लष्करी कारवायांचे हीन राजकारण

  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

भारतीय लष्कर मागील ७० वर्षे निष्पक्ष राहिले आहे व यापुढेही राहील. सभोवतालच्या अनेक देशांमध्ये पक्षबाधीत लष्करांनी तेथील लोकशाही सरकारे उलथवून आपली राजवट स्थापन केली. पण नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या धामधुमीत भारतीय लष्कराला राजकारणात ओढून आपल्या येथील राजनेते व राजकीय पक्षांनी तीच घोडचूक केली आहे, असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही.

नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हीन दर्जाच्या राजकारणाने सर्व सीमा पार केल्या. संसाधनीय चोरी आणि व्यक्तीगत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी परिसीमा गाठली. सर्वोच्च स्तरीय राजकारणी, प्रशासक आणि राजकीय पक्षापासून तर अगदी गल्लीतील सतरंजी उचलणार्‍या कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच यात आपले हात धुवून घेतले. सगळ्यात वाईट म्हणजे, आपले पारडे भारी करण्यासाठी लष्करी कारवायांचे अकारण श्रेय घेण्याची अहमहमिका आणि त्यासाठी लष्कराला वेठीला धरण्याची चढाओढ शिसारी आणण्यालायक होती. मात्र असे करताना लष्करातील सैनिकांचे मनोबल आणि त्यांच्या निष्पक्ष मनोवृत्तीवर या राजनीतीचा काय परिणाम होईल याचा काडीमात्र विचार या मंदबुद्धांनी केला नाही याचे आम्हा निवृत्त सैनिकांना नवल आणि वाईट वाटते.

भारतीय लष्कर मागील ७० वर्षे निष्पक्ष राहिले आहे व यापुढेही राहील. सभोवतालच्या अनेक देशांमध्ये पक्षबाधित लष्करांनी तेथील लोकशाही सरकारे उलथवून आपली राजवट स्थापन केली. आता निवडणुकीच्या धामधुमीत भारतीय लष्कराला राजकारणात ओढून आपल्या येथील राजनेते व राजकीय पक्ष तीच घोडचूक करताहेत, असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही. निदान यापुढे तरी राजकीय पक्षांनी याची पुनरावृत्ती करू नये म्हणून निवडणूक निकालाच्या मुहूर्तावर राजकीय पक्ष-नेते आणि सामान्य लोकांच्या मनावर हे बिंबवण्यासाठी हा पंक्तिप्रपंच.

२०१५ मध्ये म्यानमारमधील इन्सर्जन्ट कँप्सवर सेनेच्या कमांडोंनी केलेला हल्ला, २०१६ मध्ये सीमापार करण्यात आलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ मध्ये पाकिस्तान व्याप्त काश्मिरमधील जिहादी दहशतवाद्यांच्या ‘लॉन्च पॅड्सवर झालेली कमांडो कारवाई आणि भारतीय वायुसेनेने २०१९ मध्ये पाकिस्तान व्याप्त काश्मीरला पार करून बालाकोटवर केलेला ‘हवाई हल्ला’ आणि दुसर्‍या दिवशीची ‘डॉग फाईट’ याचे संपूर्ण श्रेय लष्कराला न देता सरकारमध्ये सामील असलेल्यांनी स्वतःकडे घेतले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर झाले त्या प्रकारचे हल्ले याच राजवटीत झाले, या आधीच्या सरकारची असे पाऊल उचलायची हिंमत नव्हती, असा डंका पिटण्यात आला. यावर अनेक चर्चा झडल्या, प्रसारमाध्यमांनीदेखील ह्याची री ओढली, रातोरात अनेक पुस्तके लिहिली गेली. माहितीपट बनले आणि यापैकी काही कारवायांना रुपेरी पडद्यावरही आणण्यात आले. जगभरात कुठेही स्पेशल फोर्सेसच्या कारवाया झाल्यानंतर जशा प्रतिक्रिया नोंदवल्या जातात त्याचप्रमाणे भारताच्या स्थल व वायू सेना मुख्यालयांनी २०१६ व १९ मध्ये आपल्या प्रतिक्रिया अतिशय मोजक्या शब्दांमध्ये व स्पष्ट पण संयत भाषेत मांडल्या. पण राजकारण्यांच्या जल्लोषात त्याची कोणी दखल घेतली नाही.

