ब्रेकिंग न्यूज़
लष्करी अधिकार्‍याला समुद्रात बुडताना वाचविले

लष्करी अधिकार्‍याला समुद्रात बुडताना वाचविले

>> तटरक्षक
     दलाची कामगिरी

भारतीय तटरक्षक दलाने काब दी राम येथे खवळलेल्या समुद्रात बुडताना एका लष्कराच्या अधिकार्‍याला जीवदान दिले. सदर घटना काल दुपारी दोनच्या सुमारास घडली.

भारतीय तटरक्षक दल गोवा विभागाचे उपमहानिदेशक हिमांशू नौटियाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी दोनच्या सुमारास तटरक्षक पोलीस तसेच दृष्टी लाईफगार्ड यांच्याकडून काब द राम येथे खोल समुद्रात एक व्यक्ती बुडत असल्याचा संदेश मिळाला. त्यानुसार तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरने घटनास्थळी १५ मिनिटात धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. यावेळी समुद्र खवळलेला होता.
हेलिकॉप्टरमधीलउपकमांडंट विश्‍वजित सिंग व लेफ्टनंट ऋषी शर्मा यांनी खवळलेल्या समुद्राच्या मार्‍याला तोंड देत पाण्यात गटांगळ्या खात असलेल्या लष्करी अधिकार्‍याला वर काढण्यास यश मिळविले. त्यानंतर त्याला हवाईमार्गे दाबोळीला नेण्यात आले. नौसेनेच्या जीवंती इस्पितळात त्याला दाखल करण्यात आले असून उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.

तटरक्षक दलाचे उपमहानिदेशक नौटीयाल यांनी पत्रकारांशी बोलताना अशा प्रसंगाना धैर्याने तोंड देऊन मदतकार्य करणे हे भारतीय तटरक्षक दलाचे कर्तव्य आहे. भारतीय तटरक्षक दल चोवीस तास मदतकार्यास सज्ज असते. भारतीय तटरक्षक दल नेहमी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.