ब्रेकिंग न्यूज़

लष्करी अधिकार्‍यांवरील एफआयआरला स्थगिती

शोपियान येथील एका कारवाई दरम्यान लष्करी गोळीबारात तीन नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी जम्मू काश्मीर पोलिसांनी एफआयआर दाखल केलेल्या मेजर आदित्य कुमार व अन्य लष्करी अधिकार्‍यांवर कोणतीही कारवाई करू नये असा आदेश काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या एफआयआरला न्यायालयाने स्थगिती दिली.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर व न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी काल सुनावणी झाली. मेजर आदित्य कुमार यांचे वडील करमवीर सिंग यांनी एफआयआर रद्द करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या प्रती ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल व जम्मू काश्मीर सरकार यांना द्याव्यात अशी सूचनाही न्यायालयाने करमवीर सिंग यांना केली. तसेच या प्रकरणी जम्मू – काश्मीर सरकारने आपले म्हणणे दोन आठवड्यांच्या आत सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.

अंतरीम पाऊल म्हणून संबंधित लष्करी अधिकार्‍यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश काश्मीर सरकारला देण्यात आले.
दरम्यान सुंजयानमधील दहशतवादी हल्ल्यानंतर काल पुन्हा जम्मू – काश्मीरात श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सीअरपीएफच्या छावणीवर हल्ला केल्याने त्यात एक जवान शहीद झाला. या दोन्ही हल्ल्यांची जबाबदारी लष्करे तैयबा संघटनेने स्वीकारल्याचे वृत्त आहे.