काही चलचित्र वाहिन्या, चित्रपट निर्माते आणि वार्ताहरांनी या ऍक्शन्सचा मनोवैज्ञानिक फायदा उठवून आपले उखळ पांढरे करण्यासाठी टपलेल्या राजकारण्यांच्या इच्छेनुसार आपल्या कल्पनाशक्तीला मोकळे सोडत आपला टीआरपी वाढवण्यासाठी माहितीला मसालेदार फोडणी दिली. देशाच्या सुरक्षेचा काडीमात्र विचार न करता , स्थल/वायुसेनेच्या कारवायांना शब्दबद्ध/चित्रबद्ध केले. यामध्ये सहभागी झालेल्या सैनिकांमध्ये लष्करी कारवायांच्या या अकारण राजकारणामुळे असंतोष निर्माण झाला असला तरी लष्कराच्या शिस्तबद्धतेमुळे तो दृष्टिगोचर झालेला नाही. याच प्रकारच्या, यापुढील लष्करी कारवायांवर, अशा अकारण पण विकृत गौप्यस्फोटांमुळे विपरीत परिणाम होऊ शकतो, कारण शत्रूला भारतीय लष्कराच्या संसाधनांची व सामरिक डावपेचांनी विकृत का होईना, पण माहिती मिळू शकेल, हे त्या असंतोषाचे मुख्य कारण आहे.

काश्मीरमध्ये, नियंत्रण रेषेच्या आत असलेल्या जिहादी लॉन्च पॅड्सवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आहे असे सप्टेंबर, २०१६ मध्ये, तत्कालीन डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स, लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते. असे असताना या प्रकारचे ‘इंव्हेझिव्ह स्ट्राईक्स’ याआधी आमच्या वेळी देखील झाले आहेत असे काही माजी सेनाध्यक्षांनी म्हटल्यावर त्यावर आक्षेप का व कसा घेतला जातो, हे अनाकलनीय आहे. १२ लाख सैनिकांना कमांड करणारे ते जॉंबाज, खोटे बोलताहेत असे या तथाकथित टीकाकारांना म्हणायचे आहे की काय, हा विचार सुद्धा आम्हा माजी सैनिकांच्या मनात येतो. पॅरा कमांडो/ स्पेशल फोर्सेसनी या आधी देखील सीमापार सैनिकी कारवाया केल्या आहेत. जयपूर युवराज, लेफ्टनन्ट कर्नल भवानीसिंगनी त्यांच्या पॅरा बटालियनचे नेतृत्व करताना राजस्थानच्या वाळवंटात पाकिस्तानच्या आत ८० किलोमीटर जाऊन दुसर्‍या महायुद्धातील ब्रिटिश स्पेशल एयर सर्व्हिस कारवायांच्या धर्तीवर ‘व्हेईकल बॉर्न रेड’ केली होती. सेनेच्या पॅरा कमांडोंनी स्पेशल फ्रंटियर फोर्ससह पूंछ क्षेत्रात पाकिस्तानी सीमेच्या चार किलोमीटर आत जाऊन त्यांची गन पोझिशन ध्वस्त केली होती. हे छापे १९७१ च्या भारत-पाक युद्धात पश्चिमी क्षेत्रात घातले गेले होते. याच युद्धात पूर्व क्षेत्रात युद्ध सुरु होण्यास आधी चितगॉन्ग डोंगराळ भागामध्ये असलेल्या पूर्व पाकिस्तानचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल राव फर्मान अलीच्या ठिकाणावरही एसएफएफनी मिझो हिल्सच्या बाजूने जाऊन छापा मारला होता. यापैकी काहींमध्ये प्रस्तुत लेखकही सहभागी होता.

