ब्रेकिंग न्यूज़

लज्जास्पद

दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांच्या भाजपा प्रवेशावरून आता प्रदेश भाजपमध्येच हमरीतुमरी सुरू झाल्याचे विदारक चित्र सध्या गोव्याच्या जनतेला पाहायला मिळते आहे. विशेषतः प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यातील संघर्षाला जाहीरपणे तोंड फुटलेले गेल्या काही दिवसांत दिसून आले. भाजपासारख्या पक्षाच्या या दोन राज्यस्तरीय नेत्यांमध्ये ह्या पातळीवरून आरोप – प्रत्यारोप व्हावेत हे पक्षासाठी अत्यंत लज्जास्पद आहे. सोपटेंसारख्या पक्षबदलुंना पुन्हा सन्मानाने पक्षात प्रवेश दिल्याने आणि वर मंत्रिपदाचीही बक्षिसी देण्याचे आश्वासन पक्षाने दिल्याचे आता उघड झालेले असल्याने भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते निश्‍चितच संभ्रमित झालेले आहेत. भले पक्षाला स्थैर्याची कितीही गरज असेल, परंतु या कृतीचे नैतिकदृष्ट्या समर्थन कसे करावे हेच त्यांना कळेनासे झालेले आहे. त्यात ह्या निर्णयाबाबत आपल्याला शेवटपर्यंत अंधारात ठेवले गेल्याने पार्सेकरांसारखा पक्षाचा तळागाळातून वर आलेला नेता अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. आपल्याला या पक्षांतरांसंबंधी शेवटच्या क्षणापर्यंत कल्पना दिली गेली नाही याचा तो राग प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रखरपणे व्यक्त झाला. वास्तविक एखाद्या ज्येष्ठ पक्षनेत्याच्या मनामध्ये अशा प्रकारची अस्वस्थता जेव्हा जन्म घेते, तेव्हा त्याची व्यक्तीशः भेट घेऊन त्याची समजूत काढणे ही पक्षाचे नेतृत्व करणार्‍याची जबाबदारी असते. त्यासाठी स्वतःकडे थोडा कमीपणा घ्यावा लागला तर तो घेणेही त्यांच्याकडून अपेक्षित असते. परंतु ज्या प्रकारे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी पार्सेकरांसारख्या ज्येष्ठ नेत्याला जाहीरपणे प्रत्युत्तरे देणे सुरू केले आहे, ती अपरिपक्वपणाची निशाणी आहे. पक्षातले वादळ आपसात चर्चा करून, बोलून संपवण्याऐवजी उथळपणेे ते त्याला माध्यमांतून सामोरे जात आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागते. त्यामुळे आपल्याविरुद्ध आणि आपल्या ज्येष्ठ पक्षनेत्यांविरुद्ध सातत्याने काही शक्ती वावरत होत्या व त्याच आपल्या गेल्या निवडणुकीतील पराभवाला कारणीभूत होत्या या श्री. पार्सेकर यांच्या म्हणण्याला दुजोरा देणारे चित्र जनतेसमोर निर्माण होते आहे. ‘पार्सेकरांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांविरुद्ध अपशब्द काढले, मोदींविरुद्ध अपशब्द काढले’ वगैरे प्रदेशाध्यक्ष श्री. तेंडुलकर यांचे म्हणणे जरी असले तरी ते जे काही बोलणे झाले असेल ते त्यांच्यात आपसात फोनवर झालेेले आहे. ते काही जनतेसमोर नाही. पार्सेकर यांनी आजवर दिलेल्या जाहीर मुलाखतींमध्ये पक्षाध्यक्ष सोडाच, सध्या आजारी असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर थेट टीका करणे टाळलेले दिसते आहे. परंतु तेंडुलकरांशी फोनवर बोलताना पार्सेकरांकडून रागाच्या भरात काही वावगे बोलले गेले असे जरी मानले तरी त्यासंबंधी पक्षाच्या व्यासपीठावर त्यांना जाब विचारला जाऊ शकला असता, परंतु ज्या प्रकारे तेंडुलकर या वादाला प्रसार माध्यमांतून आक्रमकपणे सामोरे गेले आहेत ते पटणारे नाही. घरची धुणी जाहीरपणे चव्हाट्यावर धुण्यासारखे ते आहे. एकाने चूक केली म्हणून दुसर्‍यानेही तीच चूक करायची नसते. पक्षशिस्तीला ते शोभत नाही. पार्सेकर यांची नाराजी ही केवळ त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारीवर गदा येणार असल्याने आहे असे भासवले जात असले तरी ती काही एकाएकी उफाळलेली नाही. तिला मोठी पार्श्वभूमी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे राज्यस्तरीय दिग्गज नेते पराभूत झाले, त्यानंतर त्यांना बाजूला टाकण्यात आल्याची त्यांची भावना बनत गेली. पक्षकार्यापासूनही त्यांना दूर सारले गेले. पक्षाची गाभा समिती ही वरून येणारे निर्णय थोपण्यासाठी नामधारी बनल्याची तक्रारही येत राहिली. असे असूनही पक्षाचे एकूण प्राधान्य दीर्घकालीन संघटनात्मक कार्यापेक्षा सत्ताकेंद्रित राहिल्यानेच आज ही बंडाळी वर आलेली आहे. खरे सांगायचे तर तेंडुलकर हे केवळ निमित्तमात्र आहेत. खरा रोख वेगळा आहे. जोवर मनोहर पर्रीकर सक्रिय होते तोवर हा विरोध जाहीरपणे प्रकट होत नव्हता, परंतु त्यांच्या अनुपस्थितीत आता तेंडुलकर हे टीकेचे लक्ष्य बनले आहेत. भाजपातील नव्या सत्तासंघर्षाने या अस्वस्थतेला सध्या खतपाणी घातले आहे. सध्या पर्रीकरांनंतर त्यांची जागा घेण्यासाठी जी मोर्चेबांधणी चालली आहे, त्यातून पक्षातील जुन्या लोकांना बाजूला सारून आपले घोडे पुढे दामटण्याचा आणि आपला राजकीय प्रभाव वाढवण्याचा काहींचा जो प्रयत्न चालला आहे, त्यातून पक्षातील या पुरातन सुप्त संघर्ष उघडा पडला आहे एवढेच. निवडणुका येतात नि जातात. जय -पराजय हा कोणत्याही राजकारण्याच्या जीवनातील अपरिहार्य भाग असतो, परंतु अशा गोष्टींचे निमित्त साधून त्यांचे आपल्या वाटेतील अडथळे दूर सारण्याचा जो काही प्रकार सध्या भाजपामध्ये चाललेला आहे तो पक्षाला मारक ठरू शकतो. पक्षातील बेदिली कार्यकर्त्यांना संभ्रमित करीत असते. सरकार आज आहे, उद्या असेल नसेल, परंतु पक्ष जर टिकवायचा आणि वाढवायचा असेल तर विद्यमान ठिणगीतून वणवा लागणार नाही याची काळजी पक्षनेतृत्वाने नक्कीच घ्यावी लागेल.