रेस्टॉरंटस् पूर्ण क्षमतेने सुरू होणे अशक्य

>> संघटनाध्यक्षांचे मत ः कामगार गावी गेल्याने वाढली डोकेदुखी

सोमवारपासून राज्यातील रेस्टॉरंटस् व चहाची हॉटेल्स तसेच मॉल्स व धार्मिक स्थळे उघडण्यास सरकारने मान्यता दिलेली असली तरी सुमारे ८० टक्के हॉटेल्स व रेस्टॉरंटस् काल बंदच राहिल्याचे चित्र पणजीत पहावयास मिळाले. राज्यातील हॉटेल व रेस्टॉरंट संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी काल हॉटेल्स व रेस्टॉरंट खुली करण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ नसल्याने २५ टक्क्यांपेक्षा जास्त हॉटेल व रेस्टॉरंट खुली होणे शक्य नसल्याचे पत्रकारांना सांगितले.

राज्यातील हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये काम करणारे कामगार लॉकडाऊनच्या काळात आपल्या मूळ गावी निघून गेल्याने मनुष्यबळाच्या अभावी हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे धोंड म्हणाले. ज्या मोजक्या हॉटेल व रेस्टॉरंटवाल्यांना आपली हॉटेल व रेस्टॉरंट उघडणे शक्य होते त्यांनी काल ती उघडली.
काल या प्रतिनिधीने पणजीतील काही रेस्टॉरंट मालकांशी संवाद साधला असता त्यांनी आजपासून (काल) रेस्टॉरंटस् सुरू होत आहेत ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे असे सांगतानाच आता स्थिती पूर्वीसारखी राहिली नसल्याचे मतही व्यक्त केले.

यासंबंधी बोलताना पणजी शहरातील रित्झ रेस्टॉरंटस् समूहाचे मालक रोहिदास देसाई म्हणाले, की कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती अजून सामान्य पातळीवर आलेली नाही. कोरोनाचा संसर्ग रेस्टॉरंटस्‌मध्ये येणार्‍या लोकांमुळे वाढू नये यासाठी आम्हाला सामाजिक अंतराचे तत्त्व पाळावे लागणार आहे. आमच्यासाठी ती मोठी डोकेदुखी ठरणार आहे. ज्यांच्याकडे १०० आसनांची क्षमता आहे त्यांना एका वेळी ५० ग्राहकांनाच आत सोडता येईल. उर्वरित ५० जणांना ताटकळत बाहेर ठेवावे लागेल. त्यामुळे हे ताटकळत राहणे नकोच असे म्हणत बरेचजण रेस्टॉरंटमध्ये येणे टाळू शकतात. तसे झाले तर रेस्टॉरंटवाल्यांचे नुकसानच होणार आहे. आणखी एक समस्या आहे ती कामगार वर्गाची. रेस्टॉरंटमध्ये वेटर, स्वयंपाकी, सफाई कामगार आदी कामे करणारे लॉकडाऊनला कंटाळून यापूर्वीच आपल्या मूळ गावी गेले आहेत. ते एवढ्यात परतण्याची शक्यता नसल्याने त्याचाही कामावर परिणाम होणार असल्याचे देसाई म्हणाले.

‘नवतारा’ या रेस्टॉरंटच्या समूहाचे पणजीतील व्यवस्थापक म्हणाले की, गोवाभरातील आमच्या १० रेस्टॉरंटमध्ये ४०० जण कामाला आहेत. त्यातील ३२५ जण लॉकडाऊनला कंटाळून आपल्या गावी गेले. आता केवळ ७५ जण शिल्लक राहिले असून त्यांना घेऊन १० रेस्टॉरंट कशी चालवावीत हा प्रश्‍न असल्याचे ते म्हणाले.