युद्धातील या छाप्यांच्या नंतर अनेकदा केल्या गेलेल्या ‘क्रॉस बॉर्डर रेड्स’ स्पेशल फोर्सेस आणि इन्फन्ट्री बटालियनकडून केल्या गेल्या होत्या, पण त्यांना अवास्तव प्रसिद्धी दिली गेली नाही. २०११ मध्ये सेनेने पश्चिमी सीमेपारच्या तीन पाकिस्तानी पोस्टस्‌वर हल्ला करून १३ पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले आणि त्याच बरोबर तीन पाकिस्तानी मुंडकी कलम करून आणली होती. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा क्षेत्रात, पाकिस्तानी बॅटल ऍक्शन टीमने सहा भारतीय सैनिकांवर घात लावून हल्ला केला होता आणि त्यातील दोघांचे शीर कलम करून नेले होते, त्याचा बदला घेण्यासाठी सेनेने ही कारवाई केली होती. टार्गेट सिलेक्शन, प्रिपरेशन, ट्रेनिंग, मॉनिटरिंग आणि एक्झिक्युशन, सर्व २०१६ च्या ‘सर्जिकल स्ट्राईक‘च्या धर्तीवरच झाले होते. भारतीय लष्कराने प्रत्येक पाकिस्तानी कारवाईचा बदल घेतला आहे. मग सरकार कोणाचे का असेना! हे ढळढळीत सत्य आहे. असे असताना आणि आर्मीला ‘फ्री हॅन्ड फॉर एनी ऍक्शन’ दिल्यानंतरही २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक पंतप्रधानांनी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी केला होता हे म्हणण्याचे काय प्रयोजन होते, किंवा तो खरेच झाला का असे विरोधी पक्षांनी का म्हटले हे स्पष्ट झालेले नाही.

२०१६ चा सर्जिकल स्ट्राईक हा ‘अनप्रेसिडेंटेड स्केल’वर केला गेला असे म्हणणार्‍यांनी कृपया शिव थरूर आणि राहुल सिंग यांचे ‘इंडियाज मोस्ट फियरलेस : ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हिरोज’ हे पुस्तक वाचावे, म्हणजे हा हल्ला किती मोठा होता याबद्दलच्या त्यांच्या शंकांचे पूर्ण निरसन होईल. त्याचप्रमाणे तो खरेच झाला का हे विचारणार्‍यांनी व आमच्या वेळी सुद्धा सहा सीमापारचे हल्ले करण्यात आले होते अशी शेखी मिरवणार्‍यांनी त्यावेळचा ‘वॉशिंग्टन पोस्ट’चा अंक वाचावा. पण एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की युद्ध वगळता, तत्कालीन सरकारांनी, वरील सर्व सैनिकी कारवाया ‘उत्तरादाखल’ केल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश’ अशी कुप्रसिद्धी पावलेल्या पाकिस्तानने सतत भारतावर जिहादी हल्ले केले असतानाही त्याच्यावर दूरगामी परिणाम होणारे सक्रिय सैनिकी कारवाई करण्याचे किंवा तसे स्वातंत्र्य लष्कराला देण्याचे धाडस कुठल्याही सरकारने कधीच दाखवले नाही. उलट स्वतःचा संकुचित राष्ट्रीय स्वार्थ साधण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी काश्मीरमध्ये व इतरत्र भारतात, राष्ट्रीय सामरिक ध्येयांना साध्य करण्यासाठी कार्य करण्याऐवजी नेहमी त्यांना तिलांजलीच दिलेली प्रत्ययाला येते.

१९६५ व ७१ च्या युद्धाखेरीज मे, १९९७ मध्ये भारतीय वायुसेनेच्या मिग २५ फॉक्सबॅट विमानानी २६ हजार फुटांवरून उड्डाण करत पाकिस्तानच्या ४३२ किलोमीटर आत जाऊन इस्लामाबाद जवळच्या सामरिक ठिकाणांचे फोटो घेतले होते. एवढेच नव्हे तर परत येत असताना त्या वैमानिकांनी साउंड बॅरियर तोडून इस्लामाबादवर आवाजी धमाका (सॉनिक बूम) केला होता. पाकिस्तानी मीडियाने याला ‘भारतीय विमानांनी हवेत स्फोट केला’ अशी प्रसिद्धी दिली होती. ऑगस्ट, २००२ मध्ये भारतीय वायुदलाने पाकिस्तान सीमेवरील अनेक ठिकाणांवर एकसाथ हवाई हल्ला केला आणि त्यानंतर भारतीय कमांडोंनी त्यापैकी एकावर ‘ग्राउंड ऍक्शन’ करत अनेक पाक सैनिकांना यमसदनी धाडले होते. या कारवायांना देखील कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी दिली गेली नाही. मे, १९९८ ते नोव्हेंबर, २००३ दरम्यान सेनेच्या स्पेशल फोर्सेसनी सीमापार दूरवर अनेक छापे मारले होते. देशात झालेल्या जिहादी हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी त्या करण्यात आल्या आणि त्यांची परवानगी सरकारमधील अत्युच्च व्यक्तींनी दिली होती. मात्र, तत्कालीन सरकारने त्या लष्करी कारवायांचा गाजावाजा न करता याबद्दल मौन पत्करले.

भारताने १९७१ मध्ये बंगालच्या खाडीत अमेरिकन एयरक्राफ्ट कॅरियर व अरबी समुद्रात ब्रिटिश एयरक्राफ्ट कॅरियर भारतीय बंदरांकडे आगेकूच करत असताना आणि ‘चीन या युद्धात आपल्या मदतीसाठी उतरेलच’ या पाकिस्तानी वल्गनेची पर्वा न करता पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. भारतीय लष्कर दिलेली कारवाई करण्यास समर्थ आहे. मात्र; कोणतीही सैनिकी कारवाई झाली की ऍक्शन सफल झाली कसे म्हणता? किती मारले गेलेत? किती मारू शकले नाहीत? का? याची मीमांसा करण्याऐवजी आपण ती करू शकलो हे स्वीकारणे जास्त महत्वाचे असते. ही गोष्ट लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर नेते व राजकीय पक्षांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की पाकिस्तानविरुद्ध केलेल्या प्रच्छन्न कारवाईला अवास्तव प्रसिद्धी दिल्यास पाकिस्तान त्याचा कधीही स्वीकार करणार नाही. बालाकोट हल्ल्यानंतरच्या दुसर्‍या दिवशी, विंग कमांडर अभिनंदनने मारलेल्या एफ १६ विमानाचे अवशेष दाखवले असताना देखील पाकिस्तानने अजूनही ते मान्य केलेले नाही. प्रत्येक वेळी सरकारने सैनिकी कारवाईचा डंका पिटला की विरोधी पक्ष त्यावर प्रश्नचिन्ह उभे करतात आणि या अवाजवी राजकीय धूळफेकीत लष्कराचे मनोबल खच्ची होण्याचा धोका उद्भवतो.

आर्थिक तरतूद आणि राष्ट्रीय सुरक्षा यांची लक्षणीय सांगड स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजतायगत कुठल्याही सरकारला घालता आलेली नाही. अर्थसंकल्पात लष्कराची नेहमीच हयगय केली जाते. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. भरीव आर्थिक तरतूद कधीच केली जात नाही. प्रत्येक अर्थसंकल्पावेळी गरज पडल्यास सर्वंकष मदत करू या ‘राजकीय जुमलेबाजी’ वरच लष्कराला समाधान मानावे लागते. त्याबद्दल हे राजकारणी कधीच, काहीच बोलत नाहीत. नुसत्या फुकाच्या बोलीवर लष्कर काम करू शकत नाही. लष्कराच्या नावाने स्वतःचे उखळ पांढरे करत एकमेकांवर दोषारोपण करण्याऐवजी सर्वांनी लष्कराच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे.