लष्करी सज्जतेचे आधुनिक अस्त्र

  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

आतापर्यंत भारत सुखोई-३० या लढाऊ विमानात रशियन बनावटीच्या हवेतून हवेत मारा करू शकणार्‍या क्षेपणास्त्राचा वापर करत होता. भारतीय बनावटीच्या या ‘अस्त्र’चे वैशिष्ट्य असे की प्रक्षेपणानंतर ते वेगाने लक्ष्यभेद करते, त्यामुळेच अस्त्रचे वर्णन बियॉंड विज्युअल रेंज मिसाईल असे केले जाते.

गेल्या २०-२५ वर्षांपासून भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणाची चर्चा सुरू आहे. युपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे लष्करी साधनसामग्रीच्या व्यवहारांची प्रकरणे रेंगाळत गेली. यातील राजकारणाचा ङ्गटका अकारण सैन्याला सहन करावा लागला. देशाची शस्रसज्जता अधिक भक्कम होण्यास यामुळे मर्यादा आल्या. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी सरकारने सैन्याच्या आधुनिकीकरणाला चालना देण्यास प्राधान्य देण्याचे ठरवले. मागील पाच वर्षांत या बाबत ङ्गार मोठे काही झाले नाही असे वाटत असले तरी त्या संदर्भातील पायाभरणी मात्र नक्कीच झाली.
गेल्या काही महिन्यांत सैन्यदलांमध्ये विशेषतः हवाई दलामध्ये आधुनिक साहित्यसामुग्री येत आहे. त्यामुळे आता भारत सैन्याचे आधुनिकीकरण करण्यामध्ये आता मागे राहिलेला नाही. त्यातही स्वदेशी शस्त्रसामग्रीवर भर देण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करत असतो. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत शस्त्रास्त्रे हे पारंपरिक सैन्याला पर्याय ठरताहेत. देशाच्या सीमांवर वाढती आव्हाने आणि शेजारील देशांच्या युद्धाच्या धमक्या हे पाहता लष्कराचे आधुनिकीकरण महत्त्वाचे तर आहेच; पण ती काळाची गरजही आहे.

आधुनिकीकरणाच्या या टप्प्यात स्वदेशी शस्त्रास्त्रांचा वापर लष्करात होऊ लागला, तर सोन्याहून पिवळे असे म्हणावे लागेल. मुळातच सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी आधुनिक शस्त्रांस्त्रांची गरज आहे; पण ती स्वदेशी बनावटीची असतील तर त्यातून आयातीसाठी खर्च होणार्‍या परदेशी चलनाची खूप मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. त्यातून चालू खात्यावरील तूट कमी होईन देशाच्या आर्थिक तिजोरीला मोठा हातभार लागेल. याचा दुसरा महत्त्वाचा ङ्गायदा म्हणजे आधुनिक शस्त्रास्त्र निर्मिती भारतात झाल्यास इथल्या भारतीय वैज्ञानिकांच्या बुद्धीचा कस लागेल. तिचा वापर करून भरवशाची शस्त्रप्रणाली युद्धासाठी विकसित करता येईल.

काही दिवसांपूर्वी नौदलासाठी तयार करण्यात आलेल्या तेजस या भारतीय बनावटीच्या लहान विमानामुळे नौदलाची मारक क्षमता अधिक वाढली आहे, तर संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘अस्त्र’ या हवेतून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्राचीही यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ओडिशाच्या किनार्‍यावरून बंगालच्या खाडीमध्ये या क्षेपणास्त्राने अपेक्षेप्रमाणेच लक्ष्याचा अचूक वेध घेतला. या यशामुळे भारत अशा देशांच्या पंगतीमध्ये जाऊन बसला ज्यांनी हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत. आतापर्यंत रशिया आणि इस्रायल या दोन देशांकडून भारत क्षेपणास्त्रे आयात करत होता.

डीआरडीओने विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राची क्षमता ७० किलोमीटर ठेवलेली आहे. रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल ट्रॅकिंग सेन्सर आदींचा उपयोग करून ह्या क्षेपणास्त्रावर लक्ष ठेवण्यात आले. भारताच्या या अस्त्र क्षेपणास्त्रामध्ये लांब अंतराबरोबर लहान अंतरावरील लक्ष्य भेदण्यासह विविध श्रेणींची आणि उंचीवरील लक्ष्यभेद करण्याची क्षमता आहे. आता डीआरडीओ अस्त्र क्षेपणास्त्राचे अधिक प्रगत रूपात तयार करण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहे. या नव्या प्रगत अस्त्र क्षेपणास्त्राद्वारे ३०० किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदण्यात यश येणार आहे.

आत्तापर्यंत भारत सुखोई-३० या लढाऊ विमानात रशियन बनावटीच्या हवेतून हवेत मारा करू शकणार्‍या क्षेपणास्त्राचा वापर करत होता. भारतीय बनावटीच्या या ‘अस्त्र’चे वैशिष्ट्य असे की प्रक्षेपणानंतर ते वेगाने लक्ष्यभेद करते, त्यामुळेच अस्त्रचे वर्णन बियॉंड विज्युअल रेंज मिसाईल असे केले जाते.

विशेष म्हणजे, डीआरडीओने अस्त्र क्षेपणास्त्र विकसित करताना ते मिराज, मिग २९, मिग २१ बायसन, एलसीए तेजस आणि सुखोई एसयू-३० या विमानांवर बसवता येईल, अशा पद्धतीनेच विकसित केले आहे. या क्षेपणास्त्रात ठोस इंधनाचा वापर केला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे क्षेपणास्त्र आवाजाच्या गतीपेक्षा तीव्र गतीने म्हणजे सुपरसॉनिक गतीने हवेत उडून लक्ष्यभेद करू शकते.

लढाऊ विमानांवर लावलेली क्षेपणास्त्रे ही रडारच्या मदतीने पहिल्यांदा लक्ष्याची ओळख पटवून घेतात. त्यानंतर रडारच्या मदतीनेच लक्ष्य ठरवून त्याचा मारा केला जातो. विशेष गोष्ट अशी की अस्त्र हे क्षेपणास्त्र कोणत्याही वातावरणात शत्रुच्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे. आवाजाच्या वेगापेक्षाही जास्त वेगाने ते हल्ला करते. शत्रुच्या आवाक्यात येऊ नये यासाठी अँटी स्मोक तंत्रज्ञान लक्षात ठेवून या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर शत्रुच्या नजरेपासून बचाव करण्यासाठी त्याची जाडीही कमी ठेवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक काऊंटर मेजर तंत्रज्ञान म्हणजे ईसीसीएम तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्यामुळे हे क्षेपणास्त्र शत्रूचा काळ ठरू शकते. एवढेच नव्हे तर शत्रूच्या विमानाचा माग काढून ते नष्ट करण्याचे काम हे क्षेपणास्त्र करू शकते. शिवाय हवेतल्या हवेत आपली दिशाही वेगाने बदलू शकते. त्यामुळेच लष्कराची क्षमता या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रामुळे वाढण्यास मदतच होणार आहे.
‘मेक इन इंडिया’ या मोहिमेअंतर्गत स्वदेशी प्रतिभा अधिक चमकते आहे. पण देशांतर्गत रोजगार आणि देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासही ती उपयोगी येत असेल तर ती अभिमानास्पद गोष्ट आहे. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर तरी आपण स्वदेशी शस्त्रसामुग्रीच्या निर्मितीला वेग देऊन परदेशी शस्रास्रांची आयात कमी करावी, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे देशाचा ङ्गायदा होईलच, शिवाय संरक्षण साधन सामग्रीच्या व्यवहारांवरून होणार्‍या भ्रष्टाचाराचे आरोप – प्रत्यारोप करण्यासही वाव मिळणार नाही. लष्कराचे आधुनिकीकरण करताना स्वदेशी शस्त्रांनी लष्कर सज्ज झाले तर त्याचा नक्कीच आनंद देशवासियांना होईल. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर यामुळे देशाची प्रतिष्ठा उंचावण्यास मदत मिळेल. यापुढे जाऊन येणार्‍या काळात शस्रास्रांचा सर्वांत मोठा आयातदार देश अशी भारताची ओळख पुसली जाऊन एक मोठा निर्यातदार देश अशी ओळख होईल. तो दिन देशासाठी नक्कीच सुदिन असेल!