ब्रेकिंग न्यूज़

लक्ष्मी ठरल्या पहिल्या महिला सामनाधिकारी

पहिल्यावहिल्या महिला सामनाधिकारी होण्याचा बहुमान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने भारताच्या जी.एस. लक्ष्मी यांना प्रदान केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक यांनी नामिबिया विरुद्ध ओमान यांच्यातील सामन्यात पंचांची भूमिका पार पाडली. आयसीसीची मान्यता असलेल्या पुरुषांच्या सामन्यात पंच म्हणून काम पाहणार्‍या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. यानंतर आयसीसीने भारताच्या लक्ष्मी यांना सामनाधिकारीपदी नियुक्त करत नारीशक्तीला बळकट करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.

उजव्या हाताने फलंदाजी करणार्‍या लक्ष्मी आऊटस्विंग करणार्‍या गोलंदाज म्हणूनही प्रसिद्ध होत्या. १९८६ ते २००४ या कालावधीत त्यांनी भारतीय संघासह साऊथ सेंट्रल रेल्वे, आंध्र प्रदेश, बिहार, पूर्व विभाग, दक्षिण विभाग अशा संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

५१ वर्षीय लक्ष्मी यांनी २००८ -०९ मध्ये पहिल्यांदा देशांतर्गत सामन्यात सामनाधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर लक्ष्मी यांनी ३ महिला आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनाधिकारी म्हणून पद भूषवले. तसेच ३ टी-ट्वेंटी सामन्यांतही सामानाधिकारी म्हणून काम पाहिले. आता त्यांना तत्काळ प्रभावाने आयसीसीच्या सामन्यात सामनाधिकारी म्हणून कार्यरत होण्याची संधी मिळणार आहे.
आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी पॅनेलवर नियुक्ती होणे हा माझा सन्मान आहे. या मुळे आता मला अनेक ठिकाणी जात येईल आणि सामनाधिकारी म्हणून भूमिका पार पाडता येईल. महिला कसोटीपटू म्हणून माझी कारकीर्द प्रदीर्घ होती. आता सामनाधिकारी म्हणूनदेखील माझी कामगिरी उत्तम असेलस असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आयसीसीचे देखील त्यांनी आभार मानले.

बीसीसीआय, क्रिकेटजगतातील माझे वरिष्ठ, कुटुंबीय, सहकारी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांचे मी आभार मानते. त्यांच्या पाठिंब्यामुळेच वाटचाल करू शकले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे लक्ष्मी यांनी शेवटी सांगितले.

तसेच आयसीसीने पंचांच्या विकास पथकात ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक यांच्या साथीला एलोईस शेरिडन यांची निवड केली आहे. त्यामुळे या पथकात महिलांची संख्या सात झाली आहे. लॉरेन एगनबाग, किम कॉटन, शिवानी मिश्रा, सुई रेडफर्न, मेरी वॉलड्रॉन व जॅकलिन विल्यम्स यांचा यापूर्वीच या पथकात समावेश करण्यात आला आहे. शेरिडन या पुरुषांच्या बिग बॅश लीग २०१८-१९ मोसमातील दोन लढतीत राखिव पंच होत्या. याच वर्षी त्यांनी महिलांच्या बिग बॅश लीग स्पर्धेतील चार सामन्यांत पंच म्हणून काम पाहिले होते. तसेच पुरुषांच्या प्रथम विभागीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचगिरी करणार्‍या पहिल्या महिला म्हणून त्यांची नोंद आहे.