लढवय्या मोहन रानडे

  •  प्रभाकर सिनारी
    (शब्दांकन ः अनिल लाड)

मोहन रानडे यांनी माझ्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. रानडे फार धाडसी होते आणि सांगितलेले आदेश पाळायचे. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. मीच कॅम्प कमांडर होतो. आमचे नियम फार कडक होते… गोव्याच्या मुक्तिलढ्यातील त्यांच्या कार्याबद्दल सांगताहेत त्यांचे सहकारी प्रभाकर सिनारी.

डॉ. राममनोहर लोहिया यांनी १८ जून १९४६ रोजी गोव्यामध्ये क्रांतीची ज्योत पेटवली आणि दुसर्‍या दिवसापासून म्हणजेच १९ जून १९४६ पासून मी गोमंतक मुक्तिचळवळीत सामील झालो. त्यावेळी मी आठवीचा विद्यार्थी होतो. पणजीला ‘इश्कॉला’मध्ये शिकत होतो. तिथे मनपत नावाचे एक शिक्षक होते. ते त्रावणकोर-कोचिन येथून आले होते. त्यांच्यावर ब्रिटिशांकडून वॉरंट होते, म्हणून गोव्याला येऊन त्यांनी शिक्षकी पेशा धरला होता. जेव्हा १८ जूनला राममनोहर लोहियांनी मडगावला सत्याग्रह केला, भाषण दिले म्हणून त्यांना पकडण्यात आले, त्यावेळी मनपत सरांनी १९ तारीखला आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र करून सांगितले, राममनोहर लोहियांना अटक का करण्यात आली, काय झालेले आहे, प्रसंग कोणता घडला आहे, ते कोण आहेत, आणि त्यांनी असेही सांगितले की, आम्ही विद्यार्थ्यांनी त्यांच्या सुटकेसाठी काम करायला हवे. काय करायचे तर आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढायची आणि सगळ्या लोकांना सांगायचे की बाबांनो, असे असे झालेले आहे, तेव्हा तुमची दुकाने वगैरे बंद करा. सगळे व्यवहार बंद करा आणि पोर्तुगिजांच्या विरुद्ध निषेध व्यक्त करा. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी करून बाहेर निघालो. जेव्हा मॉडर्न स्कूलकडे- कॅफे भोसले आता जिथे आहे तिथे- पोचलो तेव्हा पोलिसांनी आम्हाला अडवले. आमचे शिक्षक मनपत यांनी सफेद कपडे घातले होते, त्यामुळे पोलिसांना ओळखायला सोपे पडले की हे आमचे नेते आहेत. त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यावेळी पाऊस पडून सगळीकडे डबकी आणि चिखल झाला होता. त्यांनी शिक्षकांना खाली पाडून अक्षरशः तुडवले. आम्हाला असे वाटायला लागले की ते रक्ताने माखलेले आहेत. पण ती माती होती. पण त्यावेळी आम्हाला फार राग आला. नंतर मग त्यांना मारीत-झोडीत पोलिस स्टेशनवर नेले. आणि तिथून आम्हाला स्वातंत्र्य म्हणजे काय हे कळाले.
त्यादिवशी संध्याकाळी पुन्हा आम्ही मिरवणूक काढली. त्यात माजी मुख्यमंत्री कै. शशिकला काकोडकर, डॉ. रतन खंवटे, मिसेस शहा अशा पुष्कळ मुलीसुद्धा सामील झाल्या होत्या. तिथे आम्हाला पोलिसांनी आणि निग्रो सैनिकांनी अडवले. आता जे लष्करी मुख्यालय आहे, त्यात ते लपून राहिले होते. जेव्हा आमचा मोर्चा तिथपर्यंत गेला त्यावेळी ते एकदम बाहेर पडले आणि आमच्यावर तुटून पडले. मग मारझोड करीत आम्हा सगळ्यांना फेरीबोटीपर्यंत घेऊन आले. आणि मग संध्याकाळ झाल्यावर सगळेजण आम्ही घरी गेलो. हे असे सगळे प्रकार गोव्यात चालू होते.

पण असे झाले, त्यानंतर आम्ही क्रांतिकारक संघटना तयार केली. मी, लवंदे, देशपांडे, नारायण नाईक असे सगळे मिळून आम्ही संघटना काढली आणि पहिला हल्ला म्हापशाचे रेव्हेन्यू ऑफिस होते त्यावर केला. तिथे आमची पोलिसांशी चकमक झाली आणि या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला. दुसर्‍या पोलिसाने लवंदेंवरती नेम घेतला होता, पण तेवढ्यात आम्ही गोळी झाडली आणि तो तिथेच गतप्राण झाला. एक पोलीस मेला आणि दुसरा जखमी झाला. आणि त्यानंतर आमचा हा हल्ला अयशस्वी झालेला आहे, तेव्हा आम्ही आता पळून जायचे, असे लवंदेंनी सांगितले. त्यावेळी आम्ही पळून जाऊन आश्रय घेतला. अशा रीतीने आमची लढ्याला सुरुवात झाली.
पण पोर्तुगिजांना अजून कळले नव्हते की आम्ही कोण आहोत, कोणी आम्हाला सहाय्य केले. पुन्हा मग ब्रांको उल्त्रामारिनोे नावाची एकच बँक गोव्यात सगळीकडे चालायची, त्याच्यावर हल्ला करून आम्ही ते पैसे मिळवायचे असे ठरले. त्यावेळी मुकुंद धाकणकर नावाचा नेव्हीतला एक माजी अधिकारी होता तोही आम्हाला सामील झाला होता. आणि आम्ही आमच्या योजनेप्रमाणे पर्वरी येथे ती गाडी अडवली. त्यात थोडेफार मिळवले, पण तेवढे यश आले नाही. हे झाल्यावर त्यातील काहीजणांनी आम्हाला ओळखले. मी, नारायण नाईक वगैरेंंना. त्यात आम्हाला २८-२८ वर्षांची शिक्षा झाली. मला कमी झाली. त्यांना वाटले की मी मायनर आहे. पोर्तुगिज कायद्याप्रमाणे १८ वर्षांपर्यंत अल्पवयीन धरतात. मी त्यावेळी १४ वर्षांचाच होतो. आम्हाला आग्वादला ठेवले. नंतर रेईश मागूशला नेले, मग मडगावला तुरुंगात नेले. नंतर मग पुन्हा आग्वादला नेण्यात आले. मी पळण्याच्या नेहमीच प्रयत्नात असायचो. त्यावेळी फार छळ होत होता. निग्रो आम्हाला क्रूरपणे वागवत. कारण त्यांना सांगण्यात आले होते की आम्ही आफ्रिकन सोजिरांना मारलेले आहे. तीनचार वर्षे आग्वादहून मी पळण्याचे सगळे प्रयत्न करत होतो. एक दिवस मला बेदम मारण्यात आले. कारण त्यांना वाटले की हा काहीतरी सहकार्‍यांना शिकवत आहे. मी अगदी रक्तबंबाळ होऊन पडलो होतो. डॉक्टरानी सांगितले यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला पाहिजे, नाहीतर बरेवाईट होऊ शकते. स्वतः कमांडरने मारले होते. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मला ही संधी बरी दिसली आणि मी तिथून पळालो. तोपर्यंत मी चार वर्षे तुरुंगात काढली होती. मग लवंदे आणि आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो. संघटना मजबूत केली. गोळे नावाचे एक माजी कॅप्टन होते ते आम्हाला प्रशिक्षण देत होते.
अशा रीतीने आम्ही जंगलात शिबिरे घ्यायचो. गोव्यातील तरुणांना आम्ही भरती करत होतो. अशावेळी मोहन रानडे ऊर्फ मनोहर आपटे हे सावईवेरेला मराठी शिक्षक म्हणून काम करत होते ते आमच्यात सामील झाले. यांच्याविषयी नंतर कळालं की, त्यांचे खरे नाव मनोहर आपटे; मोहन रानडे नव्हे! आणि ते आणि त्यांचा एक साथीदार बाळू साठे यांच्यावर सांगली पोलिसांनी वॉरंट काढले होते म्हणून ते गोव्याला वॉरंट चुकवायला आले होते. आणि इथे आल्यावर त्यांनी मराठी शिकवायला सावईवेर्‍याला सुरुवात केली होती. मोहन रानडे या नावाने ते वावरत. ते आमच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या सहवासात आले. आणि नंतर आम्ही त्यांना आमच्या एका शिबिरात ट्रेनिंग म्हणजे गनिमी काव्याने कशी लढाई करावी, याचे शिक्षण द्यायचे ठरवले. आम्ही गट करत होतो. १५-२० मुलांचा एक गट करून त्यांना शिकवायचे. मला वाटते की हे तिसर्‍या किंवा चौथ्या गटामध्ये होते. तर मोहन रानडेंनाही प्रशिक्षण दिले गेले. त्यांनी आपले नाव दिले होते मोहन रानडे. आमच्या शिस्तीप्रमाणे कोण भरती होतो त्याला शस्त्रावर हात ठेवून शपथ घेऊन आपले खरे नाव सांगावे लागत होते. त्याप्रमाणे ती शपथ द्यावी लागते. त्यावेळीसुद्धा त्यांनी आपले नाव मोहन रानडे असे सांगितले. पण झाले असे, त्यानंतर आम्ही आझाद गोमंतक दल म्हणून नगर-हवेलीच्या मुक्तिचळवळीत सामील झालो. तर तिथे रा. स्व. संघाचे राजा वाकणकर यांनी त्यांना ओळखले. म्हणाले, हा मोहन रानडे नव्हे, हा मनोहर आपटे! एवढेही असताना आम्ही त्यांना आमच्यासोबत ठेवले. आमच्या गटात ते बरेच धाडसी होते. बर्‍याच हल्ल्यांत त्यांनी आम्हाला सहकार्य केले. माझ्या नेतृत्वाखालीसुद्धा चारपाच ठिकाणी हल्ल्यात आम्ही घेतले होते त्यांना. गुळेली पोलिस स्टेशनवरील हल्ला, शिरगावच्या खाणींवरील हल्ला, थिवीचा हल्ला, चांदेल पोलीस चौकी वगैरे. मोहन रानडे यांनी माझ्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. रानडे फार धाडसी होते आणि सांगितलेले आदेश पाळायचे. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. मीच कॅम्प कमांडर होतो. आमचे नियम फार कडक होते.

विश्‍वनाथ लवंदे आमचे प्रमुख होते. त्यांचे म्हणणे होते की आम्हाला त्यांनी खरे नाव का सांगितले नाही. राजा वाकणकरकडून त्यांचे खरे नाव आम्हाला कळले आणि भूतकाळही कळला. कदाचित त्यांना वाटले असेल त्यांनी खरे नाव सांगितले तर त्यांच्यावर गडांतर येऊ शकते. पण त्यांनी जे आमच्यासाठी काम केले ते अतिशय विश्‍वासानेआणि आमच्या आदेशाप्रमाणेच केले.
राजा वाकणकर हे पूर्वी भारतीय लष्करात होते आणि दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस इटलीत होते. त्यांनी काही शस्त्रे आणली होती. त्यांतील एक शस्त्र त्यांनी आम्हाला विकले. स्टेनगन. त्यावेळी दोन हजार रुपयांना. ते घेतले खरे, पण मी बघितले, त्यातल्या ज्या गोळ्या होत्या, त्या फार जुन्या होत्या. त्यांचा गोळीबार होणार की नाही याची मला शंका होती. आम्ही ठरवले होते बेती पोलिस चौकीवर हल्ला करायचा. मी नवीन गोळ्या आणून तो हल्ला करायचा असे ठरले. पण रानडेंच्या काय डोक्यात आले कुणास ठाऊक, त्यांनी जाऊन हल्ला केला आणि त्या गोळ्या काही पेटेनात. ती स्टेनगन फेल झाली. तेथील सेंट्रीने याचा फायदा घेतला आणि रानडेंवर गोळी झाडली. मोहन रानडे जखमी झाले आणि त्यांना पकडले गेले. तिथून त्यांची गोव्यातील कारकीर्द संपली. कारण त्यांना कैद केले गेले. त्यांचा तुरुंगात फार छळ झाला. गोव्याहून त्यांना लिस्बर्नला पाठवले. गोवा मुक्त झाला तरीसुद्धा त्यांनी त्यांची सुटका केली नव्हती. आमचे बाकी कैदी नारायण नाईक, भेंब्रे आणि कोण कोण यांनासुद्धा तसे सोडले नव्हते. पोर्तुगिजांचा तो आडमुठेपणा होता.

 

रानडेंना सोडवून आणण्याबाबत भारत सरकारचे धोरण
भारत सरकारचे सगळेच धोरण अगदी आठमुठेपणाचे होते. आम्ही स्वातंत्र्यासाठी लढत असलो तरी नगरहवेलीला किंवा इतर ठिकाणी तर खुद्द आम्हालासुद्धा अटक व्हायची. आमचाच देश, आमचेच सरकार आणि आमचीच हत्यारे काढून घेत. माझे भाऊ तीनतीन वर्षे राहिले तुरुंगात.
लिस्बर्नमधून सुटल्यानंतर रानडे गोव्याला आले. त्यावेळी एक चळवळ सुरू होती. दयानंद बांदोडकर मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर काही आरोप होते. मी तेव्हा पोलिस खात्यात होतो. त्यांनी बांदोडकरांविरुद्ध एक ऍक्शन कमिटी नेमली होती. त्यात मार्क फर्नांडिस, रानडे, कॉंग्रेसचे नेते असे सगळे होते. बांदोडकरांना सक्ती करायची की त्यांनी राजीनामा द्यावा. त्यावेळी मोहन रानडेंनाही अटक झाली होती. बांदोडकरांनीच त्यांच्यावरील जुन्या वॉरंटच्या प्रकरणाची माहिती काढली.
लिस्बर्नला असताना मोहन रानडे यांची सुटका व्हावी म्हणून एक समिती नेमली होती त्यात मीही होतो. पोर्तुगीज सरकारवरती दडपण आणण्यासाठी आणि भारत सरकारवर. त्यांच्या सुटकेसाठी मी आणि माझ्या दोन भावांनाहीसुद्धा प्रयत्न केले होते. मोहन रानडे सुटका होऊन आले त्यावेळी मी त्यांचा सत्कारही केला होता. त्यावेळी मी आयपीएस अधिकारी म्हणून पोलीस दलात होतो.
मोहन रानडे यांचे कार्य सफल झालेले आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यातला त्यांचा भाग कोणी विसरू शकत नाही. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी जे काही त्यांनी कार्य केलं, तो इतिहासाचा भाग झालेला आहे. त्याबद्दल ते खरोखर मोठे आहेत. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे.

रानडेंचे स्त्रीदाक्षिण्य
आम्हाला स्फोटंक, दारुगोळा पाहिजे होता. म्हणून शिरगावच्या खाणीवरती मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असूनसुद्धा ती लुटून आम्ही परत येत होतो. तर वाटेत आम्हाला एक जीप मिळाली. आम्ही समजलो आमचाच पाठलाग करत आली आहे जीप. तर जीपवरती मोहन रानडेंनी हल्ला केला आणि नंतर आम्ही गोळीबाराने उत्तर दिले. तर त्यात एका बाईने मोठी आरोळी मारली. आम्हाला कळाले, हा स्त्रीचा आवाज आहे. आम्ही गोळीबार थांबवला. त्यांना रानडे मारू शकले असते तिथेच, पण तिची किंकाळी ऐकल्याबरोबर हा हल्ला बंद केला. नंतर आम्हाला कळले की ती एका जर्मन इंजिनिअरची बायको आहे. त्यांना सोडून देण्यात आले. एवढे औदार्य कुणी दाखवले नसते. कारण ते शत्रूला काम करत होते आणि मोहन रानडेंनी ते होऊ दिले नाही.

नगरहवेली मुक्तिसंग्रामात सहभाग
नगरहवेलीच्या सुटकेसाठी त्यांनी बर्‍यापैकी काम केले. खांडवेलला जाऊन तिथे हल्ला करायचा होता. त्यांची पोलीस सेवेची आर्मी पळाली होती खांडवेलला- नगरहवेलीच्या दक्षिणेकडे. तर मधून एक नदी वाहते तिचे नाव दमणगंगा. तिला पूर आला होता. आता जायचे कसे, तर आम्ही भर पाण्याच्या लोटातून गेलो. सांगायचे म्हणजे ते कधीच तसे घाबरले नाहीत. त्यांच्या सहकार्याने आम्ही मग पलीकडे गेलो आणि खांडवेलला त्यांच्यावर हल्ला केला आणि नगरहवेली मुक्त केली.

जंगलातील अनुभव
आम्ही जंगलात असताना मिळेल ते खात होतो. काहीवेळा शिकार करूनसुद्धा खायचो. धनगर लोक आणि आमचा अगदी जवळचा संबंध होता. जंगलात आम्ही कुठेही असलो आणि त्यांना निरोप पाठवला की बरोब्बर आम्हाला कसे, कुठे असतील तिथून जेवण वगैरे आणून द्यायचे. मुक्तिलढ्याच्या वेळी त्या समाजाचा आम्हाला फार फायदा झाला.