रोगांना कारणीभूत ः मंदाग्नी

  •  डॉ. मनाली म. पवार
    (सांतइनेज, पणजी)

योग्य रीतीने, योग्य प्रमाणात, योग्य वेळी अन्नसेवन केले तरी त्याच्या पचनास जो अग्नी विलंब लावतो त्याला मंदाग्नी म्हणतात. अशा लोकांना विशेष अशी भूक लागत नाही व एखादे वेळेस जेवण मिळाले नाही तरी त्यांच्या शरीर-मनावर काही फरक पडत नाही. ते व्याकूळ होत नाही.

शीर्यते तत् शरीरम् |

सतत झीज होते ते शरीर. ही झीज भरून काढण्यासाठी नष्ट झालेल्या शरीर-घटकांची पुनः निर्मिती करण्यासाठी आहाराची गरज असते. शरीर-घटकांची कार्ये चालू राहण्यासाठी शरीराला सतत अन्नाची गरज असते. आहाराचा परिणाम मनावरही होत असतो. ज्या प्रकारचा आहार असेल त्या प्रकारचे सात्त्विक, राजसिक किंवा तामसिक मन बनते. बल, वर्ण, इंद्रियांची प्रसन्नता या गोष्टीसुद्धा आहारावरच अवलंबून असतात. म्हणून हितकर किंवा अहितकर जाणून त्याचे सेवन करणेच इष्ट होय. पण घेतलेला आहार मूळ स्वरूपात शरीराची वाढ करू शकत नाही. त्यासाठी त्या आहाराचे रूपांतर व्हावे लागते. द्रव्यास शरीर सात्म्य असे स्वरूप देणे हे शक्तीचे काम व ती शक्ती म्हणजे ‘अग्नी’.
आपण वनस्पतींच्या फोटोसिन्थेसिसचा जरी विचार केला तरी आपल्या लक्षात येईल की वनस्पतींमध्येही अन्न तयार करण्यापासून ते ऊर्जा मिळण्यापर्यंत पर्यावरणातील अग्निदेवता म्हणजे सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. तसेच आपल्या शरीरात घेतलेल्या आहाराचे रूपांतर करण्यासाठी ‘जठराग्नी’ची गरज असते. आहारावर अग्नीमार्फत पचनसंस्कार होऊन मगच त्यापासून शरीराची वाढ होते.
अग्नीचे एकूण १३ प्रकार केले आहेत- १ कोष्ठाग्नी, ७ धात्वाग्नी व ५ – पंचभौतिक अग्नी.

यात सर्वांत महत्त्वाचा- अंतकोष्ठामध्ये कार्य करणारा कोष्ठाग्नी. त्याच्या सामर्थ्यावर इतर अग्नीचे बल अवलंबून असते. हा अग्नी सर्व महाभूतांवर सर्व रसात्मक द्रव्यांवर कार्य करून त्यांचे रूपांतर आहार रसात करू शकतो. कोष्ठाग्नीचे कार्य झाल्यावर आहाररस सर्व शरीराकडे जाऊन अन्य अग्नींना त्याचे पाचक अंश देऊ शकतो. कोष्ठाग्नीलाच कायाग्नी किंवा जठराग्नी असेही म्हणतात.
कोष्ठाग्नीचे कार्य व्यवस्थित न झाल्यास विकृत रस निर्माण होतो. त्यामुळे अन्य अग्नींना स्वसमान घटक मळू शकत नाहीत. याची वृद्धी/क्षय झाल्यास इतर १२ अग्नींची विकृती होती व इथून आजारांना सुरुवात होते.

या कायाग्नीवर आयुष्य, बल, वर्ण, उत्साह, स्वास्थ्य, शारीरिक वाढ आणि इतर अग्नी या गोष्टी अवलंबून असतात. जोपर्यंत अनुकूल असे आहाराचे रूपांतर करण्याचे सामर्थ्य कोष्ठाग्नीमध्ये असते, तोपर्यंत सर्व गोष्टी घडतात परंतु अग्नीची प्रतिकूल स्थिती निर्माण झाल्यास रोग परंपरा निर्माण होते.
‘रोगाः सर्वेऽपि मंदेऽग्नौ’…
असे आयुर्वेद शास्त्रात सांगितलेले आहे. या सूत्रानुसार अग्नीची महती लक्षात येते. सर्व रोगांचे मूळ कारण अग्नी आहे किंवा सगळे रोग विकृत अग्नीमुळेच निर्माण होतात.

पचनशक्ती कमी होणे किंवा ज्या व्याधींमध्ये पचनशक्तीमध्ये विकृती उत्पन्न होते त्या व्याधीस अग्नीमांद्य असे म्हणतात. अजीर्ण व अग्निमांद्य साधारण एकसारखेच वाटतात. पण दोन्हीमध्ये फार मोठा भेद आहे. अजीर्ण हे आशुकारी (ऍक्यूट- तीव्र) तर अग्नीमांद्य चिरकारी (क्रॉनिक- जुनाट) असते. म्हणजे अजीर्ण बर्‍याच वेळा आपण घेतलेल्या अहितकर आहाराने लगेच अपचन घडवते व त्रास होतो. पण अग्नीमांद्याचे हेतू अनेक दिवस घडत असतात व व्याधीची उत्पत्ती हळूहळू होत असते. त्यामुळे अजीर्ण थोड्याशा चिकित्सेने कमी होते, तर अग्नीमांद्यावर बरेच दिवस चिकित्सा घ्यावी लागते.
अग्नीचे प्रमुख स्थान ग्रहणी. अग्नीमांद्याची पुढची अवस्था म्हणजे ग्रहणी हा आजार आहे. त्यापूर्वीच्या अवस्थेस म्हणजेच ज्यावेळी अग्नीची केवळ कार्यात विकृती होते तेव्हा अग्नीमांद्य म्हणावे. अग्नी हे स्वतंत्र द्रव्य नसून तो पित्ताच्या आश्रयाने राहणारा एक विशेष गुण आहे.

अग्नीमांद्य व्याधीत अग्नीच्या पचन सामर्थ्यात विकृती उत्पन्न होते व शरीरपोषणाची क्रिया मंदावते. मंदाग्नी, तीक्ष्णाग्नी हा मुळे तर विषमाग्नी हा वायूमुळे उत्पन्न होतो.
प्रकृतीनुरूप प्रत्येकाचा प्राकृत अग्नीही चार प्रकारचे असतात. वातप्रकृतीचा मनुष्य असल्यास त्याचा विषमाग्नी असतो. पित्तप्रकृती असल्यास तीक्ष्णाग्नी व कफ प्रकृती असल्यास मंदाग्नी व समदोष प्रकृती असल्यास समाग्नी. पण बर्‍याच वेळा प्रकृतीत दोन दोषांचे प्राबल्य असते. अशावेळी वायू हा योगवाही असल्याने वात-पित्तामुळे अग्नी तीक्ष्ण, कफामुळे मंद तर कफपित्तामुळे कधी तीक्ष्ण तर कधी मंद. आपल्याला आपल्या प्रकृतीचे ज्ञान असले म्हणजे आपल्या अग्नीचे ज्ञान होते व आजारपण आल्यास प्रकृतीनुरूप अग्नीची चिकित्सा करता येते. कफप्रकृतीमध्ये असलेला मंद अग्नी म्हणजेच अग्नीमांद्य नव्हे. त्याला मंदाग्नी म्हणावे.

विषमाग्नी – जो कित्येक वेळा नीट पचन करतो किंवा कित्येक वेळा पोट फुगते, वेदना, अतिसार, जडत्व इ. लक्षणे उत्पन्न करून अन्न पचवितो. यालाच विषमाग्नी म्हणतात. जर तुम्हाला कधी भूक लागते, कधी भूकच लागत नाही किंवा जर योग्य वेळी योग्य आहार घेतला तरी पचनास वेळ लागतो व आहार घेण्याचे कोणतेच नियम न पाळता घेतलेला आहार लगेच पचन होते. अशा वेळी आपला विषमाग्नी आहे हे जाणावे.

तीक्ष्णाग्नी – विधीविरहित अन्न जरी सेवन केले तरी जो अग्नी त्याचे लवकर पचन करतो त्याला तीक्ष्णाग्नी असे म्हणतात. अशा लोकांनी सारखी भूक लागत असते किंवा भूक सहन होत नाही. या अग्नीला पचन करण्यास आहार मिळाला नाही तर तो शरीरधातूही पचन करण्यास सुरुवात करेल.

मंदाग्नी – योग्य रीतीने, योग्य प्रमाणात, योग्य वेळी अन्नसेवन केले तरी त्याच्या पचनास जो अग्नी विलंब लावतो त्याला मंदाग्नी म्हणतात. अशा लोकांना विशेष अशी भूक लागत नाही व एखादे वेळेस जेवण मिळाले नाही तरी त्यांच्या शरीर-मनावर काही फरक पडत नाही. ते व्याकूळ होत नाही.

अग्नी विकृत होणे म्हणजे विषमाग्नी. तीक्ष्णाग्नी किंवा मंदाग्नी होणे म्हणजेच अग्नीमांद्य होय.
अग्निमांद्याची कारणे….
– योग्य वेळी न जेवणे
– अतिप्रमाणात आहार घेणे
– विषम आहार घेणे
– असात्म्य – पचायला जड, अतिथंड, शिळे, नासलेले, रूक्ष अशा अन्नाचे सेवन करणे.
– देश- काल- ऋतू यांचे वैषम्य.
– वेगविधारण
– भय, चिंता, शोक यासारख्या मनोद्वेगामुळेही अग्नीमांद्य होते.
अग्नीमांद्यामधील लक्षणे ….
– थोडेसे अन्न खाल्ले तरी ते न पचणे हे मंदाग्नीचे लक्षण असून यामुळेच अनेक प्रकारचे कफविकार उत्पन्न होतात.
– कितीही जास्त प्रमाणात अन्न घेतले तरी ते पचून त्याचे भस्म होणे वा विदाह होणे हे तीक्ष्णाग्नीचे लक्षण असून यामुळे अनेक प्रकारचे पित्तविकार संभवतात.
– खाल्लेले अन्न कधी पचते तर कधी तसेच अपक्व राहते अशी अवस्था वाताने निर्माण होणार्‍या विषमाग्नीमुळे मिळते. या विषमाग्निमुळेच अनेक वातविकार उत्पन्न होतात.
अग्निमांद्य कोणत्याही प्रकारे असले तरी अग्नीमांद्याचा परिणाम अन्नविषामध्येच होतो.
घोरं अन्नविषं च तत्
– त्यामुळे भूक न लागणे
– पोट जड होणे
– आळस
– बेचैनी
– पोट फुगणे
– करपट ढेकर येणे
– मुखदुर्गंधी
– मलप्रवृत्ती दुर्गन्धीत – सशब्द – शिथिल असणे
– अल्पनिद्रा
– स्वभाव चिडचिडा बनणे … यांसारखी लक्षणे उत्पन्न होतात.
अग्नीमांद्यावरील उपचार …..
विषमाग्नीमध्ये वातघ्न उपचार करावेत. लंघन करावे. हे लंघन पूर्ण उपाशी राहून न करता हलका आहार सेवन करून करावे.
औषधी कल्पांमध्ये अग्नीतुंडी, हिंग्वाष्टक चूर्ण, भास्कर लवण चूर्ण, लशुनादि वटी आदी कल्पांचा प्रामुख्याने उपयोग करावा.
– पित्तज अग्नीमांद्यामध्ये पित्तशामक उपचार करावे. विविध प्रकारच्या पेय व मंड वापरावेत. कामदुधा, मौक्तिकासारखी शीतवीर्यात्मक औषधे उपयुक्त आहेत.
– कफामुळे निर्माण होणार्‍या मंदाग्नीसाठी सुरुवातीला पूर्ण लंघन करावे. औषधी कल्पांमध्ये हिंग्वाष्टक चूर्ण, त्रिकटू, शंखवटी, लशूनादी वटी, आमपाचक वटी, पंचकोलासव, आरोग्यवर्धिनी, ताम्रभस्म, यवक्षारसारख्या कल्पांचा उत्तम उपयोग होतो. अनुपानासाठी गरम पाणी प्यावे. औषधे व लंघन यामुळे जसजसा अग्नी वाढत जाईल तसतसा आहारही वाढवत जावा. पेया, विलेपी, अकृत-कृत यूष, मांसरस व नंतर पूर्ण आहार हा क्रम ठेवावा.
पथ्यापथ्य
लघू अन्न पथ्यकर, विशेषतः जीर्ण शालिषष्टीक व मुद्ग यूष हे अधिक पथ्यकर.