रोहितबरोबर कोणतेही मतभेद नाहीत

>> कोहलीने केले स्पष्ट; शास्त्रींचीही केली पाठराखण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने काल त्याच्यात व उपकर्णधार रोहित शर्मा याच्यात कोणताही मतभेद नसल्याचा मतभेद असल्याचे वृत्त फेटाळून लावले. भारतीय संघ वेेस्ट इंडीज दौर्‍यावर जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने रोहित बरोबरच्या बेबनावाचे वृत्त फेटाळून लावले. तसेच त्याने संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्र यांचीही पाठराखण केली.

पत्रकार परिषदेत बोलताना विराटने जर रोहितबरोबर मतभेद असते तर आम्ही नुकत्याच झालेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंतचा पल्ला गाठू शकलो असतो काय असा प्रतिप्रश्‍न केला. ड्रेसिंगरूममध्ये सुद्धा खेळीमेळीचे वातावरण असल्याचे त्याने सांगितले. गेल्या तीन-चार वर्षांत घेतलेल्या मेहनतीमुळे भारतीय संघ आज जगातील अग्रमानांकित संघ बनला आहे. हे आमच्यात काहीहीत नसल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरसे नाही आहे काय, असा प्रश्‍नही विराटने केला. आमच्यात मतभेद असल्याचे गेल्या काही दिवसांपासून मी ऐकतोय व वाचतोय. परंतु हे सगळे म्हणजे हास्यास्पद असल्याचे विराटने सांगितले.

त्याच बरोबर उपांत्य फेरीतील पराभवामुळे टीको होत असूनही आपण भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांनाच कायम ठेवण्याच्या बाजूने असल्याचे विराटने सांगितले.

रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षणाखाली कार्यरत असलेले टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांना ३ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर होणार्‍या वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी ४५ दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे.

आपण मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्री यांचीच बाजू घेईन. परंतु अजूनपर्यत कपिल देव यांच्यात प्रमुखतेखालील क्रिकेट सल्लागार समितीने यासंदर्भात माझ्याशी संपर्क साधलेला नाही. परंतु आमचे सर्वांचे रवीभाईबरोबर मित्रत्वाचे संबंध असून त्यांच्या कार्यप्रणालीवर खूश असल्याचे विराटने सांगितले. परंतु या विषयावर क्रिकेट सल्लागार समितीच निर्णय घेईल असेही विराटने स्पष्ट केले. परंतु विराटने पाठराखण केल्याने रवी शास्त्री यांच्याकडेच टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली जाण्याची जास्त शक्यता आहे.

उपलब्ध माहितीनुसार ऑगस्ट १३ किंवा १४ रोजी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी अर्ज सादर करण्याची आज ३० जुलै ही शेवटची तारिख आहे.
प्रशासक समितीने नवीन राष्ट्रीय प्रशिक्षक निवडण्याची जबाबदारी कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील ऍड हॉक समितीवर सोपविली आहे. त्यात अंशुमन गायकवाड, माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.

रॉबिन सिंह, प्रवीण आम्रेकडून
मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज दाखल
दरम्यान, माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंह आणि प्रवीण आम्रे यांनी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.