रॉजर फेडरर चौथ्या फेरीत; प्लिस्कोवा पराभूत

स्वित्झर्लंडच्या तृतीय मानांकित रॉजर फेडररने आपल्या विक्रमी ४००व्या ग्रँडस्लॅम लढतीत विजयाला गवसणी घालताना फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिसर्‍या फेरीत त्याने नॉर्वेच्या कास्पर रुड याचा ६-३, ६-१, ७-६ असा पराभव केला. चौथ्या फेरीत ३७ वर्षीय फेडररसमोर अर्जेंटिनाचा ३२ वर्षीय लियोनार्डो मायेर असेल. जपानच्या सातव्या मानांकित केई निशिकोरी याने पाच सेटपर्यंत चाललेल्या लढतीत सर्बियाच्या लास्लो जेरे याचा कडवा प्रतिकार ६-४, ६-७, ६-३, ४-६, ८-६ असा मोडून काढत आगेकूच केली. महिला एकेरीत द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाला क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिकने ६-३, ६-३ असे स्पर्धेबाहेर फेकले. नवव्या मानांकित इलिना स्वितोलिना हिच्या वाटचालीला १९व्या मानांकित गार्बिन मुगुुरुझाने ब्रेक लगावताना ६-३, ६-३ असा विजय साकार केला. १२व्या मानांकित अनास्तिया सेवास्तोवा हिने विसाव्या मानांकित एलिस मर्टेन्स हिचा खेळ खल्लास करताना ६-७, ६-४, ६-११ असा विजय प्राप्त केला.

पुरुष दुहेरीत भारताच्या लिएंडर पेस व त्याचा फ्रान्सचा साथीदार बेनो पिएरे यांनी डॉमनिक इंगलोट व मार्टिन क्लिझमन यांचा ६-४, ६-४ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. भारताच्याच रोहन बोपण्णा व रोमानियाच्या मारियस कोपिल यांनी फ्रान्सच्या बेंजामिन बोंझी व आंतोईने होआंग यांना ६-४, ६-४ असे पराजित करत तिसर्‍या फेरीत स्थान मिळविले.