन्हा जमिनीवर आणले आहेत. ज्या गुजरात आणि राजस्थानमध्ये मोदी लाटेने गेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा मिळवून विरोधकांचा पूर्ण सफाया केला होता, तेथे कॉंग्रेसला डोके वर काढण्याची संधी या पोटनिवडणुकीत कशी मिळू शकली आणि उत्तर प्रदेशमध्ये जेथे गेल्या लोकसभा निवडणुकीत ऐंशीपैकी ७१ जागा भाजपाला मिळाल्या होत्या, तेथे सत्ताधारी समाजवादी पक्षाने भाजपाच्या तेथील हिंदुत्वाधारित आक्रमक प्रचार मोहिमेच्या चिंधड्या उडवीत अकरापैकी नऊ जागा कशा काबीज केल्या, त्यावर आता नेत्यांना आत्मचिंतन करावे लागेल. खुद्द मोदींच्या गुजरातमध्ये कॉंग्रेसला नऊपैकी तीन जागा मिळाल्या आहेत आणि राजस्थानमध्ये तर चार जागांपैकी भाजपाला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तेथे कॉंग्रेसने उर्वरित तिन्ही जागा जिंकल्या आहेत. या तिन्ही राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल पाहता देशात गेल्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणणारी मोदींची महालाट शंभर दिवसांतच ओसरू लागली की काय, असा प्रश्न निश्‍चित उपस्थित केला आहे. यशाचे श्रेय मोदींना द्यायचे आणि पराभवाचे खापर स्थानिक पक्षकार्यकर्त्यांवर फोडायचे असे कसे करता येईल? या सार्‍या विधानसभेच्या पोटनिवडणुका जरी असल्या आणि स्थानिक मुद्दे जरी अशा वेळी महत्त्वाचे ठरत असले, तरी खुद्द भाजपाची सत्ता असलेल्या गुजरात आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये परिस्थिती अल्पावधीत पालटू लागली आहे, असा या निकालांचा अर्थ घ्यायचा का? उत्तर प्रदेशमध्ये ज्या अकरा जागांवर पोटनिवडणूक झाली, त्या सगळ्या जागा पूर्वी भाजपाच्या होत्या हे विसरून चालणार नाही. उत्तर प्रदेशमध्ये हे असे का घडले, हाही विचार करण्यासारखा प्रश्न आहे. भाजपाची तेथील प्रचारमोहीम अत्यंत आक्रमक होती. उर्वरित देशामध्ये न केलेला प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार उत्तर प्रदेशमध्ये सुरू होता. मुझफ्फरनगर दंगल प्रकरण, गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांची प्रक्षोभक वक्तव्ये, ‘लव्ह जिहाद’ चा ऐरणीवर आणलेला विषय एवढे सगळे करूनही मतदारांनी भाजपाकडे पाठ फिरवली, याचा अर्थ जे धार्मिक ध्रुवीकरण पक्षाचे नेते उत्तर प्रदेशात करू पाहात होते, ते मतदारांनी सपशेल नाकारलेले आहे आणि सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या विकासाच्या मुद्द्याला पाठबळ दिले आहे. या पोटनिवडणुकीत पश्‍चिम बंगालमध्ये भाजपाला स्वबळावर प्रथमच बसीरथ दक्षिणची जागा जिंकता आली आणि चौरंगीमध्ये भाजपा उमेदवार दुसर्‍या स्थानावर राहिला ही पक्षासाठी जमेची बाब म्हणता येईल. आसाममध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केली होती आणि पोटनिवडणुकीत तेथील एक जागा पक्षाने मिळवली आहे. परंतु भाजपाचे मजबूत गड असलेल्या गुजरात आणि राजस्थानमध्ये हवा पालटू लागली त्याची कारणे काय? कॉंग्रेसला यावेळीही उत्तर प्रदेशात काही विशेष कामगिरी करून दाखवता आली नाही, पण राजस्थानमधील कॉंग्रेसची कामगिरी चमकदार आहे. सचिन पायलट यांच्यासारख्या दमदार तरूण नेत्याच्या नेतृत्वाखाली तेथे कॉंग्रेसने पुनरागमन करण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली आहे ही बाब वसुंधराराजेंनी वेळीच ध्यानात घ्यायला हवी. राजस्थानमध्ये सदैव ‘ऍन्टी इन्कम्बन्सी’ दिसून येते. पोटनिवडणुकांचे निकालही तेच सुचवतात. पोटनिवडणुकांचे निकाल पाहिले, तर मोदींच्या नावे प्रयत्नपूर्वक निर्माण करण्यात आलेली हवा यापुढील निवडणुकांमध्ये मुळीच कामी येणार नाही, याचे स्पष्ट संकेत मिळतात. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये निवडणुका तोंडावर आल्या आहेत. महाराष्ट्रात अतिआत्मविश्वासयुक्त भाजप नेते प्रसंगी महायुती तोडूनही स्वबळावर लढण्याचे जे इशारे देत होते, त्यांचे अवसान या निकालांनंतर गळेल. भाजपावरील आपला दबाव वाढवण्याची संधी आता शिवसेना घेतल्याविना राहणार नाही. मोदींनी केलेला ‘अच्छे दिन’ चा वायदा गेल्या शंभर दिवसांत तरी त्यांना प्रत्यक्षात उतरवता आला नाही, उलट महागाई वाढली आणि भ्रष्टाचारही मिटला नाही. अशावेळी ‘इंडिया शायनिंग’ चे जे झाले, तेच ‘अच्छे दिन’ चे होऊ नये यासाठी मोदी सरकारला उक्तीपेक्षा कृतीशिवाय आणि खडतर परिश्रमांखेरीज यापुढे तरणोपाय नसेल!