लंकेचा ९१ धावांनी विजय

कुशल परेराचे पाचवे एकदिवसीय शतक तसेच आपला शेवटचा सामना खेळणार्‍या लसिथ मलिंगाने घेतलेल्या तीन बळींच्या जोरावर काल शुक्रवारी श्रीलंकेने बांगलादेशचा ९१ धावांनी पराभव केला. या विजयासह यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या ३१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव २२३ धावांत संपला.

नाणेफेकीचा कौल जिंकून लंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशने अविष्काला बाद करत चांगली सुरुवात केली. कर्णधार करुणारत्ने व कुशल परेरा यांनी तिसर्‍या गड्यासाठी ९७ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मधल्या फळीतील फलंदाजांनी कुशलला चांगली साथ दिल्याने लहान मोठ्या भागीदार्‍यांच्या बळावर लंकेला तीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला.

विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची ४ बाद ३९ अशी केविलवाणी स्थिती झाली होती. रहीम व सब्बीर रहमान यांनी पाचव्या गड्यासाठी १११ धावा जोडत संघाला दीडशेपर्यंत नेले. ही जोडी धोकादायक ठरत असताना डीसिल्वाने सब्बीरला बाद करत लंकेला पुन्हा वर्चस्व मिळवून दिले. यानंतर ठराविक अंतराने बांगलादेशचे गडी बाद होत राहिले.

संक्षिप्त धावफलक
श्रीलंका ः अविष्का ७, करुणारत्ने ३६, कुशल परेरा १११, कुशल मेंडीस ४३, मॅथ्यूज ४८, थिरिमाने २५, थिसारा २, डीसिल्वा १८, मलिंगा नाबाद ६, प्रदीप नाबाद ०, अवांतर १८, एकूण ५० षटकांत ८ बाद ३१४, गोलंदाजी ः शफिउल ६२-३, मिराझ ५६-१, रुबेल ५४-१, मोसद्देक ४५-०, मुस्तफिझुर ७५-०, सरकार १७-०, महमुदुल्ला ४-०, बांगलादेश ः तमिम ०, सरकार १५, मिथुन १०, रहीम ६७, महमुदुल्ला ३, सब्बीर ६०, मोसद्देक १२, मिराझ २, शफिउल २, रुबेल नाबाद ६, मुस्तफिझुर मलिंगा १८, अवांतर २८, एकूण ४१.४ षटकांत सर्वबाद २२३
गोलंदाजी ः मलिंगा ३८-३, प्रदीप ५१-३, थिसारा ३६-०, कुमारा ४५-१, डीसिल्वा ४९-२.