ब्रेकिंग न्यूज़
रॉयल चॅलेंजर्स पाचव्या स्थानी
Royal Challengers Bangalore batsmen Moeen Ali (L) and AB De Villers greet each other during the 2018 Indian Premier League (IPL) Twenty20 cricket match between Royal Challengers Bangalore and Sunrisers Hyderabad at The M. Chinnaswamy Stadium in Bangalore on May 17, 2018. / AFP PHOTO / Manjunath KIRAN / ----IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE----- / GETTYOUT

रॉयल चॅलेंजर्स पाचव्या स्थानी

>> सनरायझर्सवर १४ धावांनी विजय

>> डीव्हिलियर्स-अलीची भागीदारी ठरली निर्णायक

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सनरायझर्स हैदराबादवर १४ धावांनी विजय मिळविताना इंडियन प्रीमियर लीगच्या ११व्या पर्वातील आपले आव्हान कायम राखतानाच गुणतक्त्यात पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. यापूर्वीच ‘प्ले ऑफ’मध्ये स्थान नक्की केलेले असल्याने हैदराबादला पराभवाने फरक पडलेला नाही. विजयासाठी २१९ धावांचा पाठलाग करताना हैदराबादने ३ बाद २०४ धावांपर्यंत मजल मारली. केन विल्यमसनने ४२ चेंडूंत ८१ धावांची दमदार खेळी साकारली.

तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने सनरायझर्स हैदराबादसमोर २१९ धावांचे आव्हान ठेवले. एबी डीव्हिलियर्स आणि मोईन अलीच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने हैदराबादसमोर हे आव्हान ठेवले.

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून आरसीबीला फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर विराटच्या आरसीबीची सुरुवात खराब झाली. पार्थिव पटेल पहिल्याच षटकामध्ये १ धाव काढून आऊट झाला. त्यापाठोपाठ राशिद खानने कर्णधार विराट कोहलीचा १२ धावांवर त्रिफळा उडवून आरसीबीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले.

विराट तंबूत परतल्यानंतर डीव्हिलियर्स आणि मोईन अली यांची जोडी जमली. या दोघांनी तिसर्‍या गड्यासाठी १०७ धावांची भागीदारी रचली. डीव्हिलियर्सने ३९ चेंडूंचा सामना करताना १२ चौकार व १ षटकारासह ६९ तर मोईन अलीने ३४ चेंडू खेळताना २ चौकार व तब्बल ६ षटकारांसह ६५ धावा काढल्या. विराटप्रमाणे या दोघांनाही रशिद खाननेच बाद केले. ही दुकली बाद झाल्यानंतर अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोमने १७ चेंडूंत ४० धावा व सर्फराज खानने ८ चेंडूंत नाबाद २२ धावा करत बंगलोरला आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली. हैदराबादकडून राशिद खान हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २७ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

बासिल थम्पी सर्वांत महागडा
आयपीएलमध्ये सर्वांत जास्त धावा देणारा गोलंदाज म्हणून बासिल थम्पीच्या नावाची नोंद काल रेकॉड बुकात झाली. त्याच्या चार षटकात बंगलोरने ७० धावा जमवल्या. यापूर्वी हा नकोसा विक्रम ईशांत शर्माच्या नावावर होता. हैदराबादकडून खेळताना २०१३ साली त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आपल्या चार षटकांत ६६ धावा दिल्या होत्या.

धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ः पार्थिव पटेल झे. कौल गो. संदीप १, विराट कोहली त्रि. गो. राशिद १२, एबी डीव्हिलियर्स झे. धवन गो. राशिद ६९, मोईन अली झे. गोस्वामी गो. राशिद ६५, कॉलिन डी ग्रँडहोम झे. राशिद गो. कौल ४०, मनदीप सिंग झे. धवन गो. कौल ४, सर्फराज खान नाबाद २२, टिम साऊथी नाबाद १, अवांतर ४, एकूण २० षटकांत ६ बाद २१८

गोलंदाजी ः संदीप शर्मा ४-०-४०-१, शाकिब अल हसन ४-०-३५-०, राशिद खान ४-०-२७-३, सिद्धार्थ कौल ४-०-४४-२, बासिल थम्पी ४-०-७०-०
सनरायझर्स हैदराबाद ः शिखर धवन झे. व गो. चहल १८, आलेक्स हेल्स झे. डीव्हिलियर्स गो. अली ३७, केन विल्यमसन झे. ग्रँडहोम गो. सिराज ८१, मनीष पांडे नाबाद ६२, दीपक हुडा नाबाद १, अवांतर ५, एकूण २० षटकांत ३ बाद २०४
गोलंदाजी ः उमेश यादव ४-०-३१-०, टिम साऊथी ४-०-४५-०, युजवेंद्र चहल ४-०-२८-१, मोहम्मद सिराज ४-०-४३-१, मोईन अली २-०-२१-१, कॉलिन डी ग्रँडहोम २-०-३४